दारावरची बेल वाजली.. मनिषा खूप घाईत होती.. आता एवढ्या सकाळी सकाळी कोण आल म्हणत वैतागली.. ती दार उघडायला जाणार इतक्यात प्रथमेशने तिला आतून आवाज दिला.. ” मने अग चहा दे लवकर… “
हो आले आले म्हणत.. ती पुन्हा किचनच्या दिशेने वळली.. आणि मंदाला म्हणाली.. ” मंदा प्लिज दार उघडं ग..”
मंदाने दार उघडले. समोर पोस्टमन उभे होते. मंदाने पत्र घेतलं. आणि दार बंद केलं.
” कोण होत ग मंदा..?” बेडरूममध्ये प्रथमेशसाठी चहा घेऊन जात असताना मनिषाने मंदाला विचारले.
” ताई पोस्टमन होते. पत्र आलं आहे तुमचं.” मंदा म्हणाली.
” पत्र…??? आता…?? ” मनिषा म्हणाली.
” मने लवकर कर ग. आज मीटिंग आहे . लक्षात आहे ना. लवकर पोहोचायचे आहे आपल्याला..” प्रथमेश म्हणाला.
मनीषाने मंदा कडून पत्र घेतले. आणि ऑफिसच्या बॅगेत ठेवले. तिने आवरा आवर केली. आणि प्रथमेश आणि मनिषा ऑफिसला जायला निघाले. जाताना नेहमीच्या सूचना मंदाला देऊन ते निघाले.
मनिषा आणि प्रथमेश यांचा स्वतःचा बिझनेस होता. खूप मेहनतीने एक छोटे खानी व्यवसाय त्यांनी मोठा केला होता. बिझनेस मोठा झाला तसा त्यांचा व्यापही मोठा झाला.
दुपारी मीटिंग आणि लंच झाल्यावर मनिषाला पत्राची आठवण झाली. तिने बॅग उघडून पत्र काढले. आता या काळात कोण पत्र लिहीत काय माहित.. स्वतःशीच पुटपुटत तिने पत्र मागून पुढून नीट पाहिले.
पत्र उघडले.. आणि तिला धक्काच बसला..
पत्र होते त्यांच्या लाडक्या लेकाचे… शर्विलचे..
मनिषा वाचू लागली..
प्रिय मम्मा पा…
मी पहिल्यांदा पत्र लिहितो आहे.. कस लिहितात ते नीट माहीत नाही.. पण प्रयत्न करतो आहे.
मम्मा पा.. खूप दिवस.. खूप वेळा तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला मी.. पण तुम्ही इतके बिझी असता की तुम्हाला माझं ऐकायला वेळच नसतो. स्कूलमध्ये टपाल दिवसानिम्मित मराठीच्या टीचरने क्लोज परसनला पत्र लिहायचा टास्क दिला होता आणि ते पत्र पोस्टसुद्धा करायला सांगितले होते. मग मला आयडिया आली. जे मला बोलायचं आहे ते पत्र लिहून सांगतो तुम्हाला. अटलिस्ट तेव्हा तरी तुम्हाला कळेल.
मम्मा पा.. मला तुम्ही खूप आवडता. मला माहित आहे तुमचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तुम्ही मला हवं नको ते सर्व देता. पण मम्मा पा मला तुम्ही हवे आहात. तुमचा वेळ हवा आहे. तुमचा बिझनेस तुम्हाला अजून ग्रो करायचा आहे हे मला माहीत आहे. आणि मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आय कॅन understand तुम्ही खूप बिझी असता. तुम्हाला खूप काम असतं. पण तुम्ही मला शनिवार रविवार तरी टाइम देऊ शकता ना…? तेव्हा ही तुम्ही तुमच्या पार्टीज मध्ये बिझी असता. बरेचदा तर तुम्ही लेट नाईट घरी येता आणि अर्ली मॉर्निंग जाता. मग मी स्कूल मधून आल्यावर मंदा ताई सोबत असतो. माझे क्लासेस अटेंड करतो. खूप स्टडीज करतो. फ्रेंड्स सोबत टाईमपास करतो. पण तरीही खूप वेळ उरतो माझ्याकडे. मी मंदा ताईला तिच्या मुलांसाठी टाइम देताना बघतो तेव्हा मला वाटतं तिची मुल किती लकी आहे. ती पण काम करते. पण वेळेत घरी जाते. ती माझ्या सोबत असते तेव्हा पण मुलांना अधेमधे कॉल करते. काय खाल्ल.. काय करत आहेत याची चौकशी करते. मम्मा पा तुम्ही कधीच का नाही मला कॉल करत…? तुम्हाला माझ्या काळजी वाटतं नाही का..?
अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे.. मला माहित आहे तुम्ही दोघंपण ड्रिंक करता.. बरेचदा मी पाहिलं आहे तुम्हाला ड्रिंक करताना. पा स्मोक करतो हे सुध्दा मला माहीत आहे. तुम्ही लेट नाईट येता तेव्हा बरेचदा ड्रिंक करून येता हे मला माहीत आहे. स्मेल सुद्धा कळतो आता मला. मला नाही आवडत तो स्मेल. मी आता टेंथला आहे मम्मा पा.. मी एवढा ही लहान नाही आहे की मला हे सर्व कळत नाही. स्मोकिंग अँड drinking हेल्थसाठी चांगली नाही हे मला माहीत आहे. तुम्ही घरी नसताना मी जे हवं ते करू शकतो. पण मी नाही करत. मला ईच्छाही नाही होत. बेकॉज आय नो.. हाऊ मच यू ट्रस्ट मी… आणि मी तो ट्रस्ट कधी ब्रेक करणार नाही. पण तुम्ही माझ्यासाठी तुमच्या या habbit सोडालं का…?
मम्मा पा तुम्ही रिअली मला सर्व गोष्टी दिल्या आहेत. पण मला वस्तू नको तुम्ही हवे आहात. तुमचा वेळ हवा आहे. तो द्याल का..? आपण आपला फॅमिली टाईम एन्जॉय करू शकतो का…?
मला कंप्लेंट नाही आहे तुमच्याकडून पण ही माझी गरज आहे. मला थोडा वेळ हवा आहे तुमचा…
तुमचा सन
शर्विल
शर्विलच पत्र वाचून मनिषाला काय बोलावे सुचतच नव्हते. तिने रडत रडत प्रथमेशला कॉल केला आणि लगेच तिच्या केबिनमध्ये बोलावलं.. प्रथमेश आल्यावर तिने त्याला ही पत्र वाचायला दिलं.
आपण किती चुकतो आहोत याची त्या दोघांना हि जाणीव झाली. या वयात त्याला पालक म्हणून त्यांची जास्त गरज होती हे त्यांच्या लक्षात आलेच नाही कधीच. तसच या वयात त्याच्यात असलेल्या समजूतदारपणाचे त्यांना कौतुक तर वाटत होते पण सोबतच स्वतःची लाज सुद्धा वाटत होती. ते लगेचच घरी निघाले.
आज अचानक लवकर घरी आलेल्या मम्मा पा ना पाहून शर्विल खूप खुश झाला.. मनिषाने शर्विलला जवळ घेतले. मनिषाला अश्रू अनावर झाले. मनीषा आणि प्रथमेशने शर्विल समोर अगदी हात जोडले.
“आम्हाला माफ कर .. आम्हाला कळलच नाही आम्ही किती चुकतो आहोत ते. आम्हाला वाटलं तुला जे हवं ते आम्ही देतोय. पण आम्ही चुकीचे होतो. या पुढे आम्ही टाईम मॅनेजमेंट करणार.. आपला तिघांचा असा वेळ नक्की काढणार.. आणि हो स्मोकींग आणि drinking नक्की बंद करणारं…” प्रथमेश म्हणाला..
हे सर्व ऐकून शर्विल खूप खुश झाला..
” अरे पण एवढं छान मराठी कस लिहिता आल् तुला…? कोणाची मदत घेतली का..?” मनिषाने विचारले.
” हे एवढं सगळं मराठी मी मंदा ताईकडून शिकलो आहे.. तुम्ही नसताना ती मला खूप छान सांभाळते. माझी काळजी घेते. तिला पॉसिबल असेल तस स्टडीज मध्ये पण हेल्प करते. मोरल व्ह्यालुस शिकवते..”शर्विल म्हणाला.
हे ऐकून मनिषाने मंदाला मिठीच मारली. स्वतःच्या मुलाप्रमाणे शर्विलला सांभाळण्यासाठी मनिषा आणि प्रथमेशने तिचे मनापासून आभार मानले.
समाप्त
फोटो साभार – shutterstock.com
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.