संध्याकाळी सहज खिडकीबाहेर आभाळाकडे नजर गेली. अस्ताला जाणारा सूर्य नजरेस पडला. आपल्या पुढच्या प्रवासाकडे जाणाऱ्या एखादया प्रवाशासारखा भासला तो मला. आकाशात सर्वत्र रंग उधळून रंग-उत्सवच साजरा करत होता तो. सर्वत्र पसरलेला पिवळसर तांबडा रंग ,मध्येच कुठेतरी निळसर रंगाच्या छटा विलक्षण सुंदर वाटत होत्या. जस जसा सूर्य अस्ताला जात होता तस आभाळातील दृश्य क्षणा क्षणाला बदलत होती. दूरवर पसरलेले ढग जणू कुठेतरी एखादया उंच टोकावर वसलेल्या शहरासारखे वाटत होते. क्षणा क्षणाला बदलणाऱ्या रंगांच्या, दूरवर पसरलेल्या वेगवेगळ्या छटा कधी युध्दात जायबंदी होऊन रक्तबंबाळ झालेल्या योध्या सारख्या वाटत होत्या, तर कधी लाजून लाल झालेल्या नववधू सारख्या भासत होत्या. सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वीला अभिषेक घालत होता. जस जसा सूर्य लोप पावत होता तस तस आभाळात इतर ताऱ्यांचे अस्तित्व उठून दिसू लागले..
सूर्यास्ताची भौगोलिक करणे बाजूला ठेवली तर हा सूर्य बरच काही शिकवून जातो. अगदी Philosophically बोलायच झालेलच तर जश्या नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू असतात, तसाच हा सूर्यास्त सुद्धा दोन वेगवेगळ्या संकल्पना देऊन जातो. एक तर जे उदयाला येत त्याचा अस्त हा कधी ना कधी होतोच आणि दुसर म्हणजे अस्त होणार आहे हे माहीत असूनही सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतोच. या दोन्ही संकल्पना जीवनच सार सांगून जातात. कित्येक लेखक, कवी यांनी सूर्यास्ताचे खूप सुंदर वर्णन केले आहे. दिवस कसाही असला तरी त्याचा शेवट सुंदरच होतो असा आशावादी विचार काहींनी सूर्यास्ताला बघून मांडला आहे तर, वेळ कितीही सुंदर असली तरी तिचा शेवट हा होतोच असा विचार काहींनी मांडला आहे. कोणाला सूर्यास्त हा निसर्गाच्या किमयेचा एक उत्तम नमुना वाटतो. तर कोणाला सक्तीची विश्रांती घेण्यासाठी प्रवृत्त करणार एक कारण वाटतो. कोणाला सूर्यास्त पाहून प्रेम कविता सुचल्या तर कोणाला विरह कविता. कोणाला सूर्यास्त हा आपल आयुष्य RESET करायच बटण वाटला तर कोणाला STOP च बटण. कोणाला सूर्यास्त जीवन कस असाव हे सांगणार देवदूत वाटला, तर कोणाला मृत्यू कसा असावा हे सांगणार यमदूत वाटला. थोडक्यात काय तर सूर्यास्त पाहताना प्रत्येकाची मनःस्थिती जशी होती तसा सूर्यास्ताचा उल्लेख प्रत्येकाने केला आहे. प्रत्येकाचे विचार जसे होते तसा सूर्यास्त त्याला दिसला आहे. ते म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी अगदी तसच. सूर्यास्त तर फक्त एक निमित्त आहे. प्रत्येक कवी आणि लेखकाला त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब त्या सूर्यास्तात दिसले. माणूस नेहमी दररोज घडणाऱ्या घटनांकडे स्वतःच्या आणि स्वतःला पटेल अशा दृष्टीकोनातूनच बघत असतो. हा सर्व विचार करता करता सूर्य कधी नाहीसा झाला माझ्या लक्षातही आले नाही.
Mehmet Murat ची सूर्यास्ताबद्दलची एक व्याख्या मला फार आवडली होती , ती म्हणजे ,“The Strange Thing About The Sunset Is That, We Actually Don’t Want The Sun To Set, We Want It To Stay Right On The Horizon, Not Above It, Not Below It, Just Right On It.” परंतु आपल्याला कितीही वाटल तर सूर्य त्याच्या वेळेत अस्ताला जातो आणि दुसऱ्या दिवशीही त्याच्या वेळेत उदयाला येतो. आपल्याला कितीही वाटले तरी आपण त्याला क्षितिजावर थांबवून ठेऊ शकत नाही. आयुष्य हि असेच असते ना!!
ह्या फक्त माझ्या सूर्यास्ताबद्दलच्या कल्पना आहेत. अर्थातच हा सूर्यास्त प्रत्येकासाठी फार वेगळा असतो. प्रत्येकाला तो फार वेगळा भासतो. दैनंदीन जीवनामध्ये आपण इतके व्यस्त असतो की मान वर करुन सूर्यास्त पाहायची फुरसत सुद्धा नसते. पण सध्याच्या कंटाळवाण्या दिवसात थोडा वेळ काढून खिडकीतून बाहेर डोकावून पाहा. प्रत्येक सूर्यास्त फार वेगळा वाटेल.
कोणीतरी म्हटले आहे “There Is A Sunrise And Sunset Every Single Day, And They Are Absolutely Free. Don’t Miss So Many Of Them.”
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक