नंदिनी दोन गोड मुलांची आई. मोठा अर्जुन सहा वर्षाचा , तर छोटा आरव तीन वर्षांचा. ती प्राध्यापिका होती… राज .. तिचा नवरा.. बँकेत मॅनेजर. राज आणि नंदिनीचे छानस चौकोनी कुटुंब होते.. सासू सासरे गावाकडे राहायचे. नंदिनीचे माहेर सुध्दा दुसऱ्या शहरात होते.. अधून मधून ते भेटायला येत असत. कधी हे चौघे तिथे जात. सर्वच खुप छान सुरू होत. पैसा, समृध्दी, सुख, समाधान सार काही होत त्यांच्याकडे. मुलांच्या जन्मानंतर नंदिनीने तिच्या कामाच्या वेळा कमी केल्या होत्या. पूर्वी ती एका कॉलेज मध्ये शिकवत होती. आता तिने ती नोकरी सोडून एका कोचिंग क्लासमध्ये नोकरी पत्करली होती. त्यामुळे दिवसातले काही तासच ती मुलांपासून लांब राहत असे. खरतर पैसा हवा म्हणून ती नोकरी करीत नव्हती. तिला खरंच शिकवायची आवड होती आणि आपण घेतलेल्या शिक्षणाचा योग्य वापर व्हावा हा नोकरी करण्या मागचा हेतू.दोन्ही मुलांना, त्या काही तासांसाठी सांभाळायला तिने घरी एक बाई ठेवली होती. घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवले होते. त्याचे कनेक्शन नंदिनी आणि राज दोघांच्या मोबाईल वर होते. म्हणजे बाहेर असताना घरी मुले आणि ती बाई काय करताहेत हे ते दोघेही पाहू शकत होते.
नंदिनी आणि राजला बरेचदा त्यांच्या आई बाबांकडून एक गोष्ट ऐकायला मिळत असे,” बरे झाले बाबा दोन्हीही मुलगे झाले.. मुली असत्या तर नको तो व्याप झाला असता…”
सीसीटीव्ही कॅमेरा बद्दलही नंदिनीच्या सासूला प्रोब्लेम होता..” घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवायची काय गरज?… असेही नंदिनी काही तासांसाठीच बाहेर जाते ना… तेवढ्या वेळात ती बाई काय करणार आहे मुलांसोबत…?.. “
नंदिनी घरच्यांच्या या बोलण्यावर चिडत असे. एकतर मुलगी म्हणजे व्याप नसतो.. आणि दुसरं म्हणजे मुलं हे मुलं असते.. मग मुलगा असो वा मुलगी.. त्यांन मोठं करायची, योग्य ते पालन पोषण करायची जबाबदारी ही प्रत्येक आई वडिलांची असते. नंदिनी आणि राजच रूटीन लाईफ सुरू होते. नंदिनी ज्या कोचिंग क्लासमध्ये शिकवत होती तिथे एक विचित्र घटना घडली… क्लासमध्ये शिकणारा अमेय.. अभ्यासात हुशार मुलगा. सर्व शिक्षकांचा आवडता… भविष्यात काहीतरी वेगळं करून दाखवेल असे सर्वांनाच वाटायचे. त्याने आत्महत्या केल्याचे तिच्या कानावर आले… त्याचे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला.. नक्की काय झाले असेल या विचाराने ती बैचेन झाली.आठवडा भर तब्बेत ठीक वाटत नाही हे कारण देऊन तो क्लासला सुध्दा आला नव्हता.. काय कारण असेल… आपण जाऊन भेटावे का?.. तिला काहीच सुचत नव्हते…असेच काही दिवस गेले..
एके दिवशी अमेयच्या आईचा नंदिनीला कॉल आला. “तुम्ही अमेयला भेटायला येऊ शकता का..?” हे त्यांनी विचारले. “तुमच्या मदतीची गरज आहे”, असे त्या म्हणाल्या.. नंदिनी तडकच निघाली.. ती अमेयच्या घरी गेली.. आधी आई बाबांशी बोलली.. आई बाबांकडून तिला कळले की अमेय कोणाशीच काहीच बोलत नाही आहे.. त्याने हे पाऊल का उचलले हे देखील तो सांगत नाही आहे.. एकटाच एका कोपऱ्यात बसून असतो.. डॉक्टर्सनी त्याला शरीराने बरे केले आहे.. पण मनाने तो खचला आहे.. आणि जो पर्यंत तो कोणाशी काहीच बोलत नाही तो पर्यंत त्याला बरे करणे कोणालाही शक्य नाही…” मॅडम तुम्ही बोलून बघा… कदाचित तुम्हाला सांगेल तो…तुम्ही त्याच्या खुप आवडत्या शिक्षिका आहात..” असे त्याची आई नंदिनीला म्हणाली.
नंदिनी अमेयच्या खोलीत गेली. तो एका कोपऱ्यात पाठमोरा बसला होता. तिने त्याला हाक मारली तरी त्याने काहीच हालचाल केली नाही.. ती त्याच्या जवळ गेली… तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.. तो दचकला…
नंदिनी म्हणाली.. ,” अमेय अरे मी आहे…नंदिनी मॅडम.. अरे कसा आहेस तू.. ? आम्ही किती मिस करतो तुला.. आणि काय रे ही काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतः ची..? परीक्षा जवळ आली आहे हा आता.. अभ्यासाला सुरुवात करायची आहे.. ” नंदिनी एकटीच बोलत होती.. अमेय शून्यात बघत बसला होता.. नंदिनी ने त्याला पुन्हा हलवल.. ,”अमेय.. बाळा काय झाले आहे..? प्लिज सांगशील मला.. नंदिनीने त्याला बोलत केलं..
“अमेय सांगू लागला.. ,”मॅडम माझ्यावर लैंगिक अत्याचार झालं आहे..” नंदिनीचा तिच्या कानावर विश्वास बसेना..
“अमेय काय बोलतो आहेस तू..? हे कसं शक्य आहे?..”
अमेय म्हणाला..” बघितल मॅडम तुम्ही सुध्दा माझे बोलणे समजून घेऊ शकत नाही.. म्हणून मी कोणालाच सांगत नव्हतो. त्या पेक्षा मरण मला सोप्पं वाटल..” अमेय रडू लागला…
नंदिनी त्यांना शांत करत म्हणाली, “बाळा सॉरी.. अरे तुझ्यावर विश्वास नाही असे नाही.. पण हे मला expected नव्हते.. म्हणून पटकन तोडून ही रिअँक्शन आली.. तू सांग मला.. काय झाले आहे..? मी आहे तुझ्यासोबत..”
अमेयला थोडा विश्वास वाटला.. मग तो बोलू लागला.. “दोन महिन्यांपूर्वी कॉलेज मधल्या दोन सिनियर सोबत माझे भांडण झाले होते. ते आम्हा ज्युनिअर मुलांना सतावत होते.. मी प्रिन्सिपल सरांकडे तक्रार केली. त्या मुलांना सर खुप ओरडले.. जर असेच वागत राहिले तर त्यांना कॉलेज मधून काढून टाकले जाईल अशी वाॅर्निंग दिली. त्या मुलांनी माझी माफी मागितली. पुढे काही दिवसांनी त्यांनी माझ्याशी मैत्री केली.. झाले गेले विसरून जा असे म्हणाले.. मला पण मैत्री करण्यात काही चुकीचे नाही वाटले.. आताचा पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी कॉलेज संपल्यावर मला कॅन्टीन मध्ये बोलावले.. मला कॉफी प्यायला दिली.. ती कॉफी प्यायल्यावर मला काय झाले काय माहित.. मी बेशुध्द पडलो.. जेव्हा जाग आली तेव्हा मी निर्वस्त्र अवस्थेत कॉलेजच्या बाथरूम मध्ये होतो.. आणि माझ्या समोर ते दोघे होते.. मला खूप त्रास होत होता.. पूर्ण अंग दुखत होते.. डोके ही दुखत होते.. तुम्ही काय केले माझ्यासोबत..? मी जाब विचारला त्यांना.. त्यांनी मला व्हिडिओ दाखवला.. त्यात त्यांनी त्यांचे चेहरे झाकले होते.. माझा चेहरा स्पष्ट दिसत होता.. त्या दोघांनी माझा छळ केला.. आणि मी हे कोणाला सांगितले तर ते हा व्हिडीओ व्हायरल करतील अशी धमकी दिली.. मी खूप घाबरलो होतो.. दोन दिवसांनी त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.. त्यांनी मला पुन्हा कॉलेज सुटल्यावर थांबायला सांगितले.. मी नकार दिला तर व्हिडीओ व्हायरल करू असे म्हणू लागले.. मी थांबलो.. त्या दिवशी ते मला त्यांपैकी एकाच्या घरी घेऊन गेले.. तिथे त्यांनी पुन्हा…. या वेळी मला सर्व कळत होते मॅडम.. पण मी काही करू शकत नव्हतो.. मी हतबल झालो होतो.. हे आता सारखच होणार.. आणि जर मी हे कोणाला सांगायला गेलो तर कोणी मला समजून घेणार नाही.. कारण बलात्कार हा फक्त स्त्रीचाच होतो असा समज आहे ना आपल्या सर्वानाच.. आणि तो व्हिडीओ जर व्हायरल झाला तर माझी तर बदनामी होईलच.. माझ्यासोबत माझ्या आई बाबांची सुध्दा बदनामी होईल.. मॅडम काय चूक होती माझी…? मी काय करू मॅडम.. ?.. असं म्हणून अमेय खुप रडू लागला…
नंदिनी निशब्द झाली होती.. पुढे काय बोलावे.. अमेयच्या आई बाबांना काय उत्तर द्यावे हेच तिला सुचत नव्हते.. तिने अमेयला शांत केले.. आणि म्हणाली.. “अमेय तू एकटा नाही आहेस.. मी आहे तुझ्यासोबत.. तुझ्यासोबत खुप चुकीचे झाले आहे.. आणि याची शिक्षा त्या मुलांना मिळालीच पाहिजे.. अमेय आधी तू या सर्वातून बाहेर ये.. कोणाच्या विक्षिप्त पणाची शिक्षा स्वतः ला देऊ नकोस.. मी उद्या येईन परत … आपण ठरवू पुढे काय करायचे ते.. मी वचन देते तुला.. तो व्हिडीओ व्हायरल नाही होणार आणि त्या मुलांना शिक्षा सुद्धा होईल.. पण तू स्वतःला काही त्रास करून घेणार नाहीस.. मला वचन दे.. अमेयने होकारार्थी मान हलवली.. नंदिनी विचारातच घराकडे निघाली.. तिने तिच्या काउनसलर मैत्रिणीला फोन लावला.. अमेय बद्दल सांगितले.. उद्या दुपारी भेटून बोलू असे तिने सांगितले.या सर्व नादात आज घरी सासू सासरे तसेच तिचे आई बाबा येणार आहेत हे ती विसरली.. आता सर्व स्वयंपाक करायला तिच्या कडे तेवढा वेळ नव्हता.. तिने राज ला फोन करून सर्व सांगितले.. त्याने आधी नंदिनीला शांत केलं.. हे बघ रात्री आपण अमेयच्या प्रकरणा बद्दल काय करायचे ते ठरवू.. तू घरी जा.. मी ऑफिस मधून येताना बाहेरून जेवण घेऊन येतो.. असे सांगून राजने फोन ठेवला.. नंदिनी घरी गेली.. तिचे आई बाबा, सासू सासरे ठरल्या वेळेत आले.. रात्रीचे जेवण झाले.. सर्व जण निवांत टीव्ही वर बातम्या पाहत बसले होते.. सोबतच गप्पा सुरू होत्या.. नंदिनीचे या सर्वात कुठेच लक्ष नव्हते.. राहून राहून तिला अमेय आठवत होता.. इतक्यात एक बातमी झळकली… चार नराधमांनी एका अप्लवयीन मुलीवर बलात्कार केला… बातमी पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली..
नंदिनीची आई पटकन म्हणाली.. “स्त्री जन्म नकोच गं बाई.. किती ते हाल.. नंदिनी.. बरं झाल गं दोन्ही मुलगेच झाले तुला.. आताचा येणारा काळ मुलींसाठी खुप घातक आहे बरं का… एका जबाबदारीतून सुटलीस तू… मुलगी झाली असती ना तर सतत काळजी राहिली असती.. “
त्यावर नंदिनीच्या सासू बाई सुध्दा म्हणाल्या..,” बरोबर म्हणत आहात तुम्ही.. आणि हल्ली ना मुलींना वळण पण राहिले नाही हो.. कपडे कसे घालावे.. कसे चालावे.. कसे बोलावे.. काहीच कळत नाही.. बरे झाले दोन्ही मुलगे आहेत..नाहीतर तुला नोकरी करणं सुध्दा कठीण झालं असतं नंदिनी.. मुलांचं काय कुठेही सोडा , कशीही सोडा मोठी होतात ती.. ”
आता नंदिनीला हे सर्व असह्य होत होतं.. आधीच तिला मुलगी म्हणजे जबाबदारी , एक व्याप आणि मुलगा म्हणजे काहीच नाही हे म्हणणं पटत नव्हतं.. त्यातच अमेयचा किस्सा तिच्य डोक्यात सतत घुमत होता.. ती म्हणाली,” मला माफ करा.. लहान तोंडी मोठा घास घेते आहे मी.. पण मला तुम्हा दोघींची ही मत पटत नाहीत.. एक तर मुलगा आणि मुलगी यांच्यात असा भेद करणं मला पटत नाही.. निसर्गाने या दोघांनाही वेगळं बनवलं आहे आणि त्याचा मी सुध्दा आदर करते.. पण मुलगी असती तर जबाबदारी वाढली असती.. एक व्याप झाला असता असे मला वाटत नाही.. हल्लीच्या जगाचं म्हणाला तर रेप काय फक्त मुलींचाच होत नाही.. मुलांचाही लैंगिक छळ होतो.. त्यानाही नको नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.. मुलगा म्हणजे हे असच आणि मुलगी म्हणजे ते तसच हे जे आपण equations बनवले आहेत ना त्यामुळे ही तरुण पिढी होरपली जाते.. बघा ना आपण आता किती forward झालो आहोत, तरी मनात विचार काय तर मुलगा आहे ना तर कुठे ही ठेवा कसाही ठेवा.. वाढेल.. अहो.. माझ्या मुलांनी पुढे जाऊन कुठल्या मुलीशी गैरवर्तन करू नये ह्याची सुध्दा मला खबरदारी घ्यावी लागते.. माझी मुले व्यसनाधीन होऊ नयेत यासाठी मला जागृत राहावे लागते.. त्यांच्या सोबत गैरव्यवहार झाला तर.. याची मला पण भीती असते.. मुलगा म्हणजे कणखर.. मुलगी म्हणजे नाजूक.. मुली रडू शकतात.. मुलांनी रडायचे नसते.. हे आपणच बिंबवतो त्यांच्या मनावर.. कितीतरी वेळा आपल्या याच विचारामुळे मुले आतल्या आत कुढत राहतात.. मुलगा असो वा मुलगी.. पालकांची जबाबदारी असतेच.. त्यांच्यातल्या लैंगिक भेदमुळे कदाचित ती जबाबदारी थोडी वेगळी असेल.. पण मुलगी व्याप नसते किंवा मुलगा आहे म्हणून कुठेही सोडून चालत नाही.. मी जास्त बोलले असेन तर मला माफ करा.. पण प्लिज हे अश्या प्रकारे सारख सारखं मुलगा मुलगी भेद करणं बंद करा.. शेवटी मुलीचे आई बाप असो को मुलाचे आपल्या पोटच्या गोळ्याला त्रास झाला की त्याची जळ दोघांनाही लागते..”
“अगदी बरोबर म्हणालीस बेटा.. बरोबर आहे तुझं..” नंदिनी चे सासरे म्हणाले..
बोलता बोलता नंदिनीचा डोळ्यात कधी पाणी आले ते तिला सुध्दा कळले नाही.. डोळे पुसत मी थोड्या वेळात येते सांगून ती तिच्या खोलीत गेले निघून गेली.. आज तिच्या क्लास मध्ये थोडा गोंधळ झाला होता म्हणून ती थोडी डिस्टर्ब आहे असे सांगून राजने वेळ सावरून घेतली..सर्व जण झोपायला गेले.राज नंदिनिशी अमेयच्या विषयावर बोलाला. उद्या मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आपण मिळून मार्ग काढू म्हणाला.
सकाळ झाली.सकाळीच मुलाचं आवरून ते दोघे अमेयच्या घरी गेले. अमेयला विश्वासात घेऊन नंदिनीने त्याच्या आई बाबांना सर्व प्रकार सांगितला. आई बाबांना पण धक्का लागला. राज आणि नंदिनी ने त्यांना सावरले.. अमेय आणि आई बाबांसोबत ते दोघे जवळच्या पोलिस ठाण्यात गेले. झालेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी पण तक्रार नोंदवून घेतली. त्यांनीही योग्य ते सहकार्य केले. त्या मुलांना अटक केली. त्यांचे मोबाईल जप्त केले. अमेयच्या गुन्हेगारांना शिक्षा होणार हे आता स्पष्ट झाले होते.. अमेयला थोडं समाधान मिळाले होते. पण तरीही तो हरवलेला होता.. त्याचा आई बाबांशी बोलून नंदिनी ने त्याला काऊनसलर कडे जाण्यासाठी तयार केले.. काही महिने गेले.. अमेय त्या घटनेतून बाहेर आला.. राज आणि नंदिनीचे अमेयच्या आई बाबांनी खुप आभार मानले..
( वाचकहो..ही कथा काल्पनिक आहे.. पण नंदिनी म्हणाली अगदी तसचं मुलगा असो वा मुलगी जबाबदारी ही असतेच प्रत्येक पालकाची. काळजी, भीती ही असतेच प्रत्येक पालकाच्या मनात. मुलाला वाढवताना थोड्या वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते तसेच मुलीचेही आहे.. मी सुध्दा एका मुलाची आई आहे. माझ्या मुलाला वाढवताना मलासुद्धा माझ्या जबाबदारीचे भान आहे. तुमच्या मुलांना वाढवताना तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींना सामोरे जावे लागले आहे का?.. मला नक्की कळवा.. तुम्ही कुठल्या अशा विशिष्ट गोष्टीची काळजी घेता का.. ? मला नक्की सांगा.. म्हणजे मला सुध्दा आणि माझ्या सारख्या पालकांना सुध्दा तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल..🙂)
*****************************************************समाप्त*****************************************************************
डॉ . अश्विनी अल्पेश नाईक .