क्रमशः
दुसरा दिवस उजाडला आणि सावंत कुटुंब निघाले . अबोलीच्या सासरी पोहोचले.. अबोलीच सासर म्हणजे आलिशान महाल. इथे आपल्या लेकीला काहीच दुःख नसेल. सुख तिच्या पायाशी लोळण घेत असेल. असाच विचार अण्णांच्या मनात आला. अमृतलाही असच सासर मिळो हीच आता एक इच्छा होती त्यांची…
सावंत कुटुंबीय अचानक आलेले पाहून रमाकांत देवधर म्हणजे अबोलीचे सासरे थोडे नाराज झाले. मुकुंद, अबोलीचा नवरा त्यांना भेटायला खाली आला. त्यांच्या पाय पडून त्याने विचारपूस केली. हळू हळू घरातली इतर मंडळी देखील त्यांना भेटायला आले. पण अबोली जवळपास अर्ध्या तासाने त्यांना भेटली. निळ्या रंगांच्या काठ पदराच्या साडीत, नखशिखांत दागिने ल्यायलेली अबोली त्यांच्या समोर आली.निळा रंग तिच्या सौंदर्यात भर पाडत होता.सासरच्या मंडळीं सामोरं एक फॉर्मल विचारपूस झाली.
अण्णा अबोलीच्या सासर्यांना म्हणाले,” जर तुमची आणि जावई बापूंची हरकत नसेल तर आम्ही चार दिवसांसाठी अबोलीला घरी घेऊन जातो. अमृताला बघायला मंडळी येणार आहेत. तेव्हा अबोली तिथे असावी असा तिचा हट्ट आहे. तर कृपया जमत असेल तर…” असे बोलून अण्णांनी रमाकांत देवधरांसमोर हात जोडले..
“मी कोण परवागी देणारा.. त्याच ठरवतील.. त्यांना यायचं आहे की नाही ते…” देवधर आपल्या राकट आवाजात म्हणाले..
अबोली म्हणाली,” आई अण्णा नाही जमणार मला यायला.. इथे खुप काम आहेत..”
त्यावर अमृता पटकन चिडली आणि म्हणाली, ” काही नाही हां ताई.. बस झाली तुझी कामं.. तू येते आहेस आमच्या सोबत.. नाहीतर बघ मी त्या मुलाला भेटणार सुध्दा नाही.. “
अबोली म्हणाली,” अमु अग अस नको करु..समजून घे ना..”
” ताई या वेळी नाही .. तुला यावच लागेल..” अमृता हट्टाला पेटली होती.
मुकुंद म्हणाला,” अबोली जाऊन या दोन दिवसांसाठी.. आम्ही येऊ तुम्हाला न्यायला.. एकुलती एक मिहूनी एवढा हट्ट करते आहे.. जाऊन या.. चला आपण तुमचं सामान पॅक करू..”
सावंत कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.. मुकुंद आणि अबोली सामान भरायला गेले.. अबोली बॅग घेऊन आली. आणि सर्व जण निघाले..
प्रवास सुरू झाला.. अबोली अबोलच होती. कोणी काही विचारले तर त्याच प्रश्नाची उत्तरं देत होती. मोजकेच बोलत होती. अण्णांच्या आणि अमृताच्या लक्षात आले नाही.. पण तिच्या आईने हे चांगलेच हेरले होते.. मंडळी घरी पोहोचली.. रात्रीच जेवण उरकून अबोली सरळ झोपायलाच निघून गेली.. दुसऱ्या दिवशी अमृताला पाहायला पाहुणे आले. कार्यक्रम नीट पार पडला.. त्यांना अमृता आवडली.. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला देखील.. तुमचा निर्णय सांगा म्हटल्यावर अण्णा म्हणाले,” अहो त्यात सांगायचं काय.. आमच्याकडुन होकार आहे..”
अमृता मध्येच पटकन म्हणाली,” मला माफ करा.. पण मला थोडा वेळ हवा आहे.. आम्ही एकमेकांना नीटसे ओळखतही नाही. जर तुम्हाला चालणार असेल तर मला मुलाला अजून २/३ वेळा भेटायचे आहे.”
अमृताचे हे बोलणे ऐकून अण्णा भडकले.. वातावरण थोडे तापले होते.. मी विचार करून कळवतो असे नवऱ्या मुलाचे बाबा म्हणाले आणि ती मंडळी निघाली..
अण्णा खुप चिडले..” अक्कल नाही आहे का तुला..? काय कमी आहे त्या मुलात.. हे बघ अजूनही आपण गावात राहतो.. इथे हे असे प्रकार नाही चालत.. तुमची चांगल्या घरात लग्न व्हावीत, तुम्हाला श्रीमंत सासर मिळव यासाठी मी तुम्हाला उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.. याचा अर्थ असा नाही की मनाला येईल तस वागशील तू.. “
अबोली मध्ये बोलली,” अण्णा अमृता योग्यच म्हणाली.. आपण ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याला जाणून घ्यायचं पूर्ण अधिकार आहे तिला.. अण्णा मला माहित आहे आमचं जीवन सुखी व्हावं म्हणूनच नेहमी झटलात तुम्ही.. पण अण्णा पैसाच सर्व काही नसतो.. आणि मुळात आम्हाला त्या ऐशो आरामाची गरज आहे का हे तुम्ही आम्हाला एकदा विचारलं असतं तर बर झालं असतं.. प्लिज असा घाईत निर्णय घेऊ नका.. चार ठिकाणी चौकशी करा. थोडा वेळ द्या.. मग निर्णय घ्या.. शेवटी आयुष्य भराचा निर्णय आहे..”
अबोली एवढं बोलून निघून गेली तिच्या खोलीत.. तिच्या आईला सतत जाणवत होत कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे.
संध्याकाळचा चहा झाल्यावर अबोली आईच्या खोलीत गेली.. आई तिचे कपाट आवारात होती. अबोली कपाट जवळ गेली.. आईच्या साड्यांवर हात फिरवत म्हणाली ,” आई किती सुंदर साड्या आहेत तुझ्या”
त्यावर ताई म्हणाल्या,” काहीतरीच काय… माझ्या साड्या आणि सुंदर.. अग सगळ्यात सुंदर साड्या तुझ्याकडे आहेत.. तुझ्या साड्यांसमोर तर या किती फिक्या वाटतात.. आणि तू यांना सुंदर म्हणातेस..”
अबोली म्हणाली..” त्या भरजरी साड्यांमध्ये जीव घुसमटतो.. नकोस वाटत.. बांधून ठेवल्या सारख वाटत. मोकळे पणा नसतो.. या साड्या कशा ..नेसल्यावर आपल्याच अंगाचा भाग वाटतात… बोलता बोलता अबोलीची नजर गुलाबी रंगाच्या साडीवर गेली.. ती म्हणाली,” आई ही तीच आहे ना जी मी नेसायचे…”
ताई म्हणाल्या, ” हो तीच आहे.. तुला माझ्या साड्या अगदी लहानपणा पासूनच खुप आवडायच्या.. ही साडी मला दे.. ती साडी मला दे.. सतत सुरू असायचं तुझं.. ही साडी तर खुप आवडीची होती तुझ्या.. म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहे. “
अबोली म्हणाली,” आई या साड्या का नाही दिल्यास तू मला सासरी जाताना..?”
ताई म्हणाल्या,” अग नवीन घेऊन दिल्या ना तुला.. या साड्या कुठे देऊ तुला.. देवधारांच्या प्रतिष्ठेला नाही शोभणार या..”
अबोली म्हणाली,” आई या साड्यां मध्ये तुझा स्पर्श आहे. तुझी ऊब आहे. त्या देवधरांच्या प्रतिष्ठापेक्षा ही खुप अनमोल आहेत . तू आणि अण्णांनी मला लग्नानंतर जे काही दिलं ते माझ्या सासरच्या प्रतिष्ठेप्रमाणे दिलं… पण मला काय हवं आहे हे तुम्ही विचारलं ही नाही आणि दिलं ही नाही.. मला ही साडी हवी आहे आई…”
ताई म्हणाल्या,” उगीच हट्ट नको करुस. नवीन घेऊन देते. पण ही नको. एखाद्याच्या दिवस कार्याला आल्यासारखी वाटते ही साडी. “
अबोली म्हणाली, “मग माझ्या दिवसकार्याला देते आहेस अस समजून दे.”
ताई म्हणाल्या,” अबोली.. काहीही बोलू नकोस. तुम्ही दोघींनीही अक्कल गहाण ठेवली आहे की काय आज..”
अबोली म्हणाली,”बरं बाई नाही अस बोलणार.. सॉरी.. आता तरी मला साडी दे.. जेव्हा कधी तुझी खूप आठवण येईन तेव्हा ही साडी नेसून पाहून.. तूच मायेने मला कुरावळे आहेस असे समजेन…” असे म्हणत अबोलीने ती साडी घेतली.
रात्री सर्व आपापल्या खोलीत झोपायला गेले. शालिनी ताईंच्या मनात अबोलीच बोलणं, वागणं, सतत तरळत होत. त्या अण्णांना म्हणाल्या, ” अहो अबोलीच वागणं पाहिलं का तुम्ही.. ?”
अण्णा म्हणाले,” काय झालं आता?”
ताई म्हणाल्या,” काही तरी गडबड आहे असं मला वाटत.. ती काहीतरी लपवते आहे. ती फक्त आनंदी असण्याचा दिखावा करते आहे. पण आतून खुप दुःखी आहे असं वाटत मला.”
असे म्हणून या दोन दिवसात अबोली आणि त्यांच्यात झालेलं संभाषण त्यांनी अण्णांना सांगितल.
त्यावर अण्णा म्हणाले,” तुम्ही बायका पण ना सुतावरून स्वर्ग गाठता.. अगं तिला साडी हवी तर द्यायची ना.. त्यात काय एवढं.. आणि अबोलीला सुध्दा ठाऊक आहे मी आता पर्यंत तिच्या भल्याचाच विचार केला आहे. तिच्यासाठी जे योग्य तेच केलं आहे.”
ताई म्हणाल्या,” तुम्ही बरोबर बोलत आहात … पण देवधरांकडची मंडळी तुम्हाला माहीत आहेत ना.. मोठं घर, पण तरी त्यांची नीती… आम्हाला हुंडा नको , पण तुम्हाला हवं ते द्या म्हणत लग्न खर्च करून घेतला. १० लाख रोख घेतले.. अबोलीला दागिने उत्तमच द्या ,आमच्या घराला शोभतील असेच, अस म्हणत ३० तोळे दागिने घेतले.. जे द्याल ते उत्तमच द्या म्हणत किती घेतल त्यांनी… खरंतर हे लग्न व्हायला नको होतं असं मला राहून राहून वाटत.. आपल्या मुलीला भेटायची आपल्यालाच चोरी.. काय तर म्हणे मुलीच्या सासरी येताना रिकाम्या हातानं येत नाहीत आमच्याकडे… दर वेळी सोन चांदी आणायचं कुठून.. म्हणून तिच्या सासरी जाण सुध्दा टाळतो आपण. ती इथे येईल तर तिला सुध्दा नक्कीच कशा ना कशात गुंतून ठेवत असतील. ही साधी साडी बघितली तिच्या कडे तर पुन्हा आमची प्रतिष्ठा आणि अजून काही बाही बोलतील.. तिचे सासरे तुमच्याही कसे वागतात याचा अंदाज सुध्दा नाहीये तिला.. तुम्ही शेत जमीन विकून पैसा उभा केला हे सर्व करण्यासाठी हे सुध्दा ठाऊक नाहीये या दोघींना… खरंच हे लग्न झालं नसत तर…”
अण्णा मध्येच बोलले,” शालू अग काहीही बोलू नको.. ती किती आनंदात आहे तिथे.. ते माझ्याशी कसेही वागू देत. पण आपली लेक तिथे आनंदात आहे ना मग अजून काय हवं. ती तिथे राणी सारखी नांदते आहे अजून काय हवं. आणि तिच्या संसारात किंवा सासरच्या मंडळींनी काढून काही त्रास असता तर तिने एव्हाना सांगितला असता आपल्याला. आता बस अमृताचे ही असेच भले होवो हीच अपेक्षा. आणि हो शेत जमीन विकली वैगरे गोष्टी दोघींनाही कधीच कळल्या नाही पाहिजेत हा… “
ताई म्हणाल्या, ” नाही कळणार ..”
अण्णा म्हणाले ,” उगीच काळजी करत बसू नकोस.. लेक आली आहे चार दिवसांसाठी तर मज्जा करा माय लेकी.. आणि आता झोपा..”
एव्हढे बोलून ते झोपी गेले..
सकाळी झाली आणि अमृताने अजुन काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आज काय काय करायचं तेच ती ठरवत होती. अबोलीची चेहरा मात्र उतरला होता.” ताई सांग ना अजून काय करूया,” ? अमृता अबोलीला म्हणाली.
“कुठलाच प्लॅन पूर्ण होणार नाही ग..” असे अबोली तोंडातच पुटपुटली..
अमृताने विचारले,” ताई काय म्हणालीस..?”
“काही नाही ग ” म्हणून अबोलीने टाळले..
इतक्यातच दारात मुकुंद हाजिर झाला.. त्याला पाहून सावंत कुटुंब गडबडले. शालिनी ताई आणि दामोदर अण्णा दोघे एकदमच म्हणाले, ” जावई बापू तुम्ही आज इथे?..
मुकुंद म्हणाला,” अहो अबोलीला न्यायला आलो आहे. आईची तब्येत बिघडली आहे. माफ करा. आईला बरं वाटल की आणून सोडतो अबोली ला..”
अण्णा म्हणाले,” आम्ही सुध्दा येतो तुमच्या सोबत.”
मुकुंद म्हणाला,” त्याची गरज नाही.. आम्ही अबोलीला घेऊन जातो. अबोली जा सामन घेऊन या.”
ताईंना हे सारं थोडं अजब वाटत होत. अबोली बॅग घेऊन पटकन खोलीतून बाहेर आली. निघताना आईला मीठी मारून खुप रडली. अण्णांच्या पाया पडून म्हणाली,” अण्णा आता काय माहित कधी भेट होईल..”
मुकुंद आणि अबोली गाडीत बसले. लहान मुलासारखी केविलवाण्या नजरेने अबोली ताई अण्णांकडे बघत होती. ताईंना सुध्दा अश्रु आवरत नव्हते.. का कुणास ठाउक त्यांना काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटतं होत. अमृता सुध्दा उदास होऊन तिच्या खोलीत गेली.. ताई पदराने डोळे पुसत पुसत स्वयंपाक घराकडे निघाल्या… दुसऱ्यदिवशी स्वयंपाक करत असताना त्यांच्या एक गोष्ट पटकन लक्षात आली, मुकुंद आल्यावर अबोली लगेचच बॅग घेऊन निघाली. आपण तर तिला चार, पाच दिवसांसाठी घेऊन आलो होतो. ह्यांच आधीच ठरलं होतं का, दोन दिवसात निघायचं ते..? तिला सामना भरायला जराही वेळ कसा काय लागला नाही..? कुठेतरी पाणी मुरत आहे.. ताई हातातलं काम सोडून लगबगीने अबोलीच्या खोलीत गेल्या. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर त्यांना एक लिफाफा दिसला. त्यांनी तो उघडला. अबोलीची चिट्टी होती.त्यांनी अण्णांना हाक मारली..” अहो इथे या.. लवकर या…”
अण्णा धावताच आले.,” काय ग काय झालं..?”
“अबोली ने चिट्टी ठेवली आहे” ताई म्हणाल्या..
“चिट्टी..? हे काय प्रकरण आहे आता.. ” अण्णा म्हणाले..
अण्णा वाचू लागले..
आदरणीय आई आणि अण्णा..
काय बोलू..कुठून सुरुवात करू… कळत नाही आहे.. मनात खुप कोलाहल मजला आहे. खुप प्रश्न आहेत. पण उत्तरं कोणाला विचारू कळत नाही आहे. आई अण्णा तुम्ही नेहमीच माझ्या आणि अमृताच्या सुखाचा विचार केला.. पण सुख म्हणजे नक्की काय असतं..? पैसा, समृध्दी, प्रसिद्ध, दाग दागिने, हात खाली नोकर चाकर, मोठं घर, सुंदर साड्या.. हेच असत का सुख..? हीच व्याख्या आहे का तुमच्या दृष्टीने सुखाची..? अण्णा मला माफ करा..पण कधी कधी खूप राग येतो मला तुमचा. आपल्या मुलीला ऐशो आरमाच जीवन मिळव यासाठी तुम्ही मला नरकात पाठवलं..
देवधर… श्रीमंत, घरंदाज माणसं.. पण फक्त नावाला.. हुंडा नको पण मुलींसाठी काहीतरी द्या अस म्हणत त्यांनी तुमच्याकडून काय काय घेतलं आहे हे माहीत आहे मला.. अण्णा तेव्हाच का नाही लग्न मोडल तुम्ही जेव्हा त्यांनी १० लाखांची मागणी केली.. लग्न तुम्ही लावून द्या म्हणून सांगितलं.. तेही त्यांच्या प्रतिष्ठे प्रमाणे.. हुंडा नको म्हणून हुंडाच घेतला ना त्यांनी.. त्यांनी त्यांचे रंग आधीच दाखवले होते. जी माणसं लग्नाआधी अशी वागू शकतात ते लग्नानंतर माझ्यासोबत योग्य वागतील आणि मला सुखी ठेवतील असं वाटल तरी कसं तुम्हाला.? लग्नानंतर मी माहेरी आले नाही ह्यात तुम्हाला काहीच गैर वाटल नाही का..? लग्नानंतर मला भेटायला येताना महागडी वस्तू घेऊन यावी लागेल हीच देवधरांची पद्धत आहे हेच सांगायचे ना माझे सासरे तुम्हाला… आमच्या लग्नानंतर आता पर्यंत ते कसे वागले आहेत तुमच्याशी हे माहीत आहे मला.. आई अण्णा तुम्ही एकदाही विचार नाही केला जे तुमच्याशी असे वागतात ते माझ्याशी कसे वागत असतील..?
लग्नानंतर काही दिवसातच मला कळलं मुकुंदचे विवाहबाह्य संबंध आहेत. आणि हे देवधर कुटुंबाला माहित होत. सर्वांसमोर एक आदर्श नवरा असल्याचं नाटक करणारा माझा नवरा एक हैवान आहे.. मला मारणं,माझा शारीरिक आणि मानसिक छळ करण हा जणू त्याचा हक्कच आहे. मी खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.. अन्याय विरुध्द लढले पण मी अपुरी पडले. मी जर कोणाला काही सांगितलं तर ते अमृता सोबत काहीतरी चुकीचं करतील अशी धमकी ते सतत मला देत राहिले. मी काय करणार होते.. मी गप्प बसले. सोन्याच्या पिंजऱ्यात बंधिस्त होते. माझ्या जवळ साधा माझा फोनही नव्हता. तुमच्याशी फोन वर बोलत असताना मुकुंद नेहमी समोर असायचा. त्याला हवं तेच तो वदवून घ्यायचा माझ्याकडून.माझ्या खोली बाहेर सतत पहारा देत पहारेकरी असतात. कुठे जाण्यायेण्याच्या मुभा नाहीये मला. सगळं सहन करत होते मी पण या लोकांनी माझे बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं तेही एकदा नाही दोनदा.. गर्भजल चाचणी करून घेतली. दोन्ही वेळी गर्भ मुलीचा होता. माझ्या संमती शिवाय, जबरदस्तीने या लोकांनी माझा गर्भपात केला. मी आता ही आई होणार आहे. मला भीती वाटते यावेळी सुध्दा गर्भ मुलीचा असेल तर जे लोक तिला सुध्दा मारून टाकतील.. आता मी अजून काही सहन करू शकत.. या दोन दिवसात खुप वेळा वाटलं तुम्हाला सर्व सांगून टाकावं.पण त्याने काय होणार होत..माझी बाजू तुम्ही समजून घेतली असती अस नाही वाटत मला.. खुप वेळा वाटलं आई.. तुझ्या कुशीत शिरून खुप रडव.. तुला सांगावं मला तुझ्या पदराशी बांधून ठेव. मला कुठेच नाही जायचं आता.. पण नाही जमलं ते.. तुम्हाला ही चिठ्ठी मिळे पर्यंत मी या जगात नसेन.. खरंतर आत्महत्या करण मला सुध्दा पटत नाही आहे… पण मी थकले आहे.. हरले आहे.. अजून काही ताकद माझ्यात सर्व सहन करायची.
अण्णा माझ्या सोबत जे केलं ते अमृता सोबत होऊ देऊ नका.. घाईघाईत श्रीमंत स्थळ आहे म्हणून लग्न लावून देऊ नका.. तुम्हाला जास्त काही बोलले असेन तर मला माफ करा..
तुमची आता या जगात नसलेली लेक
अबोली.
ताई आणि अण्णांना सुचतच नव्हते काय करावे ते.. ताईंनी हंबरडा फोडला.. अण्णांनी अमृताला फोन करून झालेला प्रकार सांगितला. कॉलेज मधून निघ आणि सरळ अबोलच्या सासरी भेट म्हणून सांगितल.. अण्णांनी ताईंना सावरलं.. आपल्याला लगेच जावे लागेल याची जाणीव करून दिला.. गावातली ४ माणसं सोबत घेतली. ते निघाले.. इथे अमृता पोलिसांना सोबत घेऊन आली. सर्व देवधरांच्या घरी पोहोचले.. सर्वांना पाहून रमाकांत देवधर गोंधळले..
“सावंत हा काय प्रकार आहे..? ही माणसं आणि पोलिस घेऊन का आला आहात..?” देवधर म्हणाले..
अण्णा बोलू लागले.,” तुम्ही आता एक शब्द बोलू नका.. खुप ऐकून घेतलं तुमचं.. माझी लेक कुठे आहे.?”
“ती ऑफिसला गेली आहे.” देवधर म्हणाले.
अण्णा म्हणाले,” हे शक्यच नाही.. तुमचं पितळ उघडं पडलं आहे. ती घरातच आहे. कुठे कोंडून ठेवलं आहे तिला ते सांगा..”
पोलिस पुढे आले..आम्हाला घरात शोधावं लागेल म्हणत घरात शिरले..अबोलीच्या खोली बाहेर एक गार्ड बसला होता.. त्याला बाजूला करत आत शिरले.. समोरचा प्रकार पाहून सगळेच स्तब्ध झाले. गुलाबी रंगाच्या साडीत अबोलीचा मृतदेह पंख्याला गळफास लावून लटकत होता.. हो तीच आईची गुलाबी रंगाची साडी होती.. अण्णा कोसळले.. ताई आणि अमृताला काही सुचेनासे झाले.. अबोली तिच्या बाळासोबत हे जग सोडून कधीच निघून गेली होती… तिनेच तिच्या प्रश्नाची उत्तरं शोधली होती..
पुढे काही महिन्यांनी….
देवधर कुटुंबाला धडा शिकवायचा हे अण्णांनी ठरवलं.. खटला भरला.. खुप वादविवाद.. आरोप प्रत्यारोप झाले.अमृता आणि ताई सुध्दा निकराने लढल्या..खुप अडचणी आल्या पण अखेर अबोलीला न्याय मिळाला. देवधर कुटुंबाला कठोर शिक्षा झाली ..
(वाचकहो ही गोष्ट काल्पनिक आहे. पण आजही अशा कितीतरी मुली आत्महत्येचा मार्ग निवडतात.. या कथेतील सर्वच पात्र कुठेना कुठे चुकली. आपण आपल्या मुलांसाठी नेहमी योग्य निर्णय घेतो, आपला निर्णय चुकीचा असूच शकत नाही असे अण्णांना नेहमी वाटले. खरंतर त्यांनी हे लग्न आधीच मोडायला हवं होत..पण त्यांनी तसे केले नाही.हुंडा नको नको म्हणून मुलींसाठी काहीतरी तसेच आमच्या प्रतिष्ठे प्रमाणे द्या असे म्हणून देवधरांनी वेळोवेळी आपला लोभी पणा दाखवला होता. अण्णांनी तेव्हाची ही धोक्याची घंटा आहे हे समजून जायला हवे होते. मुलीच्या सासरी आलेले देवधरांना विशेष आवडत नव्हते, तसेच दरवेळी सासरी येताना माहेरच्यांनी काहीतरी घेऊन यावे अशी आमची पद्धत आहे हे जेव्हा देवधरांनी अण्णांना सांगितले तेव्हाही अण्णांनी सतर्क व्हायला हवे होते. लग्नानंतर अचानक त्यांच्या वागण्यातला बदलही लक्ष वेधून घेणारा होता. पण अण्णांनी दुर्लक्ष केले. जे आपल्याशी वाईट वागू शकतात ते आपल्या मुलीशी कसे वागत असतील हा विचार अण्णांनी करायला हवा होता. तिचा महिनाभर संपर्क होई पर्यंत वाट पाहायला नको होती. शालिनी ताईंना संशय येत होता तेव्हाच त्यांनी चौकशी करायला हवी होती.. हीच गोष्ट अमृताच्या बाबतीतही लागू पडते.
अबोलीने आत्महत्येचा मार्ग निवडायला नको होता.. दोन दिवस घरी असताना तिने तिच्या आई बाबांना विश्वासात घेऊन सर्व सांगायला पाहिजे होत. तिच्या लग्नाच्या बाबतीत ते चुकले असतील पण त्यांना तीच भलच करायचं होत. त्यांनी नक्कीच समजून घेतलं असत. काही तरी मार्ग काढला असता. तिला आत्महत्या करायची वेळच आली नसती. देवधर खुप मोठं नावाजलेले कुटुंब जरी असलं तरी कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो एक ना एक दिवस त्यांना शिक्षा झाली असती आणि अबोली ला न्याय मिळाला असता.
अबोली डिप्रेशन मध्ये होती. बरेचदा डिप्रेशन मध्ये असणारी व्यक्ती ही फार नॉर्मल जणू काही झालंच नाही अशीच इतरांना वाटते. पण तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्या वागण्यातला बदल लक्षात घेऊन वेळीच पावलं उचलली पाहिजेत. नक्की काय होतंय ते जाणून घेतलं पाहिजे. डिप्रेशन मध्ये असणारी व्यक्ती कधीही कुठलंही पाऊल उचलू शकते ह्याच हे एक उदाहरण आहे.
देवधर कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर आजही असे बरेच लोक आहेत जे लेकी सुनांचा छळ करतात.. त्याचा आपलीच मालमत्ता असल्यासारखा वापर करतात.त्यांना मारणं, शिवीगाळ कारण हे त्यांना नॉर्मल वाटत. पण अशा लोकांना विरोध न करून, त्यांना वेळीच आवर न घातल्यामुळे आपणच अशा लोकांच्या वागण्याला खतपाणी घालतो. आपल्याला आपला दृष्टकोन बदलायची आजही गरज आहे.. हे थोडक्यात मी या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे..)
समाप्त
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.
वाचकहो.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा. लेख आवडला असेल तर LIKE जरूर करा. आणि हो मला FOLLOW करायला विस
माझा लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी काहीी