Home » Marathi » Stories » परदेशातला भोंडला..

परदेशातला भोंडला..

. सुलभा काकू अमेरिकेत येऊन पाच महिने झाले होते. रमेश काका गेल्यानंतर त्या त्यांच्या मुलाकडे, पियूषकडे अमेरिकेत राहायला आल्या होत्या. तसं काका जाऊन आता दीड वर्ष होतं आलं होतं. काकांचं निधन झाल्यावर दोन महिन्यातच पियूषने काकूंनी त्याच्या सोबत अमेरिकेत येऊन राहायला सांगितले होते. पण काकू तयार नव्हत्या. पियूष सुध्दा हट्टी होता. तो काकूंनी घेऊन गेल्याशिवाय ऐकणार नव्हता. काकांचं वर्ष श्राद्ध करून मी येईन हे वचन त्यांनी पियूषला दिले होते, म्हणून नाईलाजाने का होईना त्यांना अमेरिकेला जावं लागलं.

पियूष सुलभा काकू आणि रमेश काकांचा एकुलता एक लेक. सॉफ्टवेअर इंजिनिअर. गेल्या पाच वर्षांपासून अमेरिकेतच होता. त्याची बायको राजश्री. ती सुध्दा सॉफ्टवेअर इंजिनिअर. दोघं प्रेमात पडेल आणि त्यांचं लग्न झालं. सासू सुनेच एकमेकांशी छान पटायचं. दोघीही एकमेकींना उत्तमरित्या समजून घ्यायच्या. त्यामुळे रमेश काका गेल्यानंतर सुलभा काकूंनी एकटं न राहता त्यांच्या सोबत राहावं हा राजश्रीचा विचार होता. काका असतानाही पियूष आणि राजश्रीने त्या दोघांना हा पर्याय सुचवला होता. पण दोघंही आपला देश सोडायला तयार नव्हते. आणि मुळात त्या दोघांनाही इथे कसलीच कमी सुध्दा नव्हती. एकुलता एक लेक आता चांगला सेटल झाला होता. काका काकूंच एकमेकांवर खुप प्रेम होतं. अगदी नवीन जोडप्याला ही लाजवेल इतके ते एकमेकांमध्ये गुंतलेले असायचे. त्याचं सारं विश्र्वच एकमेकांमध्ये होत. अगदी ‘made for each other’ होते दोघंही.त्यांच्या ओळखितले बरेच नवरा बायको त्यांचं उदाहरण द्यायचे एकमेकांना.

सर्व अगदी सुरळीत सुरू होतं. आणि अचानक काकांना हृदयविकाराचा झटका आला. पियूष आणि राजश्री देखील तातडीने निघून आले होते. पण त्यातूनही ते बरे होऊन दहा दिवसांनी घरी आले होते.

एके दिवशी संध्याकाळी काका आणि काकू घराच्या बाल्कनीत गप्पा मारत बसले होते. वाऱ्याची झुळूक येतं होती आणि काकूंच्या थोड्याशा चंदेरी झालेल्या बटा त्यांच्या गालावर रेंगाळत होत्या.

ते पाहून काका त्यांना म्हणाले,” सुलू मी नसलो तरी तू नेहमी अशीच रहा.. “

त्याच्या या वाक्यावर काकू भडकल्या..,” मी नसलो म्हणजे काय..? तुम्ही नेहमी इथेच असणार आहात.. माझ्या जवळ.. “

त्यांना मध्येच थांबवत काका म्हणाले,” अगं जीवन मृत्यू कोणाच्या हातात आहे का… ? पण मी काय म्हणतो… मला जरी काही झाले ना तरी तू नेहमी अशीच रहा, हसत,.. मी नसलो तरी तुझ्या कपाळावर ही चंद्रकोर नेहमी अशीच लावत रहा.. मला खूप आवडते ती. मला माहित आहे तुला नटण्याची किती आवड आहे ते.. मी गेलो तरी तू असंच तयार व्हावस … असं मला वाटतं. मी जिथे कुठे असेन तिथून माझ्या सुलू ला बघेन.. स्वर्गात जाऊन त्या इंद्राला विचारेन बघ आहे का एवढी सुंदर अप्सरा तुझ्याकडे तरी…”

सुलभा काकूंनी काकांना थांबवलं.. “पुरे झाले ओ आता.. तुम्ही आता हे असेच बोलत बसलात ना तर मी नाही तुमच्याशी बोलणार.. तुम्हाला मी कुठे जाऊ देणार नाही..तुम्ही नेहमी इथेच असणार आहात माझ्या जवळ.. कुठे कुठे जाऊ देणार नाही मी.. “

हे बोलता बोलता काकू रडू लागल्या. काकांनी त्यांची समजूत काढली..,”. बरं बाई मी कुठेच जाणार नाही. नेहमी असेन तुझ्या जवळ” असे म्हणत काकांनी त्यांना जवळ घेतले…

ती रात्र काळरात्र ठरली.. दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे काकू काकांना उठवायला गेल्या.. पण काका रात्रीचं हे जग सोडून गेले होते. काकांच्या अशा अचानक जाण्याने काकू पूर्णपणे बिथरून गेल्या होत्या. त्याचं आयुष्य त्या क्षणातच थांबून गेलं होत.. थोड्या दिवसात त्यांनी स्वतःला सावरलं पण त्या आतून तुटून गेल्या होत्या. त्यांचा एकटे पण दूर व्हाव या साठीच पियूष आणि राजश्री त्यांना त्यांच्या सोबत अमेरिकेला घेऊन आले होते. राजश्री सतत सुलभा काकूंच्या आवडी निवडी जपण्याचा प्रयत्न करत असे. काका गेले आणि सुलभा काकूंनी तयार होणे सोडून दिले होते. त्यांच्या आयुष्यातून रंग जणू उडून गेले होते. काकांनी एवढं सांगून देखील त्यांनी समाज काय म्हणेल म्हणून चंद्रकोर लावणं ही बंद केले होते. आपल्या सासूची ही मनस्थिती राजश्रीला पाहावत नव्हती. आपण काय करू शकतो या विचारत असतानाच तिला एक कल्पना सुचली.. पाच दिवसांनी नवरात्र सुरू होणार होती. भोंडला.. तिच्या सासूच्या म्हणजेच सुलभा काकूंच्या अगदी जवळचा.. आपण आता काहीतरी केलं पाहिजे.. तिने तिच्या काही भारतीय मैत्रीणीना फोन लावला.. ती अमेरिकेत असलेल्या एका भारतीय संस्कृती संघाची मेंबर सुध्दा होती.. ती त्यांच्याशी बोलली.. तिच्या मनात असलेली कल्पना तिने त्यांना देखील सांगितली.. मग ठरलं.. भोंडला तसा नऊ दिवस खेळला जातो.. पण आपण निदान एक दिवस तरी साजरा करू हा तिचा विचार.. नवरात्रीच्या सातव्या दिवशीचा कार्यक्रम ठरला.

आदल्या रात्री राजश्रीने सुलभा काकूंनी छानशी गुलाबी रंगाची साडी भेट दिली आणि म्हणाली, “उद्या छान तयार व्हा. आपल्याला कुठे तरी जायचं आहे.”

त्यावर काकू म्हणाल्या, “अगं हा रंग माझ्या काय कामाचा. ?”

राजश्री म्हणाली, “आई अहो असं काय करताय. !!बाबांना दिलेलं वचन तुम्ही विसरलात का? बाबा असते तर त्यांना तुम्ही अशा अवस्थेत आवडला असता का? आई बाबा आहेत, ते तुमच्या जवळ आहेत.. तुम्ही असं दुखी राहून त्यांना खुप त्रास देत आहात.. “

त्यावर काकू म्हणाल्या, “अगं मी विधवा आहे आता.. मी जर अशी नटले तर समाज काय म्हणेल.?”

राजश्री म्हणाली , “आई कुठला समाज? आई या समाजाचे नियम आपण बनवले आहेत.. बाबा गेल्या नंतर तुमचं दुःख वाटून घ्यायला देखील ही लोकं फक्त बारा दिवस आले. पुढे तुमचं तुम्हीचं सोसत आहात ना.. मग का विचार करताय.. ?हे बघा मला खूप आनंद होईल जर तुम्ही ही साडी नेसून छान तयार झालात तर. आणि माझ्याहून जास्त बाबांना होईल. आता तुम्हीच ठरवा तुमच्या साठी काय महत्त्वाचे आहे ते .”

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे राजश्री सुलभा काकूंची वाट पाहत होती.. तिला खरं तर थोड टेन्शनच आलं होतं. त्या खरंच येतील की नाही याची तिला खात्री नव्हती.. पण काकू आल्या.. गुलाबी रंगाची साडी, मोत्याचे दागिने, आणि कपाळावर चंद्रकोर.. राजश्री खुप खुश झाली. दोघी निघाल्या.. जिथे कार्यक्रम ठेवला होता तिथे पोहोचल्या.. सर्व बायका छान तयार होऊन आल्या होत्या. लहान मुली, म्हाताऱ्या ते अगदी तरुण मुली देखील आल्या होत्या. हॉल मध्ये मध्य भागी हत्तीची प्रतिकृती ठेवली होती. ती छान सजवलेली होती.हे सर्व पाहून काकूंना आनंद तर झाला पण त्या राजश्रीला म्हणाल्या, “अगं माझं काय काम इथे.. ?”

राजश्री त्यावर म्हणाली ,”आई स्वतः साठी आज जगून बघा.. बाबा असते तर आज तुम्ही काय केलं असतं त्याचा वचार करा. ‘

सुलभा काकू थोड्या हळव्या झाल्या होत्या. इतक्यात ढोल वाजू लागले.. जमलेल्या वयस्कर बायकांनी गाणे सुरू केले..’ऐलमा पैलमा गणेश देवा.. माझा खेळ मांडून दे…’या गाण्यापासून सुरुवात झाली.. सर्वांनी फेर धरला.. काकुंचे ही पाय नकळत पणे त्या दिशेने वळले..सुलभा काकू सुध्दा आज सर्व विसरून फेर धरू लागल्या..गाऊ लागल्या ..’यादवराया राणी घरास येईना कैसी..सासुरवाशीण सून रुसून बसली कैसी.. ‘म्हणत सुनेचं हात धरून नाचू लागल्या..’श्रीकांत कमकांता अस कस झालं.. ‘हे गाणं म्हणता म्हणता काकूंचा कंठ दाटून आला.. राजश्री ने त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला..कार्यक्रम संपला..सर्व जणी आपापल्या घरी निघाल्या.. निघताना सर्वांनी सुलभा काकूंचे आभार मानले आणि राजश्रीचे कौतुक देखिल केले. तिच्या मुळे आज इथे परदेशातही बायकांनी भोंडला साजरा केला होता. नवीन पिढीतील मुलींना आपल्या संस्कृतीचा एक छोटासा भाग बघता आला होता. सर्व जणी आज खुप दिवसांनी अशा नाचल्या, बागडल्या होत्या. सुलभा काकूंना सुध्दा सुनेचं कौतुक वाटतं होतं.घरी गेल्यावर सर्व काम आवरून राजश्री काकूंच्या खोलीत गेली. काकू काकांच्या फोटोकडे बघत बसल्या होत्या..

राजश्रीने त्यांना विचारले, “आई कसं वाटलं आज.”

त्या म्हणाल्या.. ,”तू म्हणालीस ते अगदी बरोबर होतं..ते माझ्या सोबतच आहेत.. त्यांना नाही आवडणार मी असं उदास राहिलेलं.. त्यांना माझ्या कपाळावरची.. ” असे म्हणत त्या थांबल्या.. त्यांना अगदी भरून आलं होतं.. त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हते.

.राजश्री त्यांच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली ,”आई आज मोकळ होऊन घ्या.. जेवढ हवं तेवढं रडूंन घ्या..”आज सुलभा काकूंच्या भावनांना मोकळी वाट मिळाली होती.. नवऱ्यानंतर आपल्याला समजून घ्यायला जीवाभावाची मैत्रीण म्हणजेच आपली सून आहे याचं त्यांना समाधान वाटत होतं. तसेच तिच्या प्रगत विचारांचं कौतुक वाटतं होतं. इथे परदेशात भोंडल्याचा घाट घालण्या मागचा आपला हेतू साध्य झाला याचे राजश्रीला समाधान मिळाले.

समाप्त

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *