भोंडला म्हणजे नक्की काय..!
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. पण हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसर्या दिवशी हागदा म्हणजेच, भोंडला, सुरू होतो. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.काही ठिकाणी भोंडळा नऊ दिवस, काही ठिकाणी सोळा दिवस खेळला जातो.
घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.ऋग्वेदात श्रीसुक्त आहे. त्यात ‘अधपूर्वी रथमध्यां हस्तीनाद प्रबोधिनीम्’ म्हणजे जिच्या रथाच्या पुढे घोडे चालत आहेत आणि हत्तींच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व जाणवते अशा देवी लक्ष्मीला मी नमस्कार करतो आणि आवाहन करतो.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात.पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या ठिपक्यांनी झूल काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात. याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते. भोला म्हणजे शिवशंकर आणि म्हणून भुलाबाई म्हणजे उमा-पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असेही नाव आहे.भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते.देवीच्या पूजनानंतर सर्व स्त्रिया गोलाकार उभ्या राहून फेर धरतात आणिएलोपा पैलोमा गणेश देवामाझा खेह मांडू दे करीन तुझी सेवामाझा खेळ मांडिला वेशीच्या दारीपाखे घुमती नुरजावरीअशा गाण्याने भोंडल्याची सुरवात करतात. मग दुसरे गाणे असे करीत अनेक गाणी गायली जातात.एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलूदोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलूअसे एखादे गाणे गाऊन सासु-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल गौरावाचे, स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्त्रिया आनंद साजरा करतात. पूर्वी चूल आणि मूल एवढंच क्षेत्र असणार्या स्त्रियांना आश्विन महिना म्हणजे भोंडला हळदीकुंकू वगैरेमुळे विरंगुळा मिळे. मने मोकळी होत असत आणि पुन्हा कामाला नवा उत्साह मिळे. आजही आधुनिक कामात वेगवान जीवन जगताना स्पर्धा-ताणतणाव यातून मुक्त होण्यासाठी आणि दोन घटका आनंद प्राप्तीसाठी ‘पारंपरिक पद्धतीचा भोंडला’ नव्या युगात तरुण स्त्रियांनाही आनंद देत असतो आणि म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी भोंडला साजरा होत आहे.हल्ली भोंडला हा फक्त स्त्रियांच्या विरंगुळ्या चा खेळ न राहता त्याला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.