Home » Marathi » Stories » माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग २

माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग २

दुसऱ्या दिवशीची पहाट साजिरीसाठी असंख्य प्रश्न घेऊन आली.. ” खरंच मला विक्रम बद्दल काय वाटतं..? पण हा विचार का करते आहे मी..? माझं आधीच ठरलं आहे प्रेम विवाह नाही करायचा.. आई बाबा म्हणतील तिथेच लग्न करायचं.. पण विक्रमची सोबत … आवडते मला.. त्याचा सहवास आवडतो, त्याच्या सोबत असताना वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही . कळतं नकळत पणे होणारा त्याचा स्पर्श आवडतो.. त्याच्या सोबत रहावस वाटत. तो सोबत नसताना सुद्धा त्याच्या आठवणी सोबत असतात.. हे प्रेम आहे का…? नको नको .. ह्या गोष्टींचा विचार करायलाच नको.. आणि अस ही मी विकीला मला रीतसर मागणी घाल अस म्हटल आहेच ना.. तो बघून घेईल आता पुढचं काय ते.. ” असे सर्व विचारचक्र तिच्या मनात सुरू होत..

नेहमी प्रमाणे विक्रम तिला ऑफिसमध्ये लंच ब्रेक मध्ये भेटला.. जस की काही झालच नाही असच तो वागत होता.. त्याचं तस वागणं पाहून साजिरी त्याला म्हणाली,” विकी काल जे झालं..”

” नको तो विषय.. हे बघ माझ्यासाठी तुझं मत काय आहे ते आधी महत्त्वाचं आहे.. पण तुझं काही मतच नाही… असो.. नको तो विषय पुन्हा.. ” असे म्हणून विक्रमने तो विषय तिथेच थांबवला.

पुढे सर्वांच रूटीन लाईफ सुरू होतच.. साजिरी आणि विक्रम सुद्धा एकमेकांसोबत पूर्वी सारखे वागत होते.. अशातच त्यांचा हिमालयीन ट्रीपचे दिवस जवळ आले.. पंधरा दिवसांची ट्रीप होती. शॉपिंग सुरू झाली. ट्रीपच्या एक दिवस आधी सर्वांनी प्रितीच्या घरी भेटायचे ठरवले.. प्रितीच्या घराच्या अंगणातच बसून गप्पा सुरू होत्या. इतक्यात प्रिती विक्रमला म्हणाली,

” विक्रम तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे..”

” काय ग..? ” विक्रमने विचारले..

” तुझ्या पाठी बघ..” प्रिती म्हणाली..

प्रितीच्या बंगल्याच्या गेट मधून एक मुलगी येत होती.. सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेलं.. ती जशी जवळ येऊ लागली.. विक्रम जागेवरून उठला.. ती ही अगदी धावत विक्रमच्या दिशेने आली.. आणि विक्रमला मिठी मारून म्हणाली, ” आय मिस्ड यू स्वीटहार्ट..”

हे पाहून साजिरीला धक्काच बसला.. पण तिला अजून धक्के बसायचे बाकी होते..ती जेवढं विक्रमला ओळखत होती तो असा इतका कोणाच्याही जवळ नव्हता.. ही कोण आहे..? कुठून आली..? असे सर्व प्रश्न तिच्या मनात उभे राहिले..

प्रिती जागेवरून उठली. तो पर्यंत त्या मुलीने विक्रमला मिठीतुन मोकळे केले होते. प्रितीने तिला आलिंगन दिले. आणि मग सगळ्यांना उद्देशून म्हणाली, ” अटेंशन एवरी वन, मीट अदिती. ही विक्रमची फ्रेंड आणि आमची फॅमिली फ्रेंड आहे. गेली पाच वर्षे अमेरिकेत होती मागच्याच महिन्यात इंडिया मध्ये परत आली आहे आणि ही आपल्या सोबत ट्रीपला सुद्धा येत आहे..”

” ओह माय गूडनेस.. तू पण येते आहेस.. आता तर धमाल येईल..” विक्रम आनंदाने म्हणाला.

” पण आता लास्ट मिनिट बुकिंग कशी होईल..? सर्व अरन्जमेंट कसे होतील.? ” साजिरी म्हणाली.

” तू काळजी नको करू साजिरी.. ऑलरेडी झाल आहे सर्व.. आपण ज्या ग्रुप सोबत जात आहोत त्यांना मी आधीच इन्फर्म केलं होत. सो त्यांनी सर्व अरेंज केलं आहे..” प्रिती म्हणाली..

” ओह.. दॅट्स ग्रेट…” थोड्याशा नाराजीनेच साजिरी म्हणाली.

सर्व आपापल्या घरी गेले. आज विक्रम साजिरीला सोडायला आला नाही. तो अदितीशी गप्पा मारण्यात इतका गुंतला होता की साजिरी कधी निघाली हे त्याला कळले सुद्धा नाही.. साजिरीला ह्या गोष्टीचे फार वाईट वाटले.

अदितीच्या येण्याने साजिरीला खूप त्रास होत होता.. ‘ आपण का ह्या गोष्टींचा विचार करतो आहोत.. गप्प झोपूया उद्या लवकर उठायचे आहे.. ‘, म्हणून तिने झोपण्याचा खूप प्रयत्न केला.. पण तिला काही झोप लागलीच नाही.

पहाट झाली.पण साजिरीच्या मनावर मळभ दाटून आलं होत. मुंबई ते चंडीगढ फ्लाईट, मग तिथून अमृतसर आणि अमृतसरमध्ये दोन दिवस मुक्काम करून मग पुढे मनाली असा प्रवासाचा बेत होता..

साजिरीने विक्रमला फोन लावला..

” विकी अरे कुठे आहेस तू..? अजून आला नाहीस मला पिक करायला..” साजिरी म्हणाली.

” अग मी अदितीला घेऊन येतो आहे. प्रिती म्हणाली ती तुला पिक करेल..” विक्रम पलीकडून म्हणाला..

” विकी काय हे… तू पण ना..जाऊ देत..” म्हणत साजिरीने फोन ठेवला.

थोड्याच वेळात तिला न्यायला प्रिती आली. साजिरीचा पडलेला चेहरा पाहून प्रितीने तिला कारण विचारले असता तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला.

फ्लाईट मध्ये सर्व आपापल्या जागी बसले होते. थोड्या वेळाने अदिती उठून विक्रमच्या बाजूला जाऊन बसली. आणि त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाला तिच्या जागेवर बसण्याची विनंती केली. अदितीला विक्रमच्या बाजूला बसलेले पाहून साजिरीला प्रचंड राग आला.. चंडीगढला उतरल्यावर अमृतसर पर्यंतच्या बस प्रवासात सुद्धा पुन्हा तेच… न राहून साजिरीने तिच्या शेजारी बसलेल्या प्रितीला विचारले..

” प्री अग ही अदिती नक्की कोण आहे..”

” त्या दिवशी तर ओळख करून दिली होती ना सर्वांना… विसरलीस का तू…?” प्रितीने विचारले.

” नाही अग.. तस नाही.. विक्रम आणि तिचं … म्हणजे ते खूप क्लोज फ्रेंड आहेत का..? म्हणजे या आधी विक्रम कधीच काही बोलला नाही मला तिच्या बद्दल… आणि …” बोलता बोलता साजिरी थांबली.

” अच्छा तस विचारते आहेस.. अग ते चड्डी बडी आहेत.. अदितीला विक्रम खूप आवडतो. अक्च्युअली आम्हा सर्वांना पण अदितीच विक्रमसाठी परफेक्ट वाटते. बघ ना किती छान दिसतात सोबत.. परफेक्ट हाईट, परफेक्ट बिल्ड.. त्यांचं जमत पण एकमेकांशी .. ते म्हणतात ना लक्ष्मी नारायणाचा जोडा. अगदी तसेच वाटतात.. ” प्रिती म्हणाली..

” पण विक्रमला अदिती आवडते का..?” साजिरीने विचारले..

” न आवडायला काय झालं.. अग बघ तिच्याकडे .. परफेक्ट आहे ती.. आणि बघ कसे गुंतले आहेत ते एकमेकांमध्ये.. अदिती आल्यापासून बघ कसा सर्वांना विसरून गेला आहे तो..” प्रिती म्हणाली.

” पण त्याने कधी मला अदिती बद्दल सांगितले नाही..” साजिरी म्हणाली.

” तो प्रत्येक गोष्ट तुला का सांगेल.. ? आय नो तुम्ही या दिवसात खूप छान फ्रेंड्स झाला आहात.. पण तरीही तो सर्वच कस सांगेल तुला..” प्रितीने साजिरीला विचारलं.

साजिरी गप्प झाली.. तिच्या डोळ्यात पाणी आलं.. पण तिने स्वतःला आवरलं.

अमृतसरला उतरल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था विरासत हवेली सारख्या सुंदर ठिकाणी होती. पंजाबचा इतिहास, कल्चर, हिरवीगार शेती , तसेच आधुनिकता यांचा संगम म्हणजे ही हवेली. संध्याकाळी तिथेच वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्या दिवशी कुठेच बाहेर फिरायला न जाता तिथेच रिलॅक्स व्हायचं प्लॅन होता. संध्याकाळ झाली कार्यक्रम सुरू झाले.. सर्व खूप एन्जॉय करत होते.. नाचत होते , गात होते, मनसोक्त जेवणाचा आनंद घेत होते.. पण साजिरीच या सर्वात कुठेच लक्ष नव्हत.. विक्रम तिच्या जवळ गेला की अदिती येऊन त्याला घेऊन जात होती. जेवणाच्या टेबलावर सुद्धा विक्रम साजिरी सोबत बसला तर पटकन अदिती तिथे आली आणि त्याला काहीतरी दाखवायला घेऊन गेली मग ते दुसऱ्या टेबलवर जेवायला बसले.. नाचताना सुद्धा विक्रम साजिरीकडे गेला तेव्हा अदिती मध्ये आली. डिनर झाल्यावर बाहेर वॉकसाठी भेट म्हणून विक्रमने तिला मेसेज टाकला.. पण ती विक्रमला भेटण्यापूर्वीच अदिती तिथे आली होती… मग काय अदिती , विक्रम आणि साजिरी असे तिघ वॉक करतं होते.. अदिती प्रचंड बडबड करत होती तर साजिरी अबोल झाली होती..

दुसऱ्या दिवशी गोल्डन टेंपल, जलियान वाला बाग, आणि मार्केट प्लेस असा फिरायचा प्लॅन होता.. साजिरी छान गुलाबी रंगाचा सलवार सूट घालून तयार झाली. मोठे जुमके, डोळ्याला काजळ, गुलाबी लिपस्टिक, पायत मोजडी… सुंदर दिसत होती..’ विक्रम बघतच बसेल आज मला… ‘अस स्वतःशीच म्हणाली.. रूमच्या बाहेर येऊन पाहते तर अदितीही छान तयार झाली होती.. खूप सुंदर दिसत होती.. विक्रम तिचं फोटो शूट करत होता… साजिरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळल…

‘ का होतं आहे हे अस…? आणि का अफेक्ट होते आहे…? ‘ ती स्वतःशीच पुटपुटत होती..

तो दिवस फिरण्यात गेला… त्या रात्रीसुद्धा हवेली मध्ये छान कार्यक्रम आयोजित केले होते.. रात्री सर्वांनी खूप मज्जा केली.. साजिरी मात्र आतून खूप दुःखी होती . आता तिला तिचं रडू आवरत नव्हत..ती रूम मध्ये निघून गेली.. थोड्या वेळाने अदिती आणि प्रिती सुद्धा रूम मध्ये आल्या.. तीन जणांचं शेअरिंग असल्यामुळे अदिती , प्रिती आणि साजिरी एकाच रूम मध्ये राहत होत्या.. त्या रूममध्ये आल्याचं कळताच साजिरी ने डोळे पुसले..

” शो मी युर रिंग…” रूम मध्ये आल्या आल्या प्रिती अदितीला अगदी उत्साहाने म्हणाली..

” हे बघ आताच दिली त्याने मला.. त्याच्या गुडघ्यावर बसून प्रपोज केलं त्याने मला..” अदिती अगदी लाजत म्हणाली..

” मस्तच.. अग याचं दिवसाचा घरातले पण वेट करत होते. आय एम सो हॅपी फॉर बोथ ऑफ यू..” प्रिती उत्साहात म्हणाली..

” मी पण खूप खुश आहे… कधी पासून मी वाट पाहत होते या क्षणाची..” अदिती म्हणाली.

त्यांचं बोलणं ऐकून साजिरी तिच्या जागेवरून उठली.. अदितीने साजिरीला सुद्धा तिची रिंग दाखवली.. रिंग पाहून तर साजिरीला काय बोलावे सुचतच नव्हते.

” ही बघ विक्रमने मला रिंग दिली..” अदिती म्हणाली.

” पण ही रिंग…” साजिरी बोलता बोलता मध्येच थांबली.

” काय ग.. काय झालं..?” प्रितीने विचारले.

” म..काही नाही.. अभिनंदन… ” साजिरी अदितीला म्हणाली.

एवढं बोलून ती रूम मधून निघाली. तिला आता तिच्या भावनांना आवरण कठीण जात होत. ती बाहेर येऊन एका झाडा खाली बसून रडू लागली. ‘ का.. का केलं असेल अस विक्रमने.. दोन महिन्यात तो एवढा बदलला.. एकदाही त्याने माझा विचार केला नाही.. मी किती प्रेम करते त्याच्यावर हे त्याला कळलेच नाही कधी.. का … त्याला दोष देऊन सुद्धा काय अर्थ आहे… माझं मलाच कळत नव्हतं नीट.. मी विक्रमला कायमच गमावलं आहे… अदितीचं त्याच्यासाठी योग्य आहे.. तिच त्याच्या प्रेमाला न्याय देऊ शकले. तो जेव्हा माझ्या सोबत होता तेव्हा मला कधी समजलच नाही आणि आता त्या अदिती सोबत पाहून मला कळलं… मी मूर्ख आहे . पण विकी समजूतदार आहे ना… का… ? झाल हे..? काय करू मी…’?तिच्या मनात हे द्वंद्व सुरू होत..

काही वेळाने विक्रम तिथे आला..
” तू इथे आहेस.. शोधून शोधून दमलो मी तुला..” विक्रम म्हणाला.

” का शोधत होतास.. आता काय काम आहे तुझ माझ्याकडे..?” साजिरीने त्याला विचारले..

” काम ?? काय बोलते आहेस तू.? विक्रमने विचारले.

” ओह. आय एम सो सॉरी… तुझ अभिनंदन करायचं तर राहून गेलं.. अभिनंदन…” साजिरी कुत्सितपणे म्हणाली.

” काय बोलत आहेस तू..” आधी काम ? मग अभिनंदन..? काय झालं आहे नक्की..आणि हे काय.. तू रडत बसली होती का इथे..? काय झालं आहे..?” विक्रमने विचारले.

” प्लिज आता हे अस वागू नकोस.. आणि मी रडत बसेन किंवा अजून काही करेन तुला त्याचं काय..” साजिरीने विचारले.

” साज हे बघ आता खूप झाल.. कोड्यात बोलू नकोस..” विक्रम म्हणाला.

” नाही बोलणार … मुळात मला काही बोलायचे नाही.. तू जा तुझ्या अदितीकडे.. फक्त एका प्रश्नांचं उत्तर देऊन जा.. दोन महिन्यात तू इतका बदलला..? तुझ माझ्यावर प्रेम होत ना..माझ्याशी लग्न करायचं होत ना तुला…आणि दोन महिन्यात प्रेम संपलं… ? इतक्या पटकन.. मी मूर्ख आहे.. मला नाही कळलं.. पण तू शहाणा आहेस ना.. तुला माहित आहे ना मला नाही जमत आता तुझ्या शिवाय.. माझी सकाळ पण तुझ्यापासून होते आणि दिवसाचा शेवट पण तुझ्यावर होतो..मला नाही कळलं हे प्रेम .. मुळात मी तशी रोमँटिक काईंड ऑफ गर्ल नव्हते कधीच.. पण तू समजुन घ्यायला हवं होत ना मला.. माझ्या प्रेमाला.. पण आता खूप उशीर झाला आहे.. मला माहित आहे मी तुला गमावलं आहे.. तुला हे सर्व प्रश्न विचारायचा ही हक्क नाही आहे मला.. आय एम सॉरी..” साजिरी बोलतच चालली होती..

” थांब अग थांब.. काय बोलते आहेस तू..अदिती आणि मी …? शक्य आहे का ते..? आणि माझ्या प्रेमाबद्दल तर बोलूच नकोस तू काही.. खरतर तुझ्या घरी येऊन मी मागणी घालू शकलो असतो पण मला आपल्यात प्रेम हवं होत.. आणि त्यासाठी किती ही वेळ थांबायची माझी तयारी होती..” विक्रम म्हणाला.

” पण मग तू अदितीला प्रपोज का केलं..? तेही माझ्यासाठी घेतलेली रिंग देऊन..” साजिरीने विचारले..

” काहीही काय… तू एक मिनिट थांब इथेच.. मी आलो..” असे म्हणत विक्रम धावत त्याच्या रूमच्या दिशेने गेला.. आणि धावत परत आला..

” ही बघ .. तुझ्यासाठी घेतलेली रिंग..” विक्रम म्हणाला.

” मग अदिती खोटं बोलली का..? हे काय सुरू आहे..?” साजिरी गोंधळून म्हणाली..

इतक्यात हे सर्व लपून ऐकत असलेल्या प्रिती आणि अदिती मोठं मोठ्याने हसत , एकमेकींना टाळ्या देत विक्रम आणि साजिरी समोर येऊन उभ्या राहिल्या..

” आय एम एक्स्ट्रेमली सॉरी स्वीटहार्ट.. मला तुला असा त्रास द्यायचा नव्हता..” हसत हसत अदिती साजिरी ला म्हणाली.

” हा काय प्रकार आहे.. मला कळेल का..? ” विक्रम म्हणाला.

” मी सांगते.. ते काय आहे . तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहात हे आम्हा सगळ्यांना गृप मध्ये कधीच कळलं होत..पण तुम्हालाच हे कळत नव्हत.. नशिबाने काही उशिराने का होईना तूला ते कळलं आणि साजिरीला तू विचारलं. पण तिने होकार पण दिला नाही आणि नकार ही.. तिने घरी मागणी घाल अस सुचवल्यावर तू तुझ्या मतावर ठाम होतास.. तुला तिचा होकार मिळवून मगच तिचा हात मागायला तिच्या घरी जायचं होत. नकार तर ती असाही देणार नव्हती . कारण तीही तुझ्या प्रेमात होतीच ना.. पण तिला हे स्वतः हुन समजेल याची तर मला काही अपेक्षाच नव्हती. आणि तू तुझ्या मतावर ठाम.. मग काय.. मी विचारातच होते आणि एक दिवस अदितीचा कॉल आला.. ती अमेरिकेहून परत आली होती काही महिन्यांसाठी.. आणि तुला सरप्राइज देण्यासाठी तुला न सांगता आपल्याला भेटायला येणार होती.. मला तिला जे सर्व झाल आहे ते सांगावस वाटलं.. आणि मी सांगितलं.. आपण करू काही तरी ती म्हणाली.. दोन दिवसांनी पूर्ण प्लॅन करून तिने मला कॉल केला.. जब घी सिधी उंगलीसे निकलता नही तब उंगली टेढी करणी पडती है.. आणि आम्ही प्लॅन नुसार आमचं काम सुरू केलं.. मुद्दामून तुझ्या आणि साजिरीच्या मध्ये अदिती येत होती . अदितीने ज्या प्रकारे एन्ट्री केली आणि तेव्हा साजिरीची रेअँक्शन … काय सांगू तुला.. कमाल होती.. आम्हाला तेव्हाच कळलं आमचा प्लॅन सक्सेसफुल होणार.. खरतर आम्ही अजून काही दिवस हे पुढे चालवणार होतो.. पण साजिरीची अवस्था पाहून आम्हाला अजून तिला छळावस नाही वाटलं.. म्हणूनच तू अदितीला आज प्रपोज केल्याचं नाटक केलं आम्ही साजिरी समोर केलं.. नाटक तिच्या वर्मी लागल. ती रूम मधून निघून बाहेर पडली. तेव्हाच आम्ही ठरवलं हीच ती वेळ, हाच तो क्षण.. ती बाहेर पडल्यावर आम्ही पंधरा मिनिटांनंतर तुला कॉल केला.. तिला शोधण्यासाठी… आम्हाला माहीत होत.. लोहा गरम है.. तुम्ही दोघं भेटलात की नक्कीच काहीतरी घडेल.. आणि तसच झाल…”

” पण मला हे कळलं नाही विक्रम तू कधीच अदिती बद्दल कस काही सांगितलं नाही मला..?” साजिरीने विचारले.

” अगं सांगितलं होतं.. माझी लहान पणीची मैत्रीण.. टॉम बॉय आहे.. अदिती.. आठवलं का..? ” विक्रम म्हणाला.

” हो.. हो.. पण टॉम बॉय म्हणाला होतास ना.. ही तशी नाही आहे..” साजिरी म्हणाली..

” हो मी बदलले.. माझ्या प्रेमामुळे.. ” अदिती लाजत म्हणाली.

” म्हणजे….? आणि ती सेम रिंग ?” साजिरीने विचारले..

” ती खरंच माझी ऐंगेजमेंट रिंग आहे… लग्न आहे माझं ह्या येत्या सहा महिन्यांत. योगा योगाने माझी रिंग ही विक्रमने तुला घेतलेल्या रिंग सारखीच होती.. सो आम्ही त्याचा फायदा करून घेतला. ” अदिती म्हणाली.

” म्हणजे हे पण तू मला नाही सांगितलं..? ” विक्रमने अदितीला विचारलं..

” अरे माफ कर रे..पण आता सांगते आहे ना..खरतर हेच सांगायला आले होते. तेव्हा ती वेळ नव्हती.. मी मिशन वर होते..पण आधी म्हटल तुझी लव्ह स्टोरी पूर्ण करूया.. बघ माझ्यामुळे तुला तुझी जानेमान भेटली ना..” अदिती म्हणाली.

विक्रमने अदितीकडे पाहिले.. साजिरी लाजून चूर झाली..

” खरच थँक्यू.. तुम्ही नसता तर माहीत नाही अजून किती वेळ लागला असता..” विक्रम साजिरीकडे बघत म्हणाला.

” अदितीने, प्रिती खरंच थँक्यू.. म्हणजे मला हे माझ्याच मनातलं कळलं नाही..” साजिरी म्हणाली.

ती विक्रम कडे वळली.. आणि गुढघ्यावर बसून स्वतः चे कान पकडुन विक्रमला म्हणाली ,” आय एम सॉरी.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय.. हे कळायला वेळ लागला मला.. पण तू माझा स्विकर करशील का..?” साजिरी म्हणाली.

” अग वेडे.. मी नेहमीच तुझा होतो आणि आहे.. मी कितीही वर्ष तुझ्यासाठी थांबायला तयार होतो.. आय होप तुला माझा मुद्दा कळला असेल.. आणि स्वीकार वैगरे काय.. आय विल लव्ह यू टील माय लास्ट ब्रेथ…” साजिरीला वर उचलत विक्रम म्हणाला.. दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले..

त्याने तिला रिंग घातली.. आणि घट्ट मिठी मारली..

त्यांना तसे पाहून प्रिती आणि अदितीही इमोशनल झाल्या.. प्रितीने पटकन मोबाईल वर त्या क्षणाचे फोटो टिपले.
थोडा वेळ थांबून अदिती म्हणाली.” आम्ही पण आहोत इथे..”

विक्रम आणि साजिरी भानावर आले.. त्यांनी एकमेकांना मिठीतुन मोकळे केले.

” चला आता.. हिमालया कॉलिंग.. तिथे जाऊन आता म्हणा.. ये हसि वादिया.. ये खुला आसमा…” प्रिती हसत हसत पळत म्हणाली.

प्रिती थांब तुला बघतो मी म्हणून विक्रम तिच्या पाठी पळाला.

तर अशा प्रकारे साजिरीने विक्रमला प्रेमाची कबुली दिली. पुढे पूर्ण ट्रीप त्यांनी खूप एन्जॉय केली.. परत मुंबईला आल्यावर विक्रमने त्याचा आई बाबांना साजिरीशी त्यांची होणारी सून म्हणून ओळख करून दिली. विक्रमचे आई बाबा असेही साजरीला ओळखत होतेच.. त्यांना साजिरी सून म्हणून पसंत पडली. साजिरीला जस हवं होतो तसच रीतसर विक्रमने तिला तिच्या घरी येऊन मागणी घातली. साजिरी क्या घरच्यांनाही विक्रम आवडला. सहा महिन्यांनी अदिती च लग्न झालं. त्या पाठोपाठ विक्रम आणि साजिरी ही विवाह बंधनात अडकले.. आता अदिती फक्त विक्रम ची नाही तर साजिरी ची पण छान मैत्रीण झाली होती.

शेवटी कवी मंगेश पाडगावकर म्हणतात तसच,” प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं ! ” तरीही प्रत्येकाची स्टोरी मात्र थोडी वेगळी असते. तर अशी ही विक्रम आणि साजिरीच्या अरेंज कम लव्ह मॅरेजची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

             समाप्त

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

One Reply to “माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग २”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *