Home » Marathi » Stories » स्पर्धा

स्पर्धा

स्पर्धानलिनी सकाळी वैतागतच उठली. तिची आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती.पण तरी सुद्धा ती उठून आवरू लागली. मयुरेशने हे पाहिले. तो तिला म्हणाला देखील खूपच कंटाळा आला असेल तर जाऊ नकोस. एक दिवस आराम कर. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. मयुरेशने ही मग तिला जास्त फोर्स केला नाही. त्यालाही आज उठायला उशीरच झाला होता. नाश्ता ऑफिस मधेच करेन सांगून तो सुध्दा निघून गेला.

मयुरेश आज ऑफिस मध्ये नलिनीचा विचार करीत होता. हल्ली हे बरचदा व्हायचं. नलिनी नेहमी हरवल्यासारखी असायची. सतत हसत खेळत बागडणारी नलिनी हल्ली कुठल्यातरी विचारातच असायची. नक्की काय प्रोब्लेम असेल..? मयुरेश विचार करत होता.घरी तर असे ही ते दोघच होते. त्याचे आई बाबा पुण्याला असायचे. त्यामुळे घरी सासू सासरे त्रास देतात अशा गोष्टी तर नव्हत्या. घरातील वर वरच्या कामासाठी बाई सुध्दा होती त्यामुळे घराच्या कामामुळे ताण पडावा असही नव्हत.ऑफिस मध्ये तर प्रोब्लेम काही नसेल ना..? मयुरेश स्वतः शीच बोलत होता. आज नलिनीशी बोललं पाहिजे असा त्याने विचार केला..

त्याने नलिनीला फोन केला आणि म्हणाला,..” आज डिनर साठी बाहेर जाऊया..”

पण नलिनी ऑफिसच काम आहे म्हणून टाळू लागली.. मयुरेश म्हणाला,” मला काही कारण नको आहे.. तू छान तयार हो. खुप दिवस झाले आपण कुठे निवांत बाहेर गेलो नाही आहोत. आज जाऊ.. उद्या असही शनिवार आहे.. सुट्टी आहे आपल्याला.. तर उगीच कारणं देऊ नकोस. मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे”…

नलिनीचा नाईलाज होता. ठरल्याप्रमाणे दोघं त्यांच्या आवडत्या ठिकाणी जेवायला गेले. मयुरेशने नलिनीच्या आवडीचे जेवण मागवले.. नलिनी अजुन ही कुठल्यातरी विचारात होती. ती फक्त शरीराने मयुरेश सोबत होती.

मयुरेश नलिनीला म्हणाला,” तू छान तयार झाली आहेस.. पण तरी काही तरी हरवलं आहे. ”

नलिनीने विचारलं, काय.. ?

मयुरेश म्हणाला,” तुझं हसू..”

नलिनी म्हणाली,” तुझं आपलं काहीतरीच.”

मयुरेश म्हणाला ,”अगं खरंच… कित्येक दिवस पाहतोय मी. तू कुठे तरी हरवलेली असतेस.. काही टेन्शन आहे का.. काही बिनसलं आहे का?..

” नलिनी म्हणाली,” तुला कसं सांगू ते कळतं नाही आहे. “

मयुरेश म्हणाला ..”काय झालं आहे ते आता पटापट बोल.. दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली आहेस का?.. ”

नलिनी चिडली.. ,”तू असा कसा विचार करू शकतोस.. ? बघ म्हणून मला काही बोलायचे नसते.. ”

मयुरेश म्हणाला,” अगं सॉरी.. थोडी थट्टा पण करू शकत नाही का आता मी माझ्या बायकोची.. ?..बोल ना तू काय झाले आहे..??..”

नलिनी म्हणाली,” तू हसशील कदाचित माझ्यावर.. “

मयुरेश म्हणाला,” बोल ना आता..”

नलिनी ने सांगायला सुरुवात केली.. ,”अरे ऑफिसमध्ये आर्या नावाची माझी टीममेट आहे. सिनियर आहे ती मला.. असं पण ऑफिस जॉईन करून मला एक वर्ष सुध्दा झालं नाही हे तुला पण माहित आहे ना..”

मयुरेश म्हणाला,” मग काय झालं तीच.. “

नलिनी म्हणाली ,”तीचं काही झालं नाही रे.. पण ती ना सतत माझ्याशी स्पर्धा करत असते.. प्रत्येक गोष्टीत.. या एका वर्षाच्या आत मी तिच्यापेक्षा सुध्दा जास्त गोष्टी अचिव केल्या आहेत त्यामुळे ती सतत मला येता जाता टोमणे देत असते. हल्ली तर बरेचदा माझ्या प्रेझेंटेशनच्या आयडिया चोरते. प्रत्येक गोष्टीत मला कॉपी करते. टीममेट आहे त्यात सिनियर आहे तर बोलावं लागतच..तेव्हा सारखी ती किती भारी आहे, बेस्ट आहे ते दाखवायचा प्रयत्न करत असते. सर्वांसमोर माझा अपमान करते, आणि मग मस्करी करत होते असं म्हणते.. त्यात नवीन बॉस आली आहे. आता तर बॉसच्या पण मागे पुढे करते.. आता त्या दिवशीचा प्रसंग मी आणि माझी बॉस.. आम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत होतो.. ही सुध्दा तिथे होती.. ही अचानक बॉसला म्हणाली मॅडम आज खुप सुंदर दिसत आहात तुम्ही.. बॉस सुध्दा शेवटी स्त्रीचं. तिला हिने केलेली प्रशंसा आवडली.. मग थोडा वेळ त्यांचं काही तरी बोलणं सुरू झालं.. मग बॉस माझ्याकडे वळली..दुसऱ्या दिवशी ती दोन तास उशिरा आली.. एरवी दहा मिनिटे जरी उशीर झाला तरी ओरडणारी बॉस तिला काहीच बोलली नाही.. हे अस सर्व ती सतत करत असते.”

मयुरेशने नलिनीला विचारले,” मग तुझं कुठे अडतय..?”

नलिनी म्हणाली,” अरे ह्या सर्वात माझ्या कामाची काही वॅल्यूच राहणार नाही, तिच्या चमचेगिरी मुळे मी जे काम करते त्याकडे दुर्लक्ष होईल. असे मला वाटते. आणि ती जेव्हा जेव्हा माझा अपमान करते ना तेव्हा तेव्हा तिला उलट उत्तर द्यावं असं मनात येत.. पण ती सिनियर आहे आणि त्यात चमचेगिरी करण्यात पटाईत आहे. बॉसकडे जाऊन माझी कंप्लेंट करेल. मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते तिच्या कडे ,पण रोज रोज तेच होतं ना मग नाही रे इच्छा होत काम करायची.. असं वाटत दुसरा जॉब शोधावा.”

मयुरेश त्यावर नलिनीला म्हणाला, “हा प्रोब्लेम आहे तर.. मग तू पण सुरू कर ना चमचेगिरी..”

नलिनी चिडून म्हणाली,” म्हणूनच मी तुला सांगत नव्हते. मला माहित होतं तू अशीच माझी थट्टा करणार. तुलाही माहित आहे या गोष्टींचा मला किती तिटकारा येतो. माझ्याने हे असं सर्व नाही होणार.”

मयुरेश म्हणाला.,. “अगं अशी चिडू नकोस. मला माहित आहे तू असे करणार नाहीस. कारण ते तुला पटत नाही. मग तू त्या आर्याच्या वागण्याचा एवढा विचार करूच नकोस. मला माहित आहे रोज रोज त्याचं गोष्टी होतात तेव्हा खुप त्रास होतो, कंटाळा येतो.. पण अगं सर्वच ठिकाणी तुला कमी अधिक प्रमाणात अशीच माणसे भेटणार आहेत. तू या आधी ज्या कंपनी मध्ये काम करत होतीस ती एक लहान कंपनी होती. माणसे कमी होती. तुम्ही एकमेकांना खुप वर्षां पासून ओळखत होता. तिथली परिस्थिती या पेक्षा वेगळी होती. ही कंपनी मोठी आहे.. इथे हे असं होणं स्वाभाविक आहे. आणि तुला काय वाटलं आम्हां पुरुषांना हे सहन करावं लागतं नाही ? अग पुरुषांमध्ये सुध्दा असे प्रकार होतात. त्यांच्यात पण चढा ओढ, जळकुटेपणा असतोच.. तुम्ही बायकाच हे असं करता असे मुळीच नाही. मी सुध्दा यातून गेलो आहे.. कित्येक जण जातात.. मुळात ना त्या आर्याला महत्त्व देण्या इतकी ती कोणी नाही आहे.. सिनियर असली म्हणून काय झाले… तुला जे पटत नाही ते तोंडावर बोल.. स्पष्टपणे सांग तिला.. तिला पण कळू देत तू तिची वायफळ बडबड सहन करणार नाही आहेस ते. आणि दुसरं म्हणजे तू स्वतः शी आणि स्वतः च्या कामशी प्रामाणिक रहा.. हे बघ तिला स्पर्धा करायची आहे तर करू देत. तू स्वतः शी स्पर्धा कर. प्रगती करायची असेल ना तर माणसाने स्वतः शी स्पर्धा करावी.. जे आज केलं त्याहून उत्तम मी उद्या करून दाखवेन ही तयारी आपण करावी. तू हे एवढं केलंस ना तर तुला त्या आर्याचे चाळे बाष्कळ वाटतील. तुलाच हसू येईल तिच्यावर. तुझ्या काही आयडिया ती चोरू शकते पण जर तुझ्यात खरंच प्रतिभा, कौशल्य आणि मेहनत करायची तयारी असेल ना तर कोणीच तुझी बरोबरी करू शकत नाही.. ही नोकरी करायची की नाही हा तुझा निर्णय आहे.. पण कोणा दुसऱ्या माणसामुळे तू दुसरा पर्याय शोधावा हे मला पटत नाही…”

या वर नलिनी मयुरेशला म्हणाली,” खरंच रे किती योग्य बोललास तू.. पटतंय मला तुझ बोलण.”

“हो ना.. बघ किती छान बोलतो मी.. मला तर हल्ली असं वाटत की मी मोटिवेशनल स्पीकर बनावे… “त्याच्या या वाक्यावर दोघेही हसू लागले.. इतक्यात त्यांचे जेवण सुध्दा आले.. दोघं ही हसत हसत गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होते.

नलिनीचा प्रोब्लेम तसा छोटासाच होता.. मयुरेश ने त्यावर तिला जे समजावले ते अगदी योग्य होते.. माणसाची स्वतः शी स्पर्धा करावी.. किती छान आणि मार्मिक बोलून गेला तो.. खरंच आपल्याला आपल्या आसपास अशी बरीच लोकं भेटली असतील, भेटतात आणि भेटत राहणार ज्याच्यामुळे खुप वैताग येतो, कधी राग येतो, पण खरंच ही लोकं महत्त्वाची नसतात. समाप्त

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *