अमोलशी लग्न करून सुरुची पाटलांच्या घरची सून झाली. थाटामाटात लग्न पार पडलं. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटावे इतके दोघं एकमेकांसोबत शोभून दिसत होते. अमोल अगदी मनमिळावू, बोलक्या स्वभावाचा तर सुरुची थोडी बुजरी, स्वतःतच हरवलेली. अमोलच कुटूंब देखील फार छान होतं. मध्यम वर्गीय कुटुंब .. पैशांनी खुप श्रीमंत नसले तरी मनाची आणि विचारांची श्रीमंती होती त्यांच्याकडे. आपल्याला मुलीला असं घर सासर म्हणून लाभलं त्यामुळे सुरुचीचे आई वडील खुप खुश होते. लग्ना नंतरची सत्यनारायणाची पूजा आटोपली. दोन्ही परिवाराचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला.
आता ती वेळ आली होती जेव्हा सुरुची आणि अमोल एकांतात भेटणार होते. एक तर अरेंज मॅरेज, त्यात होकार झाल्यावर एका महिन्यातच त्याचं लग्न झालं , त्यामुळे दोघेही एकमेकांना तसे अनोळखी होते.. सुरुची शी काय बोलायचं , कसं बोलायचं याच विचारात अमोल त्याच्या खोलीत शिरला.. सुरुची आधीच झोपून गेली होती. अमोलला वाटले खुप थकल्यामुळे तिला झोप लागली असेल.. ती रात्र अशीच गेली. सकाळी उठल्यावर बोलू हिच्याशी या विचारात तो ही झोपी गेला. सकाळी उठतो तर सुरुची बाजूला नव्हती.. ती लवकर उठून आईला मदत करायला गेली होती. अमोल सुरुची शी बोलायचा खुप प्रयत्न करत होता.. पण ती संधी काही त्याला मिळेना.आज तो आधीच खोलीत जाऊन बसला होता. सुरुची आली. दोघांनाही खुप अवघडल्या सारख वाटतं होतं.
अमोल काही बोलणार तोच सुरुची पटकन त्याला म्हणाली..,” मला काय वाटतं आपण ३ दिवसांनंतर उटीला जाणार आहोत ना… तर आपण तो प्लॅन रद्द करावा.. मला थोडं ठीक वाटत नाही आहे. “
अमोल लगेच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला,” काय होतंय? डॉक्टर कडे जाऊया का?”
सुरुची म्हणाला,” थोडी दगदग झाली ना लग्नामुळे त्यामुळे त्रास होतो आहे.. मला आराम केल्यावर बरं वाटेल.. मी झोपू का?”असे बोलून सुरुची जाऊन झोपी गेली.
अमोल पुढे काय बोलणार..दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने उटीच्या प्लॅन बद्दल विचारले.. तेव्हाही ती तो रद्द करण्यावर ठाम होती. खरंच तिला बरं वाटत नसेल या विचाराने त्यानेही मग नाईलाजाने का होईना प्लॅन रद्द केला.दिवसा मागून दिवस जातं होते. पण अमोल आणि सुरुची मध्ये काही विशेष संभाषण सुध्दा होत नव्हते. नवीन घर, नवीन माणसं यामुळे ती गोंधळली असेल असा विचार करून अमोल पंधरा दिवस गप्प बसला.
इथे सुरुची हळू हळू घरात रुळत होती. ही माणसं चांगली आहेत याची तिला वेळोवेळी प्रचिती येत होती. पण अमोल पासून ती अंतर ठेऊन वागत होती. तिला स्वतःला तिच्या या वागण्यामुळे त्रास होत होता.’ मी हे लग्न करून चूक केली. या भल्या माणसांना मी फसवल आहे,’ असं काहीसं तिला वाटू लागलं होतं. ती सतत त्याच विचारात हरवलेली असायची. त्याच त्याच गोष्टींचा विचार करत असल्यामुळे सुरुची आता खरंच आजारी पडली.. काम करता करता ग्लानी येऊन पडली. घरच्यांनी डॉक्टरला बोलावले. स्ट्रेसमुळे असं झालं असे डॉक्टर म्हणाले आणि काही औषधं देऊन निघून गेले.
अमोल तिच्या जवळच बसून होता. विचार करत होता,’ नक्की हिच्या मनात काय आहे ? का ही सतत दूर पळत असते माझ्यापासून ? साधं बोलायलाही येत नाही ही माझ्याशी? हे लग्न हिला मान्य तर होत ना? ‘
या विचारात असतानाच सुरुची बडबडू लागली,” मी अपवित्र आहे. मला सोडा , जाऊ द्या, माझी योग्यता नाही”
तिची बडबड ऐकून अमोल तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. त्याने तिला स्पर्श करताच ती ताडकन उठून बसली..
ती अमोल वर भलतीच चिडली होती,” मला हात कसा लावला तुम्ही,? किती वाईट आहात तुम्ही? माझ्या या अशा अवस्थेचा पण फायदा घेताय? लाज नाही वाटत?”
आता अमोलचा पारा चढला होता,” बसं झालं हा.. वाटेल तस बोलत आहेस तू. फायदा घ्यायचा असता तर कधीच घेतला असता, अगं इतके दिवस उलटून गेले आपल्या लग्नाला साधं बोलणं सुध्दा होत नाही आपल्यात.. नवीन घर, नवीन माणसं या सर्वात गोंधळली असशील , तुला तुझा वेळ मिळवा म्हणून मी तुला समजून घेतो आहे. एका शब्दाने तक्रार केली नाही.. तुझी काळजी वाटते म्हणून इथे तुझ्या उशाशी बसून होतो. आणि तू काय म्हणतेस… शी.. खरंच मला तुझ्या विचारांची कीव येते… काय झालं आहे असं..? आता मला उत्तर देच तू.. तुला हे लग्न मान्य नव्हता का? की तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आहे? हे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली का तुझ्या घरच्यांनी? मला आज उत्तरं हवी आहेत माझ्या प्रश्नांची.. बोल..”
सुरुची भानावर आली होती.. आपण अमोलला काय बोलून गेलो .. तिला आता पश्चाताप होत होता.. ती रडू लागली.. आणि म्हणाली, “मला माफ करा.. खरंच माझी योग्यता नाही आहे तुमची बायको म्हणून घ्यायची.. तुम्ही सर्वच खुप चांगले आहात.. मी नाहीये.. मी अपवित्र आहे.. मला इथून गेलं पाहिजे.. मी माझ्या घरी जाईन.. उद्याच निघून जाईन.. तुम्हाला त्रास नाही देणार..”
अमोल म्हणाला,” अग काय बोलते आहेस तू.. लग्न झालं आहे आपल.. खेळ वाटतो का तुला..हे लग्न कुठल्या दबावाखाली केलं आहेस का तु? नक्की काय झालं आहे? आणि अपवित्र म्हणजे काय? प्लीज सर्व नीट सांग.. त्या शिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही.”
सुरुची खुप रडू लागली. तिला असंही तीच मनमोकळ करायचं होत. तिने सांगायला सुरुवात केली.,” माझ्यावर लहानपणी बलात्कार झाला होता..मी अपवित्र आहे.” हे ऐकुन अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली.
पुढे काय झालं… हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरूर वाचा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


