“रेवा अगं किती वेळ … लवकर कर ना…” समर बाथरूम बाहेरून बोलत होता.
“अरे हो थांब जरा… थोडा वेळ लागतो..” रेवा बाथरूम मधून म्हणाली.
समर बाहेर येरजाऱ्या घालत होता. एक एक सेकंद त्याला एका तासा सारखा भासत होता. रेवा बाथरूममध्ये प्रेगंसी टेस्ट करत होती.
रेवा आणि समर एकाच क्षेत्रातले. एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारे. कंपनीच्या वार्षिक समारंभात भेट झाली. पुढे काही दिवसांनी दोन महिन्यांसाठी रेवाची त्या ऑफिसमध्ये बदली झाली. तिथे ती समर तिचा लिड होता. पहिल्या भेटीतच समरला रेवा आवडली होती. या दोन महिन्यांच्या सहवासात तो तिच्या प्रेमातच पडला. रेवाला सुद्धा समरचा सहवास आवडू लागला होता. बघता बघता दोन महिने पूर्ण झाले. ऑफिस मधल्या शेवटच्या दिवशी रेवाला तिचे टीम मेंबर एक एक करून येऊन भेटत होते. ‘ तिच्या सोबत काम करायला मज्जा आली. ती कशी हर्डवर्किंग आहे, प्रामाणिक आहे म्हणून कौतुक करत होते.’ एरवी रेवाला तिचं कौतुक केलेले फार आवडत असे, पण आज तिचं कोणाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिची नजर कावरीबावरी होऊन समरला शोधत होती. ऑफिस सुटायची वेळ झाली. हताश होऊन रेवासुद्धा तिचा पसारा आवरून निघाली. ती तिच्या खुर्चीतून उठणार तोच समर तिथे आला. समरला पाहून तिला विलक्षण आनंद झाला.
स्वतःचा आनंद लपवत ती समरला म्हणाली.. ” समर सर.. चला आता निघते मी. तुमच्यासोबत काम करताना मजा आली. शिकायला मिळालं.”
समर म्हणाला, ” मलाही तुझ्याकडून शिकायला मिळालं.. बर तू पुण्यासाठी कधी निघणार आहेस.. ?”
” दोन दिवसांनी निघेन मी.. थोडी शॉपिंग करायची आहे. ते काय आहे , मुंबईत तस कोणीच नातेवाईक राहत नाहीत आमचे. त्यामुळे इथे येणं होत नाही. इकडच्या शॉपिंग स्ट्रीट बद्दल बरच ऐकल आहे मी. सो दोन दिवस थोड फिरेन. खरेदी करेन.” रेवाने तिचा प्लॅन अगदी सविस्तर रित्या समरला सांगितला.
” मी दोन दिवस सुट्टी घेतली आहे.. मी हे दोन दिवस तुझ्यासोबत आलो तर चालेल..? ” समरने रेवाला विचारले.
रेवाला हे अपेक्षित नव्हते. पण अजून दोन दिवस समर सोबत वेळ मिळेल म्हणून तीही खुश झाली. आणि अस ही तिला मुंबई बद्दल फारस माहीत सुद्धा नव्हत. अनोळखी व्यक्तीची मदत घेण्यापेक्षा ओळखीच्या समर सोबत फिरलेल कधीही उत्तम म्हणून तिने त्याला लगेच होकार दिला. रेवासोबत वेळ घालवायचा म्हणून समरने मुद्दाम सुट्टी घेतली होती.
दोन्ही दिवस अगदी मजेत गेले. समरने जेवढं शक्य होत तिथे तिथे रेवाला फिरवलं, खरेदी गेली. दुसऱ्या दिवशी डिनरसाठी समरने रेवाला त्याच्या आवडीच्या हॉटेलमध्ये नेले. डिनर झाला आणि रेवाने समरसाठी खास घेतलेलं गिफ्ट त्याला दिलं. आणि म्हणाली, ” खूप खूप थँक्यू सर.. तुम्ही माझ्यासाठी खास वेळ काढला..”
रेवाला मध्येच अडवत समर म्हणाला, ” एकतर मला सर बोलणं बंद कर आता.. किती वेळा सांगितलं तुला. आपण ऑफिस मध्ये नाही आहोत. आणि तुझ्यासोबत मला सुध्दा वेळ हवा होता. त्याचं खास कारण आहे.”
रेवाच्या हृदयाची धडधड वाढली.. तिला सुद्धा आता अंदाज आला होता. पण तरीही काहीही कळत नसल्याचा आव आणत तिने त्याला विचारलं.. ” कारण..? कुठलं कारण..?”
समर म्हणाला,” रेवा मला तू आवडतेस.. खरतर पहिल्या भेटीतच आवडली होतीस. ह्या दोन महिन्यात तुझ्या प्रेमात पडलो. मला खूप काही रंगवून सांगता येणार नाही. पण तुझा होकार असेल तर मला लग्न करायला आवडेल तुझ्याशी…”
रेवा स्तब्धच झाली. समर प्रपोज करेल असा अंदाज तिला आला होता, पण लग्नाची मागणी पण घालेल अस तिला वाटलं नव्हत.
ती समरला म्हणाली, ” सॉरी पण मी या सर्वाचा विचार केला नाही. मला पण तू आवडतोस. पण हे असं सर्व….”
“तुझा नकार असेल तरी काही हरकत नाही. मी माझ्या भावना फक्त व्यक्त केल्या.. तुझा नकार असेल तर मी काही तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार.” समर म्हणाला.
” समर तस नाही.. मला थोडा वेळ हवा आहे.. ” रेवा म्हणाली.
” ओक..I can understand … ” समर म्हणाला.
समरने रेवाला ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर सोडलं. वाटेत दोघं एकमेकांशी काही बोललेच नाहीत. एक वेगळाच ऑकावर्डनेस आला होता त्यांच्यात. रेवा फक्त समरला बाय म्हणून निघून गेली. समर खूप उदास झाला होता. रेवाचा बहुतेक नकारच आहे असे त्याला तिच्या वागण्यावरून वाटले. यापुढे तिला त्रास द्यायचा नाही. फोन सुद्धा करायचा नाही. हे त्याने मनोमन ठरवले. आणि तो घराच्या दिशेने निघाला.
दुसऱ्यदिवशी रेवा पुण्याला रवाना झाली. ती तिच्या घरी गेली खरी पण तीच हृदय समरकडे ठेऊन गेली. ती समरच्या प्रेमात आहे ह्याची जाणीव तिला आधी झाली नाही. पण जेव्हा ती समर पासून लांब झाली तेव्हा तिला त्याची कमी जाणवू लागली. इथे समर सुद्धा रेवाच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. त्याने तर रेवाचा नकारच गृहीत धरला होता. त्याने खूप वेळा रेवाचा फोन नंबर डायल केला आणि परत डिलीट केला. दोन आठवडे गेले. रेवाच्याही हळूहळू लक्षात येऊ लागले की ती समरच्या प्रेमात पडली आहे. आणि त्यात गैर अस काहीही नाही… समरने तर प्रेमाची कबुली दिली होती.. आता पाळी रेवाची होती. पण समरने ह्या गेल्या दोन आठवड्यात तिला एकदाही कॉल किंवा मेसेज केला नव्हता. त्यामुळे रेवा बुचकळ्यात पडलो होती. समर जे म्हणाला होता ते खर होतं ना.. समरला काही झाल तर नसेल… असे नको नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले.. समरला फोन करायला तिने मोबाईल हातात घेतला आणि थांबली. फोनवर बोलण्यापेक्षा त्याला जाऊन भेटले तर गोष्टी क्लिअर होतील.
ऑफिस सुटल्यावर रेवा लगेच पुण्याहून मुंबईला निघाली. ऑफिसच काम आहे घरी यायला उशीर होईल असे तिने घरी कळवले. तिला कळत होते ती वेड्या सारख वागते आहे. पण तरी तिला आज हा वेडेपणा करावासा वाटत होता. ती मुंबईला पोहोचली तस तिने लगेच समरला कॉल केला.. रेवाचा नंबर मोबाईल स्क्रीनवर पाहून समर हडबडून गेला.. त्याने फोन उचलला , ” हॅलो रेवा.. कशी आहेस..?”
रेवा म्हणाली, ” मी कशी आहे ते मला भेटून तूच मला सांग..”
“म्हणजे.. ?” समरने विचारले.
” म्हणजे… म्हणजे… मी मुंबईत आले आहे.. दादर स्टेशनला तुझी वाट पाहत आहे.. भेटशील का मला…? ” रेवा म्हणाली
समर साठी हा सुखद धक्का होता.. तो म्हणाला.. ” अग लगेच येतो.. तू तिथेच थांब..”
समर पोहोचला.. रेवा त्याला भेटली.. रेवाला समोर बघून समरला विश्र्वासच बसत नव्हता.. खरच ती त्याला भेटायला आली होती..
दोघेही गोंधळले होते.. काय बोलू हेच दोघांनाही कळत नव्हते..
रेवा म्हणाली..,” समर… आय लव्ह यू टू…”
समर म्हणाला.., ” काय..? आय मीन.. म्हणजे… तू काय बोलते आहेस..? “
रेवा म्हणाली.., ” अरे माझे तुझ्यावर प्रेम आहे. तेच सांगायला मी इथे आले आहे.. तुझ आहे ना प्रेम माझ्यावर.. ? की…?”
समर म्हणाला..,” अग मी काय वेदर आहे का.. बदलायला… आहे.. ऑफकोर्स आहे.. नेहमी असेल… पण तू या दिवसात मला फोनसुद्धा केला नाही.. साधा मेसेज सुद्धा नाही.. जाताना नीट बोलली सुद्धा नाहीस.. मला वाटलं तुझा नकार असेल..”
” तू तरी कुठे फोन आणि मेसेज केले एवढ्या दिवसात.. मला तू आवडायला लागला होता हे खर आहे.. पण हे नक्की प्रेम आहे की आकर्षण हे नव्हत कळत मला.. म्हणून मला वेळ हवा होता.. या दिवसात मला कळलं की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.. आणि तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला मला आवडेल..पण काय रे तू का नाही कॉल केला मला…?” रेवा म्हणाली.
समर म्हणाला.., ” मी तुझा नकारच गृहीत धरला होता.. आणि उगीच कोणाला त्रास देणं मला असही आवडत नाही आणि त्यात तुला तर नाहीच नाही.. म्हणून खूप वेळा तुझा नंबर पण मी डायल करून पुन्हा डिलीट करायचो.. रेवा मी तुला सांगू शकत नाही किती कठीण जात होत माझ्यासाठी… असो.. मी खूप खूष आहे… खूप खूप खुश आहे…”
रेवा म्हणाली.. ” मी पण.. पण मला आता लगेच निघाव लागेल.. मी घरी खोटं बोलून आले आहे.. “
समर म्हणाला.. ” काय बोलली आहेस..?”
“ते सर्व वाटेत सांगते.. आता निघते..” रेवा म्हणाली..
समर म्हणाला,” थांब मी सोडायला येतो तुला घरी..”
रेवा हसत म्हणाली, ” अरे मी इथे नाही राहत .. पुण्यात राहते.. तुला परत यायला खूप उशीर होईल..”
समर म्हणाला, ” मला माहित आहे.. पण मी तुला नाही सोडणार एकटीला. खरतर मला आज तुला कुठेच जाऊ द्याव वाटत नाही आहे.. पण काय करणार…”
अशा प्रकारे समर आणि रेवाने आपापल्या प्रेमाची कबुली दिली. वर्षभर मुंबई पुणे मुंबई असा प्रवास सुरू राहिला.. वर्षभराने घरच्यांच्या संमतीने ते विवाह बंधनात अडकले. आता पुण्याची रेवा मुंबई ची झाली.
अस म्हणतात opposites attracts.. पण रेवा आणि समरच्या बाबतीत अस नव्हत.. ते बरेचसे सारखे होते.. आवडीनिवडी, विचार, तत्व, स्वभाव…
आपण व्यवस्थित सेटल आहोत ना.. भविष्याकडून आपल्याला काय काय हवं आहे या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच दोघं विवाह बद्ध झाले.. फॅमिली प्लॅनिंगच्या बाबतीतही त्याचं मत सारखच होत. एकच बाळ .. मग ते मुलगा असो वा मुलगी.. व्यवस्थित सेटेल आहोत, स्वतःच घर आहे, बाळाला एक चांगल लाईफस्टाईल देऊ शकतो हे त्यांना माहीत होते. त्यामुळे बाळही लवकर प्लॅन करायचं हे त्याचं ठरल होत. अगदीच लगेच बाळ व्हावं असं त्यांचा अट्टाहास नव्हता पण झाल तरी त्यांना हरकत नव्हती…
त्यांचं लग्न होऊन आज चार महिने पूर्ण झाले होते. रेवाची पाळी चुकली होती. त्यामुळे आज तिने प्रेग्नंसी टेस्ट करायचे ठरविले..
( टेस्टचा रिझल्ट काय असेल ते वाचण्यासाठी पुढील भाग वाचा..)
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.