Home » Marathi » Stories » अनपेक्षित सारे..

अनपेक्षित सारे..

” निक अरे इथे ये..” प्रांजली म्हणाली.

” काय झालं ग..? सांग ना..” निखिल बसल्या जागेवरूनच म्हणाला

” नाही.. तू इथे ये.. तुला काही तरी दाखवायचे आहे..” प्रांजली म्हणाली..

” प्लिज नको ना.. काम करू दे..” निखिल म्हणाला..

” तू ये इथे..” प्रांजली आता अगदी ओरडुनच म्हणाली..

” घे आलो.. दाखव आता.. काय आहे ते…” निखिल तिच्या जवळ येत म्हणाला.

” अरे हे बघ.. लोकं कशी मस्त फिरायला जात आहेत.. गोवा, हिमाचल, मालदीव, महाबळेश्वर, उटी… आता कंप्लीट अनलॉक झालं आहे . तर आपण सुध्दा प्लॅन करूया ना काहीतरी..” प्रांजली तिचं सोशल मीडिया अकाउंट निखिलला दाखवत म्हणाली..

” हममम.. बघू…” निखिल म्हणाला.

” अरे काय रे .. मला वाटलं गोव्याला जाऊ म्हणशील. राहिला आहे ना आपला तो प्लॅन.. जाऊ दे..” प्रांजली थोड रुसून म्हणाली.

” अच्छा.. म्हणजे तुला गोवा चालला असतं.. ? ” निखिल म्हणाला.

” म्हणजे..? ” प्रांजलीने विचारले.

” अग.. तुला गोवा चाललं असतं हे आधी माहीत असतं तर मी मालदीवचा प्लॅन करत नसतो बसलो…” निखिल हसत हसत म्हणाला..

” म्हणजे.. म्हणजे.. म्हणजे….” प्रांजली अगदी खुर्ची वरून ताडकन उठली आणि आनंदाने नाचत म्हणाली.

” हो.. म्हणजे… मालदीवला जाऊया आपण असा विचार करत होतो..” निखिल म्हणाला.

” मी स्वप्न तर बघत नाही आहे ना.. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अस झालं आहे माझं…” प्रांजली हसत म्हणाली..

” अगं म्हणजे मी विचार करतो आहे.. सर्व वर्कआऊट व्हायला दोन तीन महिने जातील.. चालेल ना..?” निखिल ने विचारले..

” अरे चालेल ना.. इंटर नॅशनल टुरच प्लॅनिंग करायला एवढा वेळ तर लागेलच.. I know that..” प्रांजली म्हणाली.

” चालेल मग.. बघतो मी..” निखिल म्हणाला.

” आई अप्पां ना विचारते… अरे पण आई अप्पा ना कस वाटेल मालदीव.. म्हणजे ते हनिमून स्पॉट सारख आहे ना.. थांब थांब दुसर ठिकाण बघुया..” प्रांजली म्हणाली.

” मी आई अप्पांना आधीच विचारलं आहे. त्यांना एवढं ट्रॅव्हल करायची अजिबात इच्छा नाही. म्हणूनच मग मी मालदीवचा विचार केला .. पण बरेच दिवस झाले अप्पा गावी जायचं म्हणता आहेत. मी काय म्हणतो जाऊया का..? सुट्टी मिळेल का तुला आता..? ” निखिलने विचारले.

” ग्रेट आयडिया… जाऊया ना.. पण लगेच नाही जमणार.. पुढच्या महिन्यात जाऊया का..? चालेल..? ” प्रांजली म्हणाली.

” डन… जाऊया आपण…” निखिल म्हणाला..

ही गोष्ट आहे सुरू होते साधारण जानेवारी २०२१ पासून. तेव्हा अनलॉक प्रोसेस सुरू होती. कोरोना संपलाच आहे असेच समजून लोक बाहेर पडले होते. सगळी कडे खूप गर्दी व्हायला लागली होती. काहींच्या मते कोरोना एवढा भयानक आजार नाही.. झाला तर गप्प पंधरा दिवस घरी बसायचं.. असच गणित होत. लोकांचं पूर्णपणे चुकत नव्हत. कंटाळा, एकटे पण, गरज अजून बरच काही .. अशी प्रत्येकाची घराबाहेर पडण्याची वेगवेगळी कारणे होती. तर असे हे निखिल, प्रांजली, आणि निखिलचे आई अप्पा.. चौघांनी वर्षभर खूप काळजी घेतली. पण आता सगळी कडेच न्यू नॉर्मल लाईफ सुरू झाली होती.. मग हे तरी कुठे मागे राहणार.. फेब्रुवारी महिन्यात चौघे गावी गेले. आठवडाभर राहिले.. खूप मज्जा केली. सर्वांना भेटले. पुढच्या महिन्यात होणाऱ्या लग्न सोहळ्याचेही आमंत्रण त्यांना मिळाले..

” चला म्हणजे आता पुढच्या महिन्या अखेरीस सुद्धा एक फेरी होईल..” अप्पा म्हणाले.

” एक मुलांनो , तुम्ही यायच्या भानगडीत पडू नका.. तुम्हाला परत सुट्ट्या राखून ठेवावा लागतील ना.. आम्ही दोघेच येऊन जाऊ..” आई म्हणाली.

मुंबईत आल्यावर सर्वांचे रूटीन लाईफ पुन्हा सुरू झाले. मार्च महिना आला.. कोरोनाचे केसेस वाढत असल्याचे बातम्यांमध्ये दाखवण्यात आले.

” निक अरे केसेस वाढताहेत.. आता काय करायचं..?” प्रांजली काळजीने निखिलला म्हणाली.

” कोरोना इतक्या लवकर संपेल अस मला नाही वाटत.. आपल्याला त्याच्या सोबत जगायची सवय करावी लागेल.. आपल्याला आपली काळजी घ्यावी लागेल. आता आपण असेच घरात बसून नाही ना राहू शकत.. बघ तब्बेतीत थोडा जरी बिघाड झाला की खूप काळजी घेऊ.. आणि असे ही कोरोनाची लक्षण आपल्याला माहीत आहेत.. बस मग.. तस काही वाटलं की मग लगेच कोरोना टेस्ट करून घेऊ.. ” निखिलने तिला समजावलं.. तिलाही ते पटलं..

मार्च अखेरीस आई अप्पा लग्नाला गेले. दीडशे माणसं येणार फक्त असच त्यांना या आधी पर्यंत माहीत होत.. पण प्रत्यक्षात चित्र वेगळं होत.. कमीत कमी हजार माणसं लग्नाला आली होती.. आईने निखिलला तस फोनवर सांगितलं.. निखिल थोडा घाबरला.. पण आता घाबरून काही उपयोग नव्हता.. दोन दिवसांनी आई अप्पा घरी आले.. तीन एक दिवस निखिलने त्याच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष दिलं.. पण ते ठणठणीत होते.. त्याची काळजी मिटली…

दहा दिवसांनी अप्पांचे डोळे खूप लाल होऊन जळू जळू लागेल.. डोळे आले आहेत म्हणून डॉक्टरने औषध दिले.. तीन दिवसांनी अप्पांना डोके दुखी सुरू झाली.. त्यांचा चेहरा उतराला.. खाण्या पिण्याची इच्छा गेली. प्रांजलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

” कोरोना तर नसेल ना..?” ती निखिलला म्हणाली.

” कोरोनामध्ये डोळ्यांना थोडीच काही त्रास होतो.. आणि डॉक्टर म्हणाले असते ना कोरोना असता तर…” निखील म्हणाला..

दुसऱ्या दिवशी प्रांजलीने बातम्यांमध्ये पाहिले.. कोरोनाची नवीन लक्षण.. आणि त्यातलच एक लक्षण होत.. डोळे येणं.. प्रांजली ताडकन उठली.. निखिल कडे गेली.. कोरोनाच्या नवीन लक्षणाबद्दल तिने त्याला सांगितले..

” मी डॉक्टरांशी बोलतो.. आणि बघू पुढे काय करायचं ते..” निखिल म्हणाला..

रात्री पर्यंत आईला ताप आला.. आता तर प्रांजली आणि निखिलला खात्री पटली हा कोरोनाच आहे.. दुसऱ्या दिवशी घरातल्या सर्वांची टेस्ट करून घ्यायचे ठरले..

” ही नवीन लक्षण आहेत ..फर्स्ट वेव्ह मध्ये ही लक्षण नव्हती पेशंट मध्ये. “डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांनी सिम्प्टम्स नुसार औषध सुरू केली..

सकाळी कोरोना टेस्टला गेले असता तिथे कळलं की पेशंट खूप आणि टेस्ट कीट कमी.. त्यामुळे लोक सकाळी सहा वाजता येऊन लाईन लावतात.. निखिलने त्याच्या आसपासच्या परिसरातल्या प्रत्येक लॅबमध्ये चौकशी केली. पण परिस्थिती तिचं.. घरी येऊन टेस्ट करणे ही बंद झाले होते..
“आता उद्याच परत यावे लागेल.. “निखिल म्हणाला..

रात्री पर्यंत निखिल आणि प्रांजलीला ताप आला.. आता तर शंभर टक्के खात्री झाली हा कोरोनाच आहे.. ” पण परिस्थिती बिकट झाली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करायची वेळ आली तर कोरोना टेस्टचा रिपोर्ट गरजेचा आहे.. “डॉक्टरने त्यांना सागितले. तशी डॉक्टरने त्या चौघांची ट्रीटमेंट सुरू केली होती..

टेस्ट झाली.. सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आला.. “घाबरण्या सारखे काही नाही.. फक्त तुम्ही दर चार तासांनी मला Saturation आणि तुमचं Body Temperature पाठवा. औषध वेळेत घ्या.. योग्य आहार घ्या.. पण हा.. Saturation Drop झालं तर मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल..” डॉक्टरांनी सांगितले..

दोन दिवस गेले.. आणि अप्पांचे saturation drop झाले. हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले.. हॉस्पिटल शोधण्यासाठी निखिल आणि प्रांजलीने सर्व प्रयत्न केले.. रुग्ण इतके वाढले होते की आता हॉस्पिटलच्या बेडसाठी मारामारी सुरू होती.. नशिबाने रात्री पर्यंत एक हॉस्पिटल बेड उपलब्ध झाला. निखिलने अप्पांना तिथे दाखल केलं.. ट्रीटमेंट सुरू झाली.. तीन दिवसांनी त्यांच्या तब्बेतित सुधारणा झाली..

” अजून दोन दिवस ठेऊन मग घरी सोडू.. “तिथले डॉक्टर म्हणाले..

सर्वांच्या जीवात जीव आला.. पण नियतीच्या मनात वेगेळे काही होते.. अचानक अप्पांची तब्बेत ढासळली.. आता त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागणार होती.. त्या हॉस्पिटल
मध्ये व्हेंटिलेटर नव्हते.. निखिल आणि प्रांजली चे धाबे दणाणले.. सगळी कडे फोनाफोनी सुरू झाली.. नशिबाने तेव्हा कोविड सेंटरमध्ये एक व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला. असे का झाले.. अचानक ते इतके सिरीयस कसे झाले.. याच उत्तर कोणाकडेच नव्हते..

एक एक दिवस कठीण होत जात होता.. निखिल ,प्रांजली आणि आई घरच्या घरी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने बरे होत होते तेवढी काय ती देवाची कृपा..

निखिलने कोविड सेंटरमध्ये खूप विनवणी केली एकदा अप्पांना भेटू द्या.. पण नियमानुसार त्याला भेटता येणार नव्हते…

अप्पांची प्रकृती कधी सुधारत होती तर कधी ढासळत होती.. घरात महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू झाला होता.. देवाला साकडं घातलं जातं होत.. बस अप्पा घरी येऊ देत हीच आता सगळ्यांची देवा चरणी प्रार्थना होती..

असेच पंधरा दिवस गेले. रात्री बारा वाजता फोन आला.
” अप्पांची प्रकृती बिघडली आहे.. कदाचित आता थोडेच तास आहेत त्यांच्या कडे. ” डॉक्टर म्हणाले..

निखिलला काय करावं सुचत नव्हत.. त्याने आणि प्रांजलीने आईला न कळवता कोविड सेंटरला जायचं ठरवलं.. ते निघाले. एकदा भेटू द्या म्हणून निखिल आणि प्रांजलीने खूप गयावया केली. पण त्याचा काही उपयोग नव्हता.. उलट ते एवढ्या रात्री तिथे आले म्हणून त्यांना तिथून निघायला सांगण्यात आले..

” अप्पा शेवटच्या घटका मोजत आहेत आणि मी निष्क्रिय होऊन …” निखिलचा आवाज कापत होता.. कंठ दाटून आला होता.

“आपल्याला घरी जावं लागेल.. आईसाठी.. ” प्रांजली म्हणाली.

तिथून निघण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता. ते हताश होऊन घरी परत आले..

सकाळी पाच वाजता डॉक्टरांचा कॉल आला.. अप्पा गेले होते..

काही दिवसात होत्याच नव्हत झालं होत.. सगळं काही वाईट पद्धतीने बदललं होत..

कोविड मुळे मृत्यू झाल्यामुळे जास्त कोणाला भेटायची परवानगी नव्हती. निखिलला PPE कीट देऊन अप्पांच पार्थिव देह दाखवण्यात आला. आई आणि प्रांजलीने लांबुनच दर्शन घेतले.

सर्व विधी आटपून तिघंही घरी परतले.. नातेवाईक फोन करत होते. निखिल आणि आई बोलायच्या मनस्थितीत नव्हते. प्रांजली सर्वांशी बोलत होती. शेजारी पाजारी सुद्धा फोन वरून विचारणा करत होते.. आई खूप रडत होत्या.. त्यांचं दुःख व्यक्त करत होत्या.. पण निखिल शांत झाला होता.

हसत्या खेळत्या घरात काही दिवसात स्मशान शांतता पसरली होती. दहा दिवस गेले.. आई आणि प्रांजली यातून सावरत होत्या.. पण निखिल… एकदम शांत झालेला. कोणाशीच बोलत नव्हता. तासनतास एकटा बसून राहायचा. रात्री घरात भुता सारखा फेऱ्या मारत राहायचा.. काही विचारलं की तेवढंच बोलायचा.. प्रांजलीला काळजी वाटू लागली.. याला कदाचित मानसोपचार तज्ञांकडे न्याव लागेल असं तिला वाटू लागलं..

रविवारचा दिवस होता.. सगळीकडे कडक लॉकडाऊन.. सकाळचे अकरा वाजले होते.. आणि दाराची बेल वाजली.. प्रांजलीने दार उघडले.. दारात दोन व्यक्ती उभ्या होत्या..

” निखिल इथेच राहतो ना..?” त्यातला एक म्हणाला.

” हो.. एक मिनिट हा.. निखिल.. कोणी तरी आल आहे.. ” प्रांजलीने दारातूनच निखिलला आवाज दिला..

निखिल आला.. समोरच्या व्यक्तींना पाहून त्याला आनंदाचा धक्काच बसला..

” अग.. हे माझे वर्ग मित्र.. विजय आणि राजेश.. आत या रे..” निखिल म्हणाला..

” सॉरी हान.. मी ऐकून आहे तुमच्याबद्दल.. पण कधी भेटलो नाही आपण म्हणून ओळखलं नाही.. आणि सध्या घरी कोणी येत नाही.. म्हणून हे तुमचं अस येणं अपेक्षीत नव्हत..” त्यांना आत घेत प्रांजली म्हणाली.

ते दोघे खाली जमिनीवर एका कोपऱ्यात बसेल..

” अरे काय करता आहात.. वर बसा..” निखिल म्हणाला..

” हे बघ तू बस आमच्या समोर.. खरतर आम्हाला अप्पा गेले त्याचं दिवशी यायचं होत.. पण तू फोन उचलत नव्हतास.. किती फोन केले तुला.. शेवटी आज आलो.. आम्ही इथेच खाली बसतो .. वर नको.. आम्ही मास्क लावला आहे तुम्ही सुद्धा लावा.. लांबूनच बोलू आपण.. आणि वहिनी आम्हाला काही चहा पाणी नको .. आमची सोय आम्ही केली आहे.. हे बघ पाणी पण सोबत घेऊन आलो आहोत. तुम्ही फक्त बसा.. आणि आम्ही गेलो की इथे ही जागा sanitize करून घ्या..” राजेश म्हणाला.

” अरे अप्पा कोरोना मुळे गेले आणि आम्हाला पण कोरोना होऊन गेला आहे, म्हणून इथे शेजारी सुद्धा आम्हाला विचारत नाही आहेत. नातेवाईकांची तर गोष्टच वेगळी.. प्रांजलीचे आई बाबा पण परदेशात असतात त्यामुळे ते येणं तर शक्यच नाही..प्रत्येक जण तस घाबरलेला आहे.. त्यामुळे आम्हाला कोणी हाक मारायला येईल अस आम्हाला वाटलच नव्हतं.” निखिल म्हणाला..

” बरोबर आहे रे तुझ.. परिस्थिती तशी आहे.. आम्हाला कसही करून यायचच होत.. थोडा विचार केला.. मग ही शक्कल सुचली..Social Distancing चे नियम पाळून तर भेटूच शकतो आपण.. या सुरुवातीच्या काळात भेटणं महत्त्वाचं… त्या काळात गरज असते आपल्या माणसांची.. नंतर तीन चार महिन्यांनी आलो असतो तर त्याला काही अर्थ नव्हता.. असेही बाजारात फिरतो, गरज नसतानाही बाहेर फिरतो.. मग अशा वेळी तुम्हाला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता म्हणून भेटणं टाळायचं हे पटत नव्हत रे.. सारख फोन करून मेसेज करून किती त्रास देणार ..जर तुम्हाला आता कोरोना असता तर नसतो आलो आम्ही सुद्धा.. थोडे दिवस जाऊ दिले असते.. ” विजय म्हणाला.

पुढे निखिल , आई, प्रांजली, विजय आणि राजेश याच्या गप्पा झाल्या.. त्यांच्याशी बोलताना निखिल थोडा मोकळा झाल्या सारखा वाटत होता.. प्रांजली लक्ष निखिलकडेच होत..

दोन तासांनंतर ते गेले.. निखिल आज खूप दिवसांनी काही तरी बोलला होता.. ते पाहून प्रांजलीला बरे वाटले.. आज याच्याशी बोलते. असे तिने ठरवले..

रात्री निखिल खिडकीपाशी एकटाच बसला होता.. प्रांजली त्याच्या जवळ गेली.. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला..

” मुलगा म्हणून मी नालायक ठरलो…” निखिल म्हणाला.. आणि लहान मुलांसारखे रडू लागला..

” निखिल अरे.. अस नको म्हणू.. तू रड हवं तेवढं.. मोकळा हो.. पण स्वतः ला दोष नको देऊ.. खूप दिवस बघते आहे मी तुला.. अप्पा गेले ते खूप वाईट झाल.. पण अजून काही तरी आहे जे तुला आतल्या आत मारत आहे . प्लिज बोल..” प्रांजली म्हणाली..

” अग.. किती ही वाईट वेळ.. मला साधं भेटता सुध्दा आल नाही त्यांना.. काहीच करता आल नाही.. त्यांच्या पार्थिव शरीरावर साधं एक फुल ठेवायला मिळालं नाही.. नेहमी देव्हारा फुलांनी सजवायचे ते आणि त्यांना फुल मिळालं नाही…नेहमी लोकांच्या चांगल्या वाईट प्रसंगी ते जायचे.. माणूस म्हणून हे आपलं कर्तव्य आहे अस म्हणायचे.. पण त्यांना अस मरण यावं की त्यांना खांदा द्यायला चार माणसं येऊ शकली नाहीत.. अग या हातात उचलला मी त्यांचा देह.. आणि मीच त्यांना चितेवर ठेवलं.. ते हे जग सोडून गेल्यावर मला ppe कीट घालून त्यांच्या जवळ जावू दिलं , हेच जर ते जिवंत असताना मला एकदा भेटू दिलं असतं तर… मी हरलो ग.. माझ्या आई अप्पांना मी कधीच काही कमी पडू दिलं नाही हा माज होता मला.. तो काही क्षणात उतरला.. ते गेले.. जो जन्माला आला आहे तो कधी ना कधी तर जाणारच हे मला माहीत आहे.. पण त्यांनी अस जायला नको होत.. मी हरलो..” असे म्हणत निखिल खाली कोसळला… त्याचा एक एक शब्द प्रांजलीच्या वर्मी लागत होता.. त्याच्या मनात उठलेलं हे वादळ तो आता शब्दांनी व्यक्त करत होता.. त्याचं व्यक्त होण खूप गरजेचं होत..

तो पुढे बोलू लागला..” आज हे मित्र आले , त्यांना भेटून बर वाटल.. अप्पां विषय ते जे काही बोलत होते ते ऐकून बर वाटल.. का कोणास ठाऊक पण त्यांच्याशी बोलून खूप मोकळं झाल्यासारखं वाटलं.. आता तुझ्या समोर व्यक्त व्हावास वाटलं..”

” बरं झालं बोललास तू हे सर्व.. हे बघ तू एकटा कुठे ही चुकला नाहीस. आपण सर्व चुकलो आहोत.. कोरोनाच्या सेकंड वेवला आपण सतर्क होण गरजेचं होत.. फक्त आता हेच निशिब मानू की अजून काही कॉसुल्टी नाही झाली आपल्या घरात.. बघ आसपास.. कुटुंबच्या कुटुंब मारताहेत . अप्पा गेले ते खूप वाईट झाल.. पण आपल्याला सावराव लागेल.. आईंसाठी.. अरे त्या आपल्या कडेच बघून जगणार आहेत आता.. या आधी जो मूर्खपणा केला आपण तो पुन्हा नाही करायचा.. आणि खरंच अरे तुझे मित्र आले ते बर झालं.. हाच प्रसंग आपल्या जागी कोणा आपल्याच ओळखीच्या दुसऱ्या कुटुंबावर ओढवला असता तर आपण कसे वागलो असतो हे माहीत नाही.. पण आता अस पुढे जर झालं तर नक्की कसं वागल पाहिजे ते तुझ्या मित्रांमुळे आपल्याला माहीत आहे.. आपल्याला माणसांना नाही तर कोरोनाला हरवायच आहे.. हे आपण ध्यानात ठेवल पाहिजे.. बघ ना ते जे काही बोलले ते योग्य बोलले.. खरंच या आधीच्या काळात खूप गरज असते आपल्या जवळच्या माणसांची.. त्यांना मिठी मारून तुझ सांत्वन नाही करता आलं.. पण या अशा परिस्थितीत ते इथे आले. आणि त्यांनी जी शक्कल लढवली ती सुद्धा मनण्यासारखी आहे .” प्रांजली म्हणाली..

निखिलला तिचे म्हणणे पटत होते.. पण आज त्याच्या डोळ्यांतले अश्रू अनावर झाले होते… प्रांजली ही त्याचा हात हातात पकडुन त्याच्या जवळ बसून होती.. थोड्या वेळाने निखिलचा डोळा लागला.. आज खूप दिवसांनी त्याला झोप लागली होती.. त्याला झोपवून प्रांजली बाहेर खोलीच्या बाहेर पडली.. तिच्या मनात त्याच्या मित्रांचा विचार येत होता.. देवदुता सारखच आले होते ते.. त्यांनी काय अशी जादू केली ते तिला ही कळत नव्हते.. पण निखिल मोकळेपणे मनातली गोष्ट बोलला होता.. कोणी गेल्यावर लोक त्या सुरवातीच्या पंधरा दिवसात हाक मारायला का येतात.. ते एवढं गरजेचं का असतं. हे आज तिला जाणवलं.. नाहीतर एरवी तिला वाटे की उगीच लोक दुखी घरात जाऊन त्यांना पुन्हा दुखी करतात.. कदाचित अजून चार वेगळ्या लोकांशी बोलून त्यांना ,भेटून, थोड हलकं वाटत असावं.. कदाचित चार माणसं भेटल्यावर थोडे वेगळे विषय , ईकडचे तिकडचे विषय निघतात त्यामुळे दुःखातून बाहेर पडायला मदत होत असेल . कदाचित… नक्की काय होती या प्रश्नाची उत्तरं ते तिला माहित नव्हत.. अप्पा ज्या प्रकारे गेले ते दुःख खूप मोठं होत.. यातून बाहेर यायला निखिल ला खूप वेळ लागणार होता.. पण आता निदान तो मनातलं बोलायला लागला होता याचं प्रांजलीला समाधान वाटत होत. यासाठी तिने या अनपेक्षित पाहुण्याचे आणि देवाचे तिने मनोमन आभार मानले..

( वाचकहो.. ही कथा काल्पनिक आहे.. पण या कथेतील काही प्रसंग मी अनुभवले आहेत.. सत्य परिस्तिथी कथेत वर्णल्या पेक्षा विदारक होती.. आपल्या पैकी बऱ्याच जणांनी अशी परिस्थिती अनुभवली असेल गेल्या काही महिन्यांमध्ये. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज आहे..ती येऊच नये अशी देवाकडे प्रार्थना आहेच.. पण आपण जागरूक राहणे गरजेचे आहे . कोरोना आपले किती नुकसान करू शकतो हे त्याने दुसऱ्या लाटेत आपल्याला दाखवून दिले आहे.. वेळीच सावध होण्याची गरज आहे.. घरीच बसा.. अस मी मुळीच म्हणणार नाही.. कारण बाहेर पडून उपजीविका चालवणे हे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहेच.. पण आपण काळजी जरूर घेऊ शकतो.. दुसऱ्या लाटेत आपली आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली.. पण थांबली नाही.. ती कोलमडून पाडण्यासाठी कारण सुद्धा आपलाच हलगर्जीपणा होता.. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात अजून दुसर काय होणार.. आणि या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढायला कोणी वाली येणार नाही तर आपल्यालाच यातून बाहेर यावं लागेल.. कोरोना विरुद्ध लढव लागेल. त्याला हरवाव लागेल.. पण ही लढाई थोड्या वेगळ्या स्वरूपाची आहे हे समजून घेणं आधी गरजेचं आहे.. काही ठिकाणी अजूनही कोरोना झालेल्यांना किंवा त्यातून बरे झालेल्यांना हिन वागणूक दिली जाण्याच्या बातम्या येतात तेव्हा फार वाईट वाटते. आपण कोरोना विरुद्ध लढतो आहोत कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या विरुद्ध नाही.. दुसऱ्या लाटेत जशी काही नवीन लक्षण समोर आली तशीच तिसऱ्या लाटेत समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.. त्यामूळे आपल्या प्रकृतीत थोडा जरी बिघाड झाला तर त्या कडे दुर्लक्ष करू नका.. )

फोटो साभार – solutionistcounseling.com

            समाप्त.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

वाचकहो.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *