कुठल्याही स्त्री ची प्रसूती झाल्यानंतर जेव्हा तिच्या नातलगांना गोड बातमी देण्यासाठी फोन केला जातो तेव्हा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे,’ डिलिव्हरी कशी झाली? नॉर्मल झाली की सिझेरियन’ . सिझेरियन झाले असेल तर काही ठिकाणी तर अस वातावरण निर्माण होत की, जणू काही खुप मोठी आपत्ती कोसळली आहे.
‘तुम्ही सिझेरियन होऊच कस दिलं’, ‘हे डॉक्टर तर फक्त पैसे उकळायला बसले आहेत’, ‘तुम्ही या हॉस्पिटल मध्ये आलात म्हणून हे असं झालं’, ‘थोडा वेळ थांबायला हवं होते’, ही अशी ना ना तऱ्हेची बोलणी सुरू होतात. त्यातच त्या स्त्री ला सुध्दा तशा परिस्तिथीत नको नको त्या प्रश्नांना सामोरं जावं लागत. ‘तुम्ही आजकालच्या मुली जरापणा हालचाल करायला नको’,’ घरातली कामं केली असती तर ही वेळ आली नसती’,’ तू जरा जास्तच नाजूक आहेस जरा कळ सोसली असती तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असती’. काही ठिकाणी तर,’अरे सिझेरियन झाल म्हणजे काहीच दुखलं नसेल’,’ प्रसूतीच्या कळा तुम्हा आजकालच्या मुलींना कळणार कश्या’, अशा ही चर्चा रंगताना दिसतात.
सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे ABNORMAL डिलिव्हरी असाच काहीसा आपल्या समाजाचा आजही समाज आहे ; याचे मला एक स्त्री म्हणून आणि आई म्हणून दुःख होते. नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा VAGINAL DELIVERY किंवा VAGINAL BIRTH हे शब्द प्रचारात आले पाहिजेत असे मला मनापासून वाटते. VAGINAL DELIVERY चे नक्कीच खुप फायदे आहेत. ती एक नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे भविष्यात त्याचा स्त्री च्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. म्हणून याचा अर्थ सिझेरियन ही ABNORMAL डिलिव्हरी आहे असे होत नाही. त्यात त्रास कमी होतो असे ही नाही. दोन्ही ही डिलिव्हरीचे फायदे आणि तोटे आहेतच.
सिझेरियन या शस्त्रक्रियेचा उल्लेख इतिहासातही आढळतो. ३२० बी.सी. म्हणजे साधारण मौर्य काळात याचा वापर केल्याची नोंद आहे. १५००-१६०० या शतकामध्ये रोमन संस्कृतीत याचा वापर केला होता.सिझेरियन डिलिव्हरी मुळे हल्ली बालमृत्यू आणि स्त्री मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.ज्या स्त्रीचे सिझेरियन झाले तिने पूर्ण गरोदर पण अगदी ऐशो आरामात काढले, कुठलेही शारीरिक कष्ट घेतले नाहीत असे होत नाही.
सिझेरियन करण्यासाठी ही त्याची तशी कारणे असतात. जेव्हा नैसर्गिक रित्या प्रसूती करणे अशक्य असते तेव्हाच डॉक्टर्स सिझेरियनचा पर्याय अवलंबवतात. बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ स्त्रीची उंची, बाळाचे वजन, बाळाचे आणि आईचे स्वास्थ, गर्भ पिशवीची स्थिती, गर्भ पिशवीत बाळाची पोझिशन, स्त्रीचे वय, एकापेक्षा अनेक गर्भ अशा काही कारणांमुळे ठरवून सिझरियन केले जाते. बरेचदा Emergency सिझेरियन करायचीही वेळ येते. अचानक बाळाचे ह्रदयचे ठोके कमी होणे, अचानक अंगावरून पाणी जाणे यालाच वॉटर बॅग ब्रेक होणे असे ही म्हणतात, ४० आठवडे पूर्ण होऊनही गर्भ पिशवीचे तोंड पुरेसे न उघडणे, गर्भ पुरेसा खाली न येणे, बाळाची नाळ त्याच्या गळ्याभोवती गुरफटणे,बाळाने आईच्या पोटात शी करणे, डोक्या ऐवजी बाळाचे पाय खाली असणे अश्या काही कारणामुळे Emergency सिझेरियन करायची वेळ येते.
काही ठिकाणी काही डॉक्टर्स जास्त पैशाच्या हव्यासापोटी सिझेरियन करतात हे मी नाकारणार नाही. कुठेतरी एक मेडिकल प्रोफेशनल म्हणून मलाही या गोष्टीची खंत आहे. पण त्यामुळे सिझेरियन करणारा प्रत्येक स्त्री रोग तज्ञ हा ‘लुटणार डॉक्टर’ आहे असे होत नाही.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.