सिझेरियन हे कुठल्याही स्त्री ला आयुष्य भरासाठी मिळणारे आणि कधीही दुसऱ्याला सांगता न येणारे दुखणे आहे. ती दिसायला अगदी धडधाकट असते पण तिचे शरीर आतून किती पोकळ झाले आहे हे फक्त तिलाच ठाऊक असते. सिझेरियनच्या आधी भुल देण्यासाठी इंजेक्शन तिला देण्यात येते. त्या इंजेक्शन नंतर कंबरे पासून खालचा भाग सुन्न होतो आणि ही शस्त्रक्रिया पार पडते. साधारण पोटाची आठ आवरणे कापून एक नवीन जीव या जगात येतो. इंजेक्शनचा इफेक्ट जसा जसा कमी होऊ लागतो तस तस तिच्या वेदना वाढू लागतात. जागेवरून हलता येत नाही.
सुरुवातीचे दोन दिवस तर तिला काहीच करता येत नाही. वेदनांनी नकोसा जीव होतो. तरी ती हसत असते,आपल्या बाळाला बघून. या सर्वात बाळाला दूध पाजणे हे तिच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान असते. हळू हळू ती उठते. जसे दिवस जातात तसे ती स्वतःला सावरते. स्वतःच दुखणं बाजूला ठेऊन ती त्या चिमुकल्या जीवसाठी सारे काही करत असते. ती आता एक आई आहे हे सारखे स्वतःला बजावित असते. तिला धड वाकता येत नाही की खुप वेळ बसता येत नाही, जास्त वेळ उभ राहण्याची तर बोंबच. साधं कुस बदलताना सुध्दा सुरुवातीचे दीड दोन महिने तिचा जीव मेटाकुटीला येतो. पण तीच पाळण्यात झोपलेलं बाळ रडू लागलं तर ती कशी बशी धडपडत उठते त्याच्यासाठी. या सर्वात फक्त सिझेरियन म्हणून तिला नको ते सल्ले, उपदेश देणाऱ्याचे ही ती ऐकून घेत असते.
सिझेरियन झाले म्हणजे काहीतरी चुकीचे झाले आहे का हाच प्रश्न तिला पडत राहतो. ती बिचारी आधीच शारीरिक रित्या, मानसिक रित्या थकून गेलेली असते. तिला फक्त तिच बाळ सुरक्षित या जगात श्वास घेताना पाहून समाधान मिळते.प्रसूती हा त्या स्त्री चा दुसरा जन्म असतो. मग ती प्रसूती कशीही झाली असो. आव्हाने तिच्या सामोरं असतातच. तेव्हा तिला प्रश्न विचारून, नको नको ते उपदेश करून भंडावून सोडण्यापेक्षा तिला आधार देणे जास्त गरजेचे आहे. विशिष्ट प्रकारे झालेल्या प्रसूती मध्ये विशिष्ट प्रकारची काळजी घेतली जाते. त्यानुसार तिची काळजी घेतली पाहिजे. सिझेरियन बद्दल गैरसमज दूर केले पाहजेत. आणि त्या आईला शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ, निरोगी राहण्यासाठी मदत केली पाहिजे. सिझेरियन झाल्यानंतर पूर्ण पणे बरे होण्यासाठी लागणारा कालावधी हा vaginal birth पेक्षा अधिक आहे. पण योग्य रित्या काळजी घेतली, आहार घेतला तर हे आयुष्य भरासाठी मिळणारे दुखणे आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. प्रसूती नैसर्गिक रित्या होणेचे कधीही चांगले असते पण तरीही संपूर्ण परिसथितीनुरूप त्या आईची, बाळाची आणि त्या वेळेची गरज ओळखून प्रसूती होणे कधीही योग्य असते.
समाप्त.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.