दुपारी साधारण अडीच-तीनच्या सुमारास दिवाणखान्यातून कसला तरी आवाज आला. मी स्वयंपाक घरातूनच डोकावून पाहिले. खिडकीबाहेर एक कबुतर अडकले होते. त्याला मदत करण्यासाठी मी बाहेर आले. खिडकीला बाहेरून जाळी असल्यामुळे मला आतून काही विशेष करताही येत नव्हते. त्या कबुतराला नक्की काय झाले आहे हे सुध्दा मला कळत नव्हते. तरी मी इथून आतून मला काही मदत करता येईल का ते बघत होते. त्याला कुठे लागले आहे का ते बघण्याचा प्रयत्न करत होते. या सर्व प्रकारात दहा मिनिटे गेली. पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ होते. दुपारची वेळ असल्यामुळे कोणाला बोलवाव तर तसही कोणी आसपास नव्हतं. शेवटी मी बिल्डिंगच्या वॉचमनला कॉल करून बोलवायचं ठरवलं. वॉचमनला कॉल करणार तेवढ्यातच दुरून कुठून तरी अजून दोन कबुतरे आली. त्यांना पाहून मी थांबले. ते दोघेही त्या अडकलेल्या कबुतरा पाशी घिरट्या घालू लागले. एक अगदी त्याच्या कानापाशी गेला. जणू काहीतरी गुजबुजला असेच वाटले मला. आणि मग दोघेही उडून गेले.ते अडकलेले कबुतर अजूनही तसेच होते.काही क्षणातच त्या काबुतराने हळू हळू जाळी वर चढण्याचा प्रयत्न केला. त्याला तसे वर चढता ही आले.थोडा आत्मविश्वास आला असावा त्याला, थोडं धडपडतच त्याने उडण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न फसला. थोड थांबून अंदाज घेत त्याने पटकन भरारी घेतली. त्याने जशी भरारी घेतली तसे दोन कबुतरे पुन्हा त्याच्या जवळ आले. माझे पूर्ण लक्ष त्या तिन्ही कबुतरांकडे होते. ते अडकलेले कबुतर पुढे आणि ही दोन्ही कबुतरे त्याच्या आसपास उडत होते. ही तिच ती दोन कबुतरे होती का हे काही मला कळले नाही.. कदाचित तिच असावी. बघता बघता ते तिघेही खूप दूर निघून गेले.
प्रसंग तसा साधाच पण तरीही माझ्या विचारांचं चक्र सुरू झाले.आपल्या आसपास असणाऱ्या गोष्टी, व्यक्ती, घडणाऱ्या घटना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवून जातात असे मला नेहमी वाटते. तसा पक्षी हा माझा आवडता विषय. मला पक्षांबद्दल खूप कळतं असे मुळीच नाही.डाॅ. सलीम अली यांची मी खूप पुस्तकं वाचली आहेत असेही नाही.अमुक अमुक पक्षी मला आवडतो असेही नाही. पण त्यांच्याबद्दल अगदी लहापणापासूनच मला कुतूहल वाटते. ते जसे आकाशात उडतात तसेच मलाही उडता यावं असे नेहमीच मला वाटत आले. त्यांच्या या उडण्याच्या कलेचा मला नेहमी हेवा वाटतो. खरंच पुनर्जन्म वैगरे काही असेल तर मला एका दिवसासाठी का होईना पक्षी होता आले पाहिजे असे मला नेहमी वाटते. अगदी कावळा होता आले तरी चालेल. फक्त मुक्त आकाशात संचार करता आला पाहिजे. पक्षांचे बारकाईने निरीक्षण करण्याची सवय मला त्यांच्याविषयी असलेल्या या कुतूहलामुळे लागली. त्यातच भर पडली ती मेडिकल कॉलेजच्या शिकवणीची. कुठल्याही गोष्टीचा हात न लावताच बारकाईने दुरून निरीक्षण कसे करावे हे मी तिथे शिकले.फावल्या वेळेत आकाश कडे बघत पक्षांचा मुक्त संचार टिपायला मला आवडतो. या पक्षांचे ही काही नियम असतात. ज्या दोरीवर कबुतरे बसते त्या दोरीवर फक्त कबुतरेच बसतात. तिथे दुसरा कुठला पक्षी मध्येच शिरकाव करत नाही.असेच पोपटाचे, कावळ्याचे एकंदरीत सर्व पक्षांचे असते. हे पक्षी स्वतंत्र उडत असले तरी ते आपल्या समूहाशी जोडलेले असतात. एखाद्याला इजा झाली तर त्याच्या समूहातील इतर सदस्य लगेच त्याला मदत करायला हजर असतात. अर्थातच या सर्व माझ्या दृष्टीस पडलेलल्या गोष्टी आहेत. पक्षीच काय पण पृथ्वी तलवार अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सजीवच साधारण हे असेच असते. बारकाईने पाहिले तर हे सर्व एकमेकांना मदत करताना दिसतात, त्यांचे अलिखित असे नियम पाळताना दिसतात. फक्त या सर्वात हल्ली माणूस कुठेतरी कमी पडताना दिसतो. सर्वात समजूतदार सजीव असूनही जातीभेद, वर्णभेद,आर्थिक विषमता अशा वेग वेगळया प्रपंचात आणि वादात अडकलेला दिसतो. सध्या आपली अवस्था सुध्दा त्या अडकलेल्या कबुतरा सारखी झाली आहे. स्वतः तून बाहेर पडून आसपास पाहिले तर असे अनेक अडकलेले, त्रासात असलेले कबुतर म्हणजे आपल्याच समुहातली, आपल्यासारखीच माणसे आहेत. अगदी घर कामासाठी येणाऱ्या बाई पासून ते एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या दादा ताईं पर्यंत सर्वजण कुठे ना कुठे, काही ना काही कठीण प्रसंगांना तोंड देत आहेत. माझ्या संपर्कात असणाऱ्या माझ्या डॉक्टर मित्र मैत्रिणीपासून ते अगदी पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या अडचणी खूप वेग वेगळ्या आहेत. कोरोनाने कोणालाही सोडलं नाहीये. ज्यांना त्याची लागण झाली आहे त्यांचे दुखणे ते वेगळेच पण ज्यांना प्रत्यक्ष दर्शी लागण झाली नाही त्यांना ही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. परिस्थिमुळे खचून गेलेल्या लोकाबद्दल ऐकून, वाचूनही वाईट वाटत. त्यांच्या त्रासाचा आपण विचारही करू शकत नाही.”जीना ईसी का नमा है” म्हणत, परिस्थितीमुळे हतबल न होता बरेच लोक देश सेवेसाठी,आपल्या कुटुंब साठी आपले प्राण पणाला लाऊन आपल्या जीवाचा धोका पत्करून घराबाहेर पडत आहेत. “एक मेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” म्हणत आपण पण त्या दोन कबुतरांप्रमाणे एकमेकांना सांभाळायची आणि सावरायची गरज आहे. आपण कधी, कुठे, कशी, कोणाला आणि कसली मदत करू शकतो हे आपले आपणच ठरविले पाहिजे.
उडण्यासाठी आकाश पुन्हा मोकळे होईल,मळभ कधीतरी दूर होईल..जखमी झालेल्या पंखात थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा बळ येईल. पुन्हा नव्याने उडताना कदाचित थोडा त्रास होईल.आपण आता काहीच करू शकत नाही हा विचार सतत मनात येईल.ही वेळ संयमाची आणि मनोबल जपण्याची आहे, येणारा काळ निरुत्तर प्रश्र्नांची उत्तर घेऊन येईल.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.