“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी “, शाळेत असताना परीक्षेत आईविषयी केव्हाही निबंध लिहायला आला की त्या निबंधाची सुरुवात याच ओळीने व्हायची. पण खरतर या ओळींचा खरा अर्थ तेव्हा कधी कळलाच नाही. प्रत्येकाची साधारण अशीच स्थिती असते. या ओळींचा अर्थ जेव्हा कळू लागतो तो पर्यंत आपण मोठे झालेलो असतो. आईच्या मलमली पदरातून बाहेर येऊन जीवन नावाच्या स्पर्धेत सहभगी झालेलो असतो. त्यावेळी खरा अर्थ कळतो आईच्या मायेचा,प्रेमाचा,तिच्या ओरडण्याचा, रागे भरण्याचा. तिच्या परिश्रमाची खरी किंमत कळते ती या स्पर्धेच्या युगात पाऊल ठेवल्यावर. विनाकारणच्या आणि निरुपयोगी वाटणाऱ्या तिच्या सूचनांची पावलोपावली आठवण येते. तिच्या संस्कारांची वेळोवेळी जाणीव होते.
मातृत्व ही प्रत्येक स्त्री साठी निसर्गाने बहाल केलेली दैवी देणगीच आहे. पण या मातृत्वाचा प्रत्येक क्षण सहज नसतो. हा खडतर आणि निरंतर प्रवास प्रत्येक स्त्री स्वतः च्या मुखावर स्मित हास्य ठेऊन आल्हाददायक बनवते. आई होण्याचा निर्णय घेण हे कुठल्याही स्त्री साठी सोप्प नसत. आणि आजच्या स्पर्धेच्या युगात तर मुळीच नसते. प्रेग्नसी टेस्ट किट वर येणाऱ्या त्या दोन रेषा जेवढ्या सुखद वाटतात त्याच बरोबर करिअरला कधी कधी थोड्या महिन्यांसाठी तर कधी काही वर्षांसाठी लागणाऱ्या ब्रेकच दुःख सोबत असतेच कित्येक जणींच्या. प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकावे लागते. नऊ महिने नऊ जन्मांसारखेच असतात. मळमळ, उलट्या,जेवणावरची इच्छा उडून जाते. कधी खूप झोप येते तर कधी निद्रानाशच होतो. प्रत्येक दिवस आनंदा सोबत काळजी सुद्धा घेऊन येतो.स्वभावात होणारे बदल कुठल्याही स्त्रीच्या पटकन लक्षात येत नाहीत.शरीरात होणाऱ्या बदलांसाठी स्त्री मनाने कितीही तयार आहे असे भासवत असली तरी ती आतून पूर्णपणे भेदरलेली असते. प्रत्येक गर्भारपण हे वेगळे असते,प्रत्येक स्त्रीला होणारा त्रास ही वेगळा असतो. त्यामुळे आई, सासू, ताई, नणंद कोणीही कितीही अनुभवांची देवाणघेवाण केली तरी प्रत्येकीचा आपला तो अनुभव अजबच असतो.कलेकलेने वाढणारा गर्भ,त्याची स्पंदन,हालचाली या प्रत्येक गोष्टी ती आपल्या हृदयात साठवून घेत असते. त्याच्याशी संवाद साधते, त्याच्या वर गर्भातच संस्कार सुरू करते. छान छान गोष्टी वाचते, पौष्टिक खाते. बाळासाठी योग्य असे ते सर्व ती करत असते. वाढलेल्या गर्भाच्या आकारामुळे, त्याच्या तीव्र हालचालींमुळे कधी कधी श्वास गुदमरतो. क्षणात जीव जाईल की काय असेही खूप वेळा वाटते. प्रत्येक क्षण ती फक्त बाळाच्या खुशालीचाच विचार करत असते. प्रत्येक वेळेला सोनोग्राफीच्या आधी तिच्या मनात चाललेली तगमग कोणीही शब्दात नाही व्यक्त करू शकत. या सर्व गोष्टी करत असतानाही प्रत्येक आघाडीवर ती आपली कर्तव्य बजावत असते. जेव्हा त्या बाळाची या जगात यायची वेळ येते तेव्हा भीती,आनंद,दडपण,अस्वस्थता अशा कितीतरी विरोधी भावना तिच्या मनात सुरू असतात.बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा एक नाही तर दोन जीवनाचा जन्म होतो असे म्हणतात ते काही चुकीचे नाही.त्या वेदनादायी प्रवासानंतरही हसतमुखाने आपल्या पिल्लाला हृदयाशी कवटळून घेते, बाळाची भूक शमविण्यासाठी त्या वेदनेतही तिला वात्सल्याचा पाजर फुटतो. तिचा खडतर प्रवास इथेच थांबत नाही तर इथून सुरू होतो. इथून सुरू होतात नवीन आव्हाहने.
आई होणे कित्येक स्त्रियांचं स्वप्न असत ,पण प्रत्येक स्त्रीचे असतेच असे नाही. एखाद्या स्त्रीला आई होता नाही आले तर आपला हा प्रगत समाज आजही तिच्या बाईपणावर बोट उचलतो. कधी तिला लोकांच्या सहानुभूती पूर्वक नजरांना सामोरे जावे लागते तर कधी अवहेलना ना सामोरे जावे लागते. मग दोष कोणाचाही असो दोषी ही स्त्रीच असते.जणू काही आई होण हेच एकमेव उद्धिष्ट आहे स्त्रीच्या जीवनाचे. बाळाला जन्म देऊन स्त्रीचा दुसरा जन्म होतो. पण आईपण हे फक्त बाळाला जन्म देऊन येत नाही. तसे असते तर कृष्णाच्या मय्या यशोदेला, कर्णाच्या राधा माॅ ला आईपण कधी लाभलेच नसते. बाळाला जन्म देऊन त्याला कधी हॉस्पिटल मध्ये, तर कधी रस्त्यात, कधी कचरापेटीत,तर कधी नाल्यात सोडून जाणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणही कमी नाही आहे. बाळाला जन्म न देता प्रेमाने त्याचे संगोपन करणाऱ्या स्त्रिया सुद्धा कितीतरी आहेत. कितीतरी पुरुष मंडळीसुद्धा बाळाच्या संगोपणा मध्ये आघाडीवर असतात. समाजात असे कितीतरी पुरुष आहेत जे पूर्णपणे एकटे पालकत्व स्वीकारून कधी बाळाची आई होऊन बाळाचे संगोपन करतात.त्यांना वात्सल्याचा पाजर जरी फुटत नसला तरी त्यांचे हृदय वात्सल्यपूर्ण असते. नऊ महिने गर्भ वाढवता आला नाही त्यांना तरी, त्या बाळाची आणि त्यांची नाळ अप्रत्यक्ष रीत्या जोडलेली असते. गर्भारपण्याच्या प्रवासातून जरी ते गेले नसले तरी त्याची माया कणभरही कमी होत नाही. प्रसूती वेदनेतून ते गेले नसले तरी त्यांच्यासमोरआव्हाहने कमी नसतात.आईपण निभावताना त्या बाळासोबत रडत, हसत, धडपडत, ओरडत,बागडत त्या बाळावर संस्कार करत, त्याला नवीन गोष्टी शिकवत , कधी स्वतः शिकत आयुष्य पुढे जात राहते .आईपण ही एक पवित्र तपस्या आहे,जी अखंड आहे आणि अविरत पणे सुरूच राहते.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.