Home » Marathi » Blogs » My little monster..

My little monster..

प्रेग्नंसी टेस्ट किटवरच्या त्या दोन गुलाबी रंगाच्या रेषांनी माझे आयुष्यच बदलून गेले. तो दिवस आजही आठवला की हसू येत. त्या दिवशी सुध्दा जेव्हा त्या दोन रेषा मी पहिल्यांदा पाहिल्या होत्या तेव्हा सुध्दा बराच वेळ हसतच बसले होते. लग्नाला तीनच महिने उलटले होते आमच्या आणि आम्ही ठरवलं की आपण बेबी प्लॅन करू. करिअर प्लॅनिंग, फायनान्स प्लॅनिंग, येणाऱ्या पुढच्या अगदी दहा वर्षांच प्लॅनिंग करून आम्ही हा निर्णय घेतला आणि असंही लगेचच कुठे रिझल्ट positive येणार अशा विचाराने आम्ही आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. आणि गंमत म्हणजे एका महिन्याच्या आतच आम्हाला ही गोड बातमी मिळाली. आम्हा दोघांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. माझी प्रेगनान्सी मी खूप एन्जॉय केली. त्रासही बराच झाला पण it’s part and parcel of pregnancy म्हणून तोही आनंदाने साजरा केला.

१७ डिसेंबर २०१९ माझा little monster म्हणजेच माझा मल्हार या जगात आला. आला तोच अगदी मोठे मोठे डोळे वटारून इकडे तिकडे पाहू लागला. डॉक्टर्स देखील म्हणाले छानच आहे तुमचं बाळ. जन्मापासूनच खूप वळवळा.. पहिले पाच दिवसच शांत झोपला तो, त्या नंतर आमची परीक्षाच घेणं सुरू केलं त्याने. २४ तासातून फक्त ४ तास झोपायचा. त्यात माझे c section झाल्यामुळे मला अगदी अधू झाल्यासारखे वाटत होते. पंधरा दिवसांतच मी गळून पडले होते तेव्हा.. मला हे जमणारच नाही असे झाले होते. खूप रडू यायचे. बाळासोबत फक्त एकटीने राहणे म्हणजे मला शिक्षा वाटायची. दिवसाची विश्रांती नव्हती की रात्रीची झोप. माझा नवरा आणि मी दोघेही अगदी हतबल झालो होतो. त्यातच मला दोन वेळा व्हायरल फिवर आला. बिछान्यातून उठून बसणंही शक्य होत नव्हतं. तो काळ माझ्या बाळासाठी आणि नवर्‍यासाठी खूप कठीण गेला. दोन महिने कसे बसे गेले आणि आम्ही स्थिरावलो. एवढ्यातच कोरोनाच संकट आलं. मनातून पूरती घाबरून गेले होते मी. माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना हीच भीती सतत असायची. त्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे घराच्या कामांचा पसारा होताच.. पण आता अस बसून आणि रडून चालणार नव्हत. आम्ही कामाला लागलो. वेळापत्रक बनवलं, कामाची विभागणी केली, चुकत चुकत शिकत होतो. अखेर आम्ही जमवलं. आम्ही म्हणजे आम्ही तिघांनीही जमवलं.. आई, बाबा म्हणून आम्ही मल्हारला समजून घेऊ लागलो आणि हळूहळू मल्हारला सुध्दा आम्ही कळू लागलो..

मल्हारमुळे मी खूपच बदलले.. थोडीशी बुजरी, स्वतःतच राहणारी मी त्याच्यासाठी स्वतःला बदलू लागले.. त्याला हसवण्यासाठी कधी मोठं मोठ्याने गाऊ लागले, तर कधी नाचू लागले. माझ्यासारख्याच इतर आयांशी संवाद साधू लागले. मला जमणार नाही वरून मला आता जमवावच लागेल म्हणत मी कंबर कसून तयार झाले. पूर्वी ८ तास झोप नाही मिळाली की चिडचिड करणारी मी आता ३/४ तास झोपून सुध्दा फ्रेश असते. हे कसं काय झालं ते मला अजूनही कळलं नाही. या वर्षभरात मल्हारने मला टाइम मॅनेजमेंट शिकवलं. त्याची काळजी घेण्यासाठी मी आधी माझी काळजी घेतली पाहिजे हे शिकवलं. आता मल्हार एक वर्षाचा झाला आहे. जन्मापासूनच फुल्ल energetic असणारा माझा हा Little Monster आता अजून मस्तीखोर झाला आहे. सगळीकडे दुडूदुड धावत असतो. दिवसातून कित्येकदा पडतो, मग थोडंसं रडतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. त्याला कितीही रडू आलं आणि कोणी त्याच्याकडे हसून पाहिलं की तोही लगेच स्वतचं रडू विसरून हसू लागतो. कितीही challenges आले तरी हसून त्याला समोर जायचं आणि आपले प्रयत्न करतच रहायचं हे मी माझ्या पिल्लाकडून शिकले. त्याच्या या बाललीलांमध्ये तो मला बराच बिझी ठेवतो. त्याच आवरून स्वतःच सावरण्यात आता मी पटाईत झाले आहे.

( पालकत्व हा एक कधीही न संपणारा प्रवास आहे.’ तीन महिने जाऊ दे मग थोड जमेल, अरे अजून वर्ष जाऊ देत मग बाळ शांत होईल, पाच वर्षांपर्यंत थोड जपावच लागत, दहावी होऊ देत मग काही काळजी नाही..’ अशा अनेक गोष्टी कानावर पडतात. पण बाळ मोठं झालं तरी आई बाबांचा प्रवास हा अविरत सुरूच राहतो. कधी बाळाला शिकवत तर कधी बाळाकडून शिकत आई बाबा आणि बाळ मोठे होतात.)

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *