क्रमशः
दुसरा दिवस उजाडला. अनघा काकू आज लवकरच उठल्या होत्या. सर्वांचा नाश्ता आणि रोहित आणि मीराच्या डब्ब्यांची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवली होती. मीरा तिच्या नेहमीच्या वेळेत स्वयंपाक घरात आली. पाहते तर सासू आधीच हजर. आता पुन्हा काहीतरी ऐकव लागणार असे तिला वाटले. दिवसाची सुरुवातच खराब होणार असे ती मनोमन पुटपुटली. पण झाले उलट. काकू अगदी स्मित हास्य करत तिला गुड मॉर्निंग म्हणाल्या. तिला हे अपेक्षितच नव्हते. ती थोडी गोंधळली. काकू पुन्हा हसून गुड मॉर्निंग म्हणाल्या.. मीराला विश्र्वासच होत नव्हता. ती सुध्दा त्यांना गुड मॉर्निंग म्हणाली. पुढे काकू तिला म्हणाल्या तू तुझं आवरून घे. आज मी नाश्ता पण बनवला आहे आणि तुमच्या डब्ब्याची तयारी सुध्दा झाली आहे. गोंधळलेल्या मीराला कळेचना की काय बोलावं. हे सत्य आहे की स्वप्न तेच तिला उमजत नव्हते. ती’ हो आई ‘,म्हणून तिच्या खोलीत गेली. मीराचा तो गोंधळ पाहून अनघा काकूंन पण हसू आले. सर्वांचा नाश्ता झाला. सर्व आपापल्या कामांना गेले. मीरा हल्ली घरच्या कटकटिमुळे लवकर घरी यायची नाही. ती परस्पर माहेरी निघून जायची. आजही तिने तसेच केले. ती तिच्या वेळेत घरी आली. रोज चिडणाऱ्या काकू आज शांत होत्या. त्या तिला काही बोलल्या नाहीत. काही दिवस असेच गेले. मीरा कशीही वागली तरी काकू शांतच असायच्या. ते पाहून हळू हळू मीरा मध्ये पण बदल घडू लागले. तिनेही काकुंसोबत सकाळी लवकर उठणे सुरू केले. त्यांना मदत करू लागली. काकू सुध्दा मीरा मधल्या चांगल्या गोष्टी हेरू लागल्या.त्यांच्या लक्षात येत होते की मीराला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. सणवार आवडतात. ती जितकी मॉडर्न आहे तितकीच जुन्या रिती भाती सुध्दा पाळते, त्यांचे महत्त्व समजून घेते. नवीन गोष्टी शिकण्याची तिची तयारी असते. मीराला ही आता सासू सोबत छान वाटायला लागलं होतं. आपली सासू खडूस नाही आहे हे तिच्या लक्षात आले. त्यांना वाचनाची आवड आहे, त्या रुढी परंपरा मध्ये जरी अडकलेल्या असल्या तरी त्यांना आधुनिकतेची जाण आहे. वरून कितीही कठोर वाटत असल्या तरी आतून खुप मृदू आहेत.आणि सगळ्यात महत्त्वाचं रोहित त्यांच्यासाठी त्यांचं सर्वस्व आहे. मीरा ने जाणले होते की जशी ती नवीन घरात येणार, नवीन माणसात येणार म्हणून बावरली होती तशीच काहीशी अवस्था तिच्या सासू ची म्हणजेच अनघा काकूंनी झाली होती. मीराच आता माहेरी जाणं कमी झालं होतं. काकू जश्या मीराच्या आवडी निवडीचा विचार करायला लागल्या होत्या तसाच विचार आता मीरा सुध्दा करू लागली होती. पूर्वी कुरबुरीचे आवाज येणाऱ्या स्वयंपाक घरातून आता विनोदाचे आणि हास्याचे ध्वनी येऊ लागले होते. कधी काकू मीराला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत, कधी त्या नवीन लग्न करून आल्या होत्या तेव्हाच्या गोष्टी सांगत तरी कधी रोहितचे किस्से सांगत. मीरा सुध्दा आता त्यांच्याशी बरंच काही शेअर करू लागली होती.घरातलं वातावरण पुन्हा आनंदी झालं होतं. मीरा आणि आईला एकत्र खुश बघून रोहित पण खुप समाधानी होता. तो आता पुन्हा पूर्वी सारखा वागू लागला होता.रोहितचे बाबा ही आता खुश होते.अनघा काकूंनी त्यांच्या मैत्रीणचे एक एक वाक्य आता खरे झाल्यासारखे वाटत होते.
सासू सुनेचे नात हे खाष्ट पणाचे असलेच पाहिजे असं नसतं. प्रत्येक नात्याला फुलायला थोडा वेळ द्यावा लागतो. प्रत्येक माणसाची एक स्वतः ची अशी पर्सनल स्पेस असते, त्याचा आदर घरातल्या इतर सदस्यनी केला पाहिजे. हुकुमशाही करून आदर निर्माण करता येत नाही. आणि सर्वात मह्त्वाचं म्हणजे नातं निर्माण करायला आणि जपायला प्रेम, आदर, स्वीकार या गोष्टींची गरज असते. हे जर अस असेल ना तर सासू सुनेचं थोड कठीण वाटणार नात हि सहज सोप्प होऊन जातं.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


