Home » Marathi » Blogs » प्रेग्नंसी ते डिलिव्हरी – माझा अनुभव

प्रेग्नंसी ते डिलिव्हरी – माझा अनुभव

(मी लिहिलेल्या सिझेरियन भाग १ आणि २ ह्या दोन्ही लेखांना उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वाचकांनी मला अजून वेगवेगळे विषय सुध्दा सुचविले. बऱ्याच जणींनी मला माझा अनुभव सुध्दा विचाराला. त्यामुळे हा लेख मी लिहायचे ठरवले.)

माझ्या प्रेग्नंसीची सुरुवातच मळमळ,उलट्या आणि घेरी येण्याने झाली. तीन दिवस सतत मला मळमळल्या सारखे होत होते. थोडा तोल जात होता. कदाचित झोप नीट झाली नाही म्हणून त्रास होतो आहे असा माझा प्राथमिक अंदाज होता.

१५ एप्रिल २०१९ मी नेहमी प्रमाणे हॉस्पिटलमध्ये पेशंट ट्रीट करत होते. अचानक माझा तोल गेला आणि मी खाली बसले. मला थोडे गरगरल्या सारखे वाटत होते. पाणी प्यायले तर लगेच उलटी झाली.. काहीच ठीक वाटत नव्हते. म्हणून त्या दिवशी मी हॉस्पिटल मधून सुध्दा लवकर निघाले. मनात शंकेची पाल चुकचुकली. असेही आम्ही बाळासाठी ट्राय करतच होतो त्यामुळे मी घरीच Pregnancy किट द्वारे Pregnancy टेस्ट केली. माझी पाळी चुकून एकच दिवस झाला होता. त्यामुळे टेस्ट Positive येईल याची मला खात्री नव्हती. अगदी काही क्षण थांबून मी लगेच ते टेस्ट किट कचरा पेटीत टाकले.. कचरा पेटीचे झाकण बंद होणार तोच माझ्या नजरेत त्या दोन लाईन आल्या.. मी पटकन किट परत कचरा पेटीतून बाहेर काढले.. दुसरी लाईन खुप पुसटशी होती.. त्यामुळे मग मी अजून एक टेस्ट केली. ती positive आली.. मला विश्र्वासच बसेना.. मी अजून तीन वेळा टेस्ट केली.. तिन्ही positive आल्या.. माझ्या आनंदाला उधाण आली होती. मी लगेच माझ्या ऑफिसला गेलेल्या नवऱ्याला त्या टेस्ट किटचा फोटो पाठवला. त्यानेही लगेच मला फोन केला.. तो क्षण खुप खास होता.. सर्व समोर असूनही काहीच उमजत नव्हतं.. काय रिॲक्ट करावं कळत नव्हतं.. आम्ही फक्त फोनवर हसत होतो. मग एकमेकांच अभिनंदन करून लगेच स्त्री रोग तज्ञ कडे जाण्याचा आम्ही ठरवल. त्या आधी घरी काही सांगायचं नाही हे ठरलं. मी डॉक्टर कडे गेले.. डॉक्टरनेही मी प्रेग्नंट असल्याचे confirm केले.. तरी माझ्या नजरेत प्रश्न होते. डॉक्टरांच्याही ते लक्षात आले.. अजून खात्री करून घायची असेल तर आपण ब्लड टेस्ट करू शकतो हे त्यांनी मला सुचवले..HCG hormone टेस्ट मी करून घेतली.. तो रिपोर्ट संध्याकाळी आला.. त्यानुसार सुध्दा मी प्रेग्नंट असल्याचे सिध्द झाले.. मग रिपोर्ट घेऊन आम्ही घरच्यांनाही आनंदाची बातमी दिली.. सर्वच खुप खुश होते.. काहीही झालं तरी डिलिव्हरी सासरीच करायची हा माझ्या नवऱ्याचा हट्ट होता. सासरची सर्व मंडळी त्यासाठी तयार होते. माझ्या माहेरच्यांचा थोडा हिरमोड झाला. पण माझ्या नवऱ्याने त्यांना समजावलं. माझ्या सासरी बरच मोठं कुटुंब आहे.. तर माहेरी इन मीन तीन माणसं.. त्यामुळे काही लागलंच तर धावपळ करायला इथे सर्व आहेत.. आणि बाळ तीन महिन्याच झालं की तुम्ही घेऊन जा या दोघांना हे सांगून माझ्या नवऱ्याने त्यांची समजूत काढली..

आता आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली होती.. जेवढ जमेल तेवढं आपण Manage करायचं हे आम्हा दोघा नवरा बायकोच ठरलं होत.. आमच्या  घरा जवळच्याच आणि माहितीतल्या स्त्री रोग तज्ञांची आम्ही निवड केली..

पहिल्यांदा जेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले होते त्या दिवशी आम्ही दोघेही खूप इमोशनल झालो होतो. माझ्या आत काहीतरी वाढतंय.. एक नवीन आयुष्य लवकरच जन्म घेणार आहे याची ती गोड चाहूल होती..

मला सतत उलट्या होत होत्या.. कुठलाच वास सहन होईना.. पाणी सुध्दा पोटात राहत नव्हतं. चक्कर यायची.. डॉक्टरने औषधं दिली.. पण त्यानेही विशेष फरक नव्हता पडतं. गोळ्या बदलूनही झाल्या. काही गोळ्यामुळे मला constipation व्हायचं तर काही गोळ्यांमुळे खुप झोप यायची. अशा परिस्थितीत मला माझी Practice करणे कठीण जात होते. मला ब्रेक घ्यावा लागला.. तीन महिने थोडा त्रास होतोच असे सर्वच मला सांगत होते.. पण मला हा त्रास पाच महिने झाला.. त्यातच मला Pregnancy Induce Hypothyroidism झाला.. सकाळी उठल्यावर ती गोळी घेणं सगळ्यात कठीण काम होत माझ्यासाठी. कारण ती गोळी उपाशी पोटी घ्यावी लागते.. एकतर माझ्या पोटात पाणी सुध्दा राहत नव्हतं.. ती गोळी घेतल्या घेतल्या उलटून पडायची.. कसे बसे पाच महिने गेले. त्या नंतर घेरी येणं बंद झालं. Morning sickness बंद झाला.. पण Evening Sickness सुरू झाला.. संध्याकाळ झाली की उलट्या व्हायच्या.. पण आता थोडं अन्न खाता येतं  होतं. कुठल्या वासाने त्रास होता नव्हता.. बरच जंक फूड खायची ईच्छा व्हायची.. पण मी जंक सोबत Healthy फूड सुध्दा खाण्यावर भर दिला.

मी स्वतः फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे pre natal physiotherapy व्यायाम करायला सुरुवात केली. अर्थात हे सुरू करण्या आधी मी माझ्या स्त्री रोग तज्ञांशी सल्लामसलत केली. घर मोठं असल्यामुळे घरातल्या घरात वॉक सुरू केला. पाचव्या महिन्या पासून ते अगदी नवव्या महिन्या पर्यंत प्रत्येक महिन्यानुरुप आणि माझ्या शारीरिक क्षमते नुसार , गरजे नुसार मी Pre Natal Physiotherapy व्यायाम करत होते. सर्व टेस्ट, सोनोग्राफी व्यवस्थित पार पडत होते.

सहाव्या महिन्यापासून मला बाळाच्या जोरदार हालचाली जाणवू लागल्या होत्या. सर्व अगदी उत्तम सुरू होत. १९ डिसेंबर ही माझी Predicted Delivery Date होती. डोहाळे जेवणचा कार्यक्रम सुध्दा छान झाला.

नववा महिना सुरू झाला. आता थोड टेन्शन येऊ लागले होते. १५ डिसेंबर पासून मला बाळाच्या हालचाली जाणवण बंद झालं होत. १६ तारखेला आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला तपासले. बाळाच्या ह्रदयाच्या ठोक्यांची गती कमी झाली होती. पण बाळ अजुन खाली सरकलच नव्हतं. गर्भ पिशवीचे तोंड सुध्दा घट्ट बंद होते. बाळाच्या  ह्रदयाच्या ठोके गती कमी झाली असली तरी घाबरण्यासारखे काही नाही आहे असे डॉक्टरांनी आम्हाला समजावले. तरी त्या दिवशी बाळाच्या काळजीने मी खूप रडले. संध्याकाळी Mucus Plug Discharge झाला.  मी हे नवऱ्याला सांगितले.. आता कधीही हॉस्पिटलला जावे लागेल याचा अंदाज त्याला दिला..

त्या रात्री आम्ही झोपलो. रात्री ३ च्या सुमारास मला जाग आली.. मी Washroom मध्ये गेले. नंतर माझ्या लक्षात आले की सगळी कडे पाणी पडते आहे.. मी नीट पाहिले.. मी बेड जवळ आले.. मी जिथे झोपले होते ती जागा पाहिली. तिथे सुध्दा पाणी होते. मग माझ्या लक्षात आले माझी वॉटर बॅग ब्रेक झाली आहे.. मी त्या पाण्याचा वास घेऊन पाहिला.. त्याला कसलाही वास येत नव्हता.. म्हणजे बाळाने शी केलेली नाही हे Confirm झाले. मी माझ्या नवऱ्याला उठवले.. आम्ही हॉस्पिटल मध्ये फोन करून त्यांना कळवले. त्यांनी लगेच निघून या असे सांगितले.. आम्ही फ्रेश झालो आणि आधीच भरून ठेवलेली  माझी बॅग घेऊन घरच्यांना न कळवता दोघेही निघालो..

डॉक्टरांनी मला तपासले. पिशवीचे तोंड अजूनही घट्ट बंद होते. बाळ खाली सरकले नव्हते. बाळाच्या हृदयाचे ठोके कालपेक्षाही कमी जाणवत होते. त्यांनी मला pain induce करायचे इंजेक्शन दिले. बाळाच्या ह्रदयाच्या ठोके मॉनिटर करायचे मशीन सुध्दा लावले होते.. बाळाचे ठोके अजुन कमी होऊ लागले.. मला रक्त स्त्राव सुरू झाला. गर्भ पिशवीचे तोंड २ cm एवढेच उघडले होते.

डॉक्टरांनी आम्हाला संपूर्ण परिस्थिती समजावली. ‘आपण अजून थोडा वेळ थांबू शकतो.. पण रिस्क सुध्दा वाढेल.. ‘
आम्हाला अशीही रिस्क नको होती.. त्यामुळे आम्ही c section चा निर्णय घेतला. घरच्यांना सुध्दा फोन करून कळवले. तयारी झाली.. आता थोड्याच वेळात आम्ही एका नवीन पाहुण्याला भेटणार होतो. OT मध्ये गेल्यावर माझ्या ह्रदयाची धडधड वाढली. भूल तज्ञ आले. त्यांनी injection दिले. थोड्या वेळाने मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.. मी लगेच डॉक्टरांना सांगितले.. भूल तज्ञांनी मला अजून एक इंजेक्शन दिले.. थोड्या वेळाने मला गुंगी येईल असे सांगितले.. डॉक्टर्स माझ्याशी गप्पा मारत त्यांचं काम करत होत्या.. बाळाच्या रडण्याचा मी आवाज ऐकला.. माझे डोळे जड झाले होते.
मी डॉक्टरांना विचारले,” बाळ कसे आहे..?”
त्या म्हणाल्या,” खुप छान आहे.. मुलगा झाला तुम्हाला.. अभिनंदन..” बालरोग तज्ञही आले.. त्यांनी बाळाला तापसले.. ,”तुमचं बाळ खुप मस्त आहे असे त्यांनी मला सांगितले..”
डॉक्टरांनी मला बाळाचा चेहरा दाखवला..” आम्ही बाळाला छान तयार करून तुम्हाला देतो.. तुम्हाला आता झोप लागेल म्हणून मी तुम्हाला असं दाखवते आहे,” असे म्हणाल्या.. अगदी ओझरताच पाहिलं मी माझ्या बाळाला..  मला झोप लागली..

संध्याकाळी चारच्या सुमारास मला जाग आली. माझं बाळ झोपल होत. संपूर्ण जग बदललं होतं आम्हां दोघांचं.. आम्ही आई बाबा झालो होतो.. एकमेकांच अभिनंदन करून मी बाळाला जवळ घेतलं.. त्या दिवशी मला हलता ही येत नव्हतं.. डॉक्टर visit ला आले.. मला anxiety अटॅक आल्यामुळे मला झोपेचं इंजेक्शन द्यावे लागले हे त्यांनी सांगितलं.. पुढच्या सूचना दिल्या..

मला पान्हा फुटला नव्हता.. बाळाला फॉर्म्युला मिल्क दिले जात होते..
घरची मंडळी तर होतीच माझ्या सोबत, पण २४ तास माझा नवरा माझ्या सोबत होता.. सप्तपदी घेताना प्रत्येक पावलावर ,प्रत्येक परिस्थितीत साथ देण्याचे जे वचन त्याने दिले होते जणू काही तो त्याचीच पूर्तता करत होता. रात्री माझ्यासोबत राहण्याची सुध्दा त्याने परमिशन घेतली होती.. घरात स्त्रिया होत्या.. पण या परिस्थितीत मला त्याची जास्त गरज आहे हे तो जाणून होता.. आमचा स्पेशल रूम असल्यामुळे हॉस्पिटल वाल्यांना सुध्दा काही प्रोब्लेम नव्हता.. बाळंतपणं फक्त एक स्त्रीचं काढू शकते हे त्या दिवसापर्यंत मला वाटतं होतं.. पण त्या दिवसानंतर माझे मत बदलले..

तीन दिवस झाले तरी मला पान्हा फुटला नव्हता.. डॉक्टरांनी औषधं दिली.. आई होऊनही मी अपूर्ण असल्याची भावना माझ्यात येत होती.. डॉक्टर आणि माझा नवरा मला समजावत होते.. तरी मला खूप रडू येत होते.. चौथ्या दिवशी मला पान्हा फुटला.. पण बाळाला तीन दिवस चमच्याने दूध प्यायची सवय लागल्यामुळे त्याला दुध पिणे जमत नव्हते. अशाने मला गाठी होऊ लागल्या..

Lactation Consultant ची आम्ही मदत घेतली.. त्यांनी मला Guide केले.. बऱ्याच गोष्टी समजवल्या.. माझ्या शंकांचे निरसन केले. हळू हळू मला बाळाला दूध पाजणे जमु लागले. त्या नंतर कधी ही माझ्या बाळाला फॉर्म्युला मिल्क देण्याची गरज भासली नाही.

नव्या जबाबदारीमुळे मी गांगरून गेले होते.. C section मुळे आधीच खुप ञास होत होता.. पण या सर्वात माझे कुटंब माझ्या सोबत खंबीर पणे उभे राहिले.. काही अडलं तर डॉक्टर सुध्दा होतेच.. अगदी डाएट पासून ते मालिश कधी कशी करायची.. काय काय काळजी घ्यायची.. या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या.. सर्वांच्या मदतीने मी २ महिन्यात recover झाले..

Pre Natal Physiotherapy व्यायामामुळे मला लवकर recover होता आले. आणि हळू हळू स्त्री रोग तज्ञांच्या सल्ल्यानेच  Post Natal Physiotherapy व्यायाम करायला सुरुवात केली..  पोटावर ताण येणार नाही. काहीही शारीरिक ईजा होणारा नाही याची काळजी घेत हे व्यायाम मी करत होते. वाढलेले वजन कमी करण्यावर माझा भर नव्हता.. तर माझी शारीरिक ताकत , स्नायूंची मजबुती राखणे, म्हणजे बाळाला सांभाळताना मला जास्त कष्ट पडणार नाहीत हे माझे मुख्य लक्ष होते.. आणि वजनाचे म्हणालं तर बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळणे गरजेचे होते त्यामुळे कुठल्याही प्रकारचे हार्ष डाएट करणे  आणि माझ्या शरीरावर ताण येईल असेल व्यायाम करणे मी टाळले.
आता माझे बाळ दहा महिन्यांचे आहे.. आता मी वजन कमी करण्याच्या दृष्टीने सुध्दा पावले उचलली आहेत. बाळाच्या लीला पाहत, माझा मातृत्वाचा प्रवास सुरू आहे.

महत्त्वाच्या गोष्टी –

  • मी कुठल्याही विशिष्ठ प्रकारच्या प्रसूतीचे समर्थन करत नाही आहे. नैसर्गिक रित्या होणारी कुठलीही गोष्ट ही आपल्यासाठी चांगलीच असते. पण बरेचदा सिझेरियन झाले म्हणून त्या बाईला दोष दिला जातो. अर्थात असे सर्वच ठिकाणी होते असे मी म्हणत नाही आहे. काही ठिकाणी डॉक्टर्स देखील स्वतः च्या comfort  चा विचार आधी करतात. म्हणून सर्वच डॉक्टर्स तसेच असतात असे होत नाही.  त्या स्त्रीसाठी आपल्याला मानसिकता बदलायची गरज आहे. प्रसूती कशीही झालेली असली तरी त्या स्त्रीला तिच्या कुटुंबाच्या आधाराची आणि प्रेमाची गरज असते. जर तुम्ही माझे दोन्ही लेख वाचले असतील तर हे मुद्दे मी माझ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
  • Pre natal आणि Post Natal Physiotherapy व्यायाम हे लायसेन्स फिजिओथेरपिस्ट काढूनच शिकावे. स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • स्त्री रोग तज्ञ किंवा कुठलाही डॉक्टर आपण स्वतः निवडतो, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्याला मदत करायला त्या त्या विषयाचे एक्सपर्टस उपलब्ध असतात.. त्यांच्याकडून योग्य ये मार्गदर्शन घेणे केव्हाही उत्तम.
  • मी जे जे केलं तेच योग्य होत असे माझे म्हणणे नाही.

प्रत्येक Pregnancy वेगळी असते. मी माझा अनुभव मांडला आहे.
तुमचा अनुभव काय होता?.. मला नक्की सांगा.

******************************************समाप्त****************************************************

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *