( सत्य घटनेवर आधारित)
माझे डिग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एक Pediatrics फिजिओथेरपी क्लिनिक जॉईन केलं होतं. ही गोष्ट त्या वेळची आहे. नुकतंच शिक्षण पूर्ण करून माझी प्रोफेशनल लाईफ सुरू झाली होती. तिथे काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडील आपल्या मुलांसाठी काय काय करू शकतात हे नव्याने कळलं. ते आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत ते कळलं. तिथे येणारे प्रत्येक पालक हे खुप खास होते. आपल्या मुलांचं वेगळे पण त्यांनी स्वीकारलं होत. मुलांच्या वर्तमान आणि भविष्यासाठी ते जे काही करू शकत होते ते करण्याची त्यांची इच्छा आणि तयारी होती..त्यांच्यातल्याच एका आईची ही गोष्ट आहे.
आठवड्यातून तीन दिवस एक बाई आपल्या आठ वर्षाच्या मुलीला घेऊन यायची. कधीतरी तिच्या सोबत तिचा तीन वर्षांचा चिमुरडा सुध्दा यायचा. ‘Cerebral pasly with spastic diplegia’ ची केस होती ती.तारा नाव होतं मुलीच. त्या केस बद्दल एवढं सोडून मला काहीच माहीत नव्हते. ती केस मी पाहत नव्हते. पण तरीही त्या बाईच्या सदैव हसतमुख चेहऱ्या मुळे तिच्या कडे लक्ष जायचं. तिचा तिथे असलेला प्रेसेन्स लक्षात यायचा. मला तीन महिने झाले होते तिथे. मी दर वेळी फक्त तिलाच तिच्या मुलीला घेऊन येताना पाहिलं होतं. बरेचदा मुलांचे फिजिओथेरपीचे व्यायाम शिकण्यासाठी दोन्ही पालक अधून मधून येत असतात. जेणे करून त्यांना देखील ते घरी काही प्रमाणात करता येतील. मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी सुध्दा पालक अधून मधून फिजिओथेरपिस्टची भेट घेत असतात. पण या केस मध्ये असे नव्हते. नेहमी तीच एकटी हे सर्व करायची. ती विधवा तर नव्हती. कारण सौभाग्याच्या सर्व गोष्टी ती परिधान करायची. सदैव हसतमुख असायची त्यामुळे तिच्या जीवनात विशेष असं काही दुःख असेल असे वाटत नव्हते. ती नेहमी एकटीच का येते का प्रश्न मला बरेचदा पडायचा. पण त्या केसशी संबंध नसल्यामुळे मला त्या बद्दल काही खास माहित नव्हते आणि मी ते माहित करून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही.
एके दिवशी मला थोड लवकर निघायचं होत आणि नेमकं तेव्हाच ती बाई सुध्दा मुलीला घेऊन घरी जायला निघाली होती. मी रिक्षाने जाणार असल्यामुळे मी तिला विचारले,’ तुम्हाला कुठे सोडू का’, तीचं घर माझ्या वाटेतच असल्यामुळे ती तयार झाली. मग नंतर मी आणि तिने मिळून तिच्या व्हीलचेअर वर बसलेल्या मुलीला रिक्षा मध्ये बसवलं, आणि व्हीलचेअर फोल्ड करून रिक्षा मध्ये घेतली. आम्ही दोघीही बसलो आणि आमचा प्रवास सुरु झाला. सुशीला नाव होतं तीच हे मला पहिल्यांदा कळलं.
मी तिला सहजच विचारल,’ नेहमी तुम्ही एकट्याच येता ताराला घेऊन, तुमच्या घरी अजुन कोणी नाही आहे का? ‘,
त्या वर ती पटकन म्हणाली,” एक वर्ष झाल मॅडम मी माझ्या नवऱ्याला सोडून माझ्या माहेरी राहायला आले”.
तिच्या या उत्तरावर मी पुढे काही न विचारणं योग्य समजल. कारण हा त्यांचा पर्सनल विषय होता. पण पुढे तीच बोलू लागली. “स्वतः च्या पोटच्या मुलीसोबत सुध्दा कोणी बाप असा कसा वागू शकतो याची मला कमाल वाटते मॅडम”.
मी प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडे पाहिले. ती बोलू लागली,” तारा जन्मापासूनच अशी आहे. खुप ञास झाला होता मला हे समजल्यावर. पण आता पोटच्या गोळ्याला असं वाऱ्यावर कसं सोडणार .त्यासाठी काही तरी करावं लागणारच ना. आम्ही स्वतः ला सावरलं. योग्य ते उपचार सुरू केले. डॉक्टर सुध्दा चांगले भेटले.पुढे डॉक्टर्स नी फिजिओथेरपी बद्दल सुध्दा सांगितलं. तेव्हा नवरा पण माझा खुप चांगलं वागायचं. त्याला पण काळजी होती ताराची. आम्ही दोघं मिळून करायचो सर्व तीच. मला तर दुसरे मुलं सुध्दा नको हे मी त्याला सांगितलं होते. तो ही तयार होता त्या गोष्टीसाठी. अशीच चार वर्ष गेली. दुसऱ्या मुलाचं खुळ घेतलं त्याने डोक्यात. मला नकोच होतं. ताराकडे दुर्लक्ष होईल असं मला वाटायचं. पण त्याने हमी दिली. तस काही नाही होणार. शेवटी आम्ही दुसऱ्या मुलाचा निर्णय घेतला. त्याच्या अपक्षे प्रमाणे मुलगा झाला. त्याला हेच हवं होत नेमक. त्याने ताराला वाऱ्यावर सोडलं. बाळंतपणानंतर मला सुध्दा ताराच करायला थोडा त्रास व्यायचा. मी सगळं करेन असं म्हणणारा माझा नवरा आता बदलाला होता. वर्ष सरलं पण त्याच्यात काही सुधारणा नाही. आमची भांडणं व्हायला लागली. मी त्याला विचारलं नक्की काय हवं आहे तुला.
तेव्हा म्हणाला तो, “तुला काय कमी आहे. तुझ्याकडे नीट लक्ष देतोय मी, मुलाकडे बघतो, तरी तुझं तारा तारा पुराण सुरू असतं. ती कधीच बरी नाही होणार. कितीही केलं तरी ती अशीच राहणार. एक तर अशी आणि त्यात मुलगी. कशाला ते ओझ वाहायच. तू मुलाकडे लक्ष दे. मजेत रहा.”
मला ते पटलं नाही. मी ताराला आणि मुलाला घेऊन माहेरी निघून आले. मला माहित आहे माझ्या नवऱ्याचा जीव मुलामध्ये आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं मुलगा हवा असेल तर मुलीला सुध्दा स्वीकारावं लागेल. तिच्या कडे नीट लक्ष द्यावं लागेल. नाही तर तू विसर आता मुलाला. माझ्या माहेरी सुध्दा आई आणि बाबाच आहेत. घरच्यांनी आम्हा दोघांमध्ये सुला करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या मत वर ठाम आहे. नवरा येतो कधी तरी मुलाला भेटायला आणि मला समजवायला.. पण मी काही ऐकत नाही. जिथे माझ्या मुलीला जागा नाही तिथे मी जाणार नाही.” मी अवाक होऊन सर्व ऐकत होते.
ती बोलतच चालली होती,” मॅडम मी दहावी नापास आहे. नोकरी तर करू शकत नाही. चार घरी स्वयंपाकाचे काम करते. त्यातून बऱ्या पैकी पैसे मिळतात.. मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. मला जमेल तस करते आहे मी दोन्ही मुलांचं… चला माझं घर आलं. इथे पुढेच चाळीत राहते मी. भय्या जी याहा पे रुका दो असे ती रिक्षा वाल्याला म्हणाली.”
एक छानशी smile देत उतरली. ताराला खाली उतरवण्यासाठी मी आणि रिक्षा वाल्याने तिला मदत केली.. माझा निरोप घेऊन ती निघाली. माझ्या मनात खुप प्रश्न होते. तिचा नवरा परत आलाच नाही तर, त्याने हिला सोडलं तर, त्याने दुसर लग्न वैगरे केलं तर.. पण खरंच मला तिची कमाल वाटली. ही बाई सॉलिड आहे हेच पटकन माझ्या मनात आले.
फिजिओथेरपिस्ट हे पेशंट सोबत बराच काळ घालवतात. बरेचदा उपचार काही महिने ते काही वर्ष सुध्दा चालतात. त्यामुळे केवळ पेशंट आणि डॉक्टरच नात न राहता बरेच पेशंट आम्हाला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात. स्वतःची सुख दुःख सांगतात. आनंद आमच्या सोबत सेलिब्रेट करतात. या घटनेला साधारण सहा वर्ष झाली आहेत पण सुशीला माझ्या मनावर एक वेगळीच छाप सोडून गेली आहे. आईही कोणाचीही असो, तीच वय काहीही असो, परिस्तिथी कुठलीही असो पण ती तिच्या लेकरासाठी काहीही करू शकते याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुशीला. स्वतःच्या मुलींसाठी खंबीर पणे उभं राहणाऱ्या त्या दुर्गेला खरच माझा शतशः प्रणाम..🙏
( काही कारणामुळे या कथेतली नाव बदलली आहेत.)
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.