माहेर… प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळचा विषय. अगदी नवविवाहित असो की वयस्कर प्रत्येकीच्या मनाचा हळुवार कोपरा म्हणजे माहेर. माहेर म्हणजे आठवणींचा खजिना. सासरपेक्षा श्रीमंत असो की गरीब पण प्रत्येक स्त्रीसाठी ते नेहमी खास असतं. आई, बाबा, बहीण, भाऊ हे तर जवळचे असतातच, पण त्या घरच्या भिंती, छप्पर, भांडी कुंडी यांमध्ये पण तिच्या आठवणी लपलेल्या असतात. माहेरी ती कितीही मोठी झाली तरी त्या घरची लाडाकोडात वाढलेली अल्लढ लेक असते, अगदी म्हातारपण आले तरी, पण सासरी त्या लेकीची एक प्रामाणिक पत्नी, कर्तव्यदक्ष सून, जबाबदार आई होते.
माहेरी एखादे काम करायचा फक्त कंटाळा आला म्हणून ते काम टाळता येते. सहज हवं तेव्हा बिछान्यावर लोळण्याची मज्जा माहेरीच अनुभवता येते. आईच ओरडणं, बाबांचं पाठीशी घालण या सगळ्यांत कधी मुलगी मोठी होते हे तिला देखील कळतं नाही. आई बाबांशी प्रत्येक वेळेला पटतच अस नाही, त्यांच्याशी वाद विवाद करण्याची, उगीचच रुसून बसण्याची एक वेगळीच गंमत असते. माहेरी असताना स्वयंपाक करताना हाताला थोडस लागलं तरी खूप रडू येत , त्याच हाताला सासरी आल्यावर स्वयंपाक करताना चटके सोसायची ताकद कोठून येते ते देवास ठाऊक. आज मला अमुक तमुक खायची इच्छा आहे तर तू तेच बनव, किंवा मला हे नको आहे जेवायला तू दुसर काही तरी बनव, अस आईला हक्काने सांगणारी लेक सासरी आल्यावर इतरांच्या आवडी निवडी जपायला लागते.टीव्ही च्या रिमोट साठी भांडणारी आता फावल्या वेळेत जे काही घरची मंडळी बघत असतील ते पाहण्यात धन्यता मानते. घराचा केंद्रबिंदू असलेली लेक सासरी कधी या सासर च्या घराचा आधारस्तंभ होते हे तिचे तिलाच कळत नाही. हळू रुळते ती संसारात, पण मनाच्या कोपऱ्यात माहेरची ओढ नेहमी तशीच राहते.
सासरी एकत्र कुटुंब पद्धत असो वा विभक्त कुटुंब पण प्रत्येक स्त्री तिच्या माहेरच्या आठवणीने व्याकुळ होताच असते. जसा जसा वेळ जातो माहेर आणि सासर दोघांमध्ये तिचा जीव अडकतो.
एक घर तिला जीवन देत तर दुसर तिला जीवनाचं उद्दिष्ट देत. माहेर म्हणजे उबदार प्रेमळ मिठी असते तर सासर म्हणजे तिने पाहिलेल्या सुंदर स्वप्नातलं घर असते.
समाप्त
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.