सप्तरंगप्रेमाचे – निवारा
खरतर कमतरता अशी कशाचीच नव्हती,
पण तुझ्या येण्याने विलक्षण असे काही तरी मिळाल्याचा आनंद झाला होता.
आयुष्याच्या प्रत्येक वादळात मला जपून ठेवणारा माझा हक्काचा निवारा मला सापडला होता.
सप्तरंगप्रेमाचे – साक्ष
विश्वासाच्या धाग्यात मैत्रीचे मोती गुंफले , प्रेमाच्या रेशीम गाठीत हे नाते खुलले. सप्तपदी चालून तुझी अर्धांगिनी झाले , तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष द्यायला दोन चिमुकले पाय आपल्या सोबतीला आले.
सप्तरंगप्रेमाचे – अव्यक्त प्रेम
मी तर तुझीच आहे पण तू कधी माझा होशील का ? माझ्या गोड स्वप्नांत तूही सहभागी होशील का ? त्या गोड स्वप्नांना तू कधी सत्यात उतरवशील का ? माझ्या अबोल प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळ नाहीत, तू उत्तर देशील का ?
सप्तरंगप्रेमाचे – प्रवास – मैत्री ते प्रेमाचा
मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे मला कळलेच नाही,
मी तुझ्या रंगात अशी रंगले की माझी मी अशी उरलेच नाही.
सप्तरंगप्रेमाचे – सहवास
तू नसतानाही तुझ्या असण्याचा भास असतो. कितीही मिळाला तरी मला तुझा सहवास अजून हवाहवासा वाटतो.
सप्तरंगप्रेमाचे – वेड मन.
तुझं असणं, तुझं दिसणं, तुझं रुसणं, तुझं तुझ्यातच रमण सारंच मला फार आवडतं.सरणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक माझे हे वेडे मन तुझ्यावर अधिकच भाळतं.
सप्तरंगप्रेमाचे – निशब्द
बरेच काही सांगायचे तुला असे मी ठरवीत असते.पण तू समोर येताच सारे काही आसमंतात विरून जाते. तू डोळ्यांसमोर आल्यावर तुझ्याच धुंदीत बेधुंद होते.तू निघून जाताच भानावर येते. मग स्वतः वरच चिडते, स्वतः वरच रागावते. स्वतः लाच समजावते. तुला माझ्या मनातल सांगायला पुन्हा नवीन शब्द सुचवते. पुन्हा सारे तसेच घडते, मी स्तब्ध होते.तुझ्यासमोर मी पुन्हा पुन्हा निःशब्द होते.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.