मी आई असले म्हणून काय झाले…
मी आई असले म्हणून काय झाले, मला सुध्दा थकवा येतो. मला सुध्दा स्वतःसाठी वेळ हवा असतो. मला सुध्दा वाटत असच बिछान्यात लोळत पडावं. मला सुध्दा वाटत कधी तरी स्वतः साठीच जगावं. मला सुध्दा वाटत पतीसोबत काही प्रेमळ क्षण अनुभवावे. मला सुद्धा वाटत त्यासोबत लेट नाईट मुव्हिला जावे. आई झाले म्हणून काय झालं मला सुध्दा वाटत मी माझं त्याच्यावरच प्रेम व्यक्त करावं. मला सुध्दा वाटत कधीतरी त्याच्यासाठी नटून बसाव.
मला सुध्दा वाटत कधीतरी एकट राहावं. माझ माझ्या बाळावर खूप प्रेम आहे पण कधी तरी वाटत त्यापासून काही तास दूर राहाव. कधी कधी होतो त्रास बाळाच्या रडण्याचा, ओरडण्याचा. याचा अर्थ मला भावना नाहीत असे होत नाही. कधी कधी होते चिड चिड अपूर्ण झोपेमुळे याचा अर्थ मी बाळाला कंटाळले आहे असा होत नाही.
मला सुध्दा वाटत कधीतरी निवांत टीव्ही पहावा. मला सुध्दा वाटत कधीतरी मैत्रिणीसोबत शॉपिंगला जावं. मला सुध्दा वाटत सहज एखाद्या मैत्रिणीशी फोन वर मनमुराद गप्पा माराव्यात. माझे स्वतः चे एक अस्तित्व आहे, ते मी जपावं. माझं शिक्षण मी घरी बसून व्यर्थ न करावं.
मी आई असले म्हणून काय झालं, सर्वच मला जमल पाहिजे असं कुठे लिहिलं आहे. मी आई आहे म्हणजे मी परफेक्ट असलच पाहिजे असे उगीच समाजाने नियम बनविले आहेत. जर मी नोकरी करते म्हणजे माझे माझ्या मुलांकडे लक्ष नाही असे होत नाही. जर मी घरी थांबून माझ्या मुलांना बघते तर मी घरकोंबडी आहे, माझी काही स्वप्नच नाही असे होत नाही.
मी कधी माझ्या बाळाशी कठोर वागले म्हणजे माझे माझ्या बाळावर प्रेम नाही असे मुळीच होत नाही. जर मी त्याला प्रेमाने कुरवाळले, त्याचे हट्ट पूर्ण केले तर मी त्याला बेशिस्त बनवत आहे असे देखील होत नाही. आई होण्या आधी मी एक माणूस देखील आहे.
माझ्याही काही वेदना आहेत, दुःख आहेत, शारीरिक व्याधी आहेत. बाळाला जन्म दिला म्हणजे आई पण येत नाही. ते त्याच्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणातून येत असत. बहरत असत. आई चा जन्म हा बाळासोबतच होतो. ती ही त्यासोबत मोठी होत असते, समजूतदार होत असते.प्रत्येक आई ही खास असते. माझ्यासाठी माझं बाळ माझं सर्वस्व आहे मला जमेल तस मी त्याला जपत असते. त्याच्या भविष्याच्या दृष्टीने मी झटत असते.आई असले म्हणून काय झालं स्वतः साठी थोड जगण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे.
एक आई.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.