कोरोना
कोरोना.. सध्या बघावं तिथे, ऐकावं तिथे फक्त तुझाच बोभाटा आहे. तशी तुझी आणि माझीओळख नाही आहे. आपण आतापर्यंत कधीच संपर्कात आलो नाही. खरतर आपली ओळख नसेलीच बरी. आपण कधीही एकमेकांच्या संपर्कात येऊ नये हे अगदी मनापासून वाटते मला. देव करो आणि तसेच झाले पाहिजे. पत्राच्या सुरुवातीला प्रिय, आदरणीय वैगरे वैगरे लिहिण्याची पद्धत आहे. पण तुझ्यासाठी पत्र लिहिताना मला तसे लिहावेसे वाटले नाही. तू या जगात आल्यापासून सर्वानाच किती त्रास दिला आहेस हे तुला ठाऊक असेलच. लोकांचे हाल हाल झाले आहेत, कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. लोकं बेघर झाली आहेत. अर्थ व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडली आहे. लोकं तुला कंटाळले आहेत. तर मग तू प्रिय कसा असशील. पण तसे असले तरी तुला पत्र लिहिण्याचे आणि तुझे आभार मानन्याचे माझे स्वतः चे असे खास कारण आहे.
तर माझे नाव शर्वरी. माझी ओळख करून द्यायची झाली तर मी एक आई आहे, सून आहे, बायको आहे.. मला होम मेकर वैगरे म्हटल तरी चालेल. माझी ओळख ही एवढीच .पूर्वी माझी ओळख वेगळी होती. पूर्वी मी एक प्राध्यापिका होते. महाविद्यालयात समाजशास्त्र विषय शिकवायचे. काही वेगळी स्वप्न वैगरे नव्हती माझी. माझ्या विद्यार्थ्यांची मी आवडती शिक्षिका होते. माझं करिअर खुप छान सुरू होत. माझं काम हे माझा छंद होता, माझी आवड होती. मला त्यात आनंद मिळायचा. पुढे लग्न झाल. संसार सुरू झाला. माझं काम मात्र सुरळीत सुरूच होत. सर्व काही छान होत.. मला दिवस गेले आणि आम्हाला कळलं जुळी मुले होणार आहेत. थोडे complications होते माझ्या गरोदर पणात. त्यामुळे पूर्णपणे आराम करायचा सल्ला दिला डॉक्टरने. मला नोकरी सोडावी लागली. खुप वाईट वाटलं होत त्यादिवशी. पण माझ्या होणाऱ्या बाळांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, त्यामुळे तो निर्णय मला घ्यावाच लागला. डिलिव्हरी नंतर पुन्हा नोकरी करता येईल हे मला ठाऊक होते. माझ्या नवऱ्याने ही माझी समजूत काढली. माझी Pregnancy आठव्यामहिन्या पर्यंत नीट पार पडली. पण पुढे काही complications आल्यामुळे आम्हाला वेळे आधीच प्रसूतीचा निर्णय घ्यावा लागला. मला एक मुलगा आणि मुलगी झाले. लवकर झालेल्या प्रसूती मुले त्या दोघांची प्रकृती थोडी नाजूक होती. पण ते सुध्दा दिवस गेले. मुलांची प्रकृती सुधारू लागली सोबतच मी ही रीकवर होत होते. अधे मध्ये सर्दी खोकला यांने ते ग्रासलेले असायचे. थोडे नाजुकच होते दोघंही. त्यामुळे मुलांना सोडून नोकरी साठी बाहेर पडण्याची तेव्हा हिंमतच नव्हती. त्यात नवऱ्याची नोकरी फिरती ची असल्यामुळे कोणाएकाला घरात पूर्ण वेळ थांबणं भाग होते. नवऱ्याच्या पगारात आमचं नीट भागातही होत. त्यामुळे पुढे काही वर्षांचा ब्रेक घ्यायचं मी ठरवलं. मुलांच्या आणि नवऱ्याच्या मागे पुढे करता करता स्वतः कडे लक्ष द्यायचं राहूनच गेलं. पोट सुटत गेलं, शरीर ओबधोबड होत गेलं. पूर्वी अगदी स्लिम ट्रिम असणारी मी आता भोपळ्यासारखी दिसू लागले. माझ्या वाढत्या वयाबरोबर वाढत्या वजनामुळे मला त्रास होत होता. वजन आटोक्यात आणणे गरजेचे आहे हे कळत होते मला. पण स्वतःसाठी वेळ कसा काढू तेच कळायचे नाही मला. फावल्या वेळेत घरच्याच कुठल्यातरी कामात व्यस्त असायचे मी. कधीतरी थोड वाचन आणि लिखाण करायचे.. नवरा अध्ये मधे चिडवाय चा, कधीतरी म्हणायचं स्वतः कडे बघ जरा. मला थोड वाईट वाटायचं. मी स्वतः च काय करून घेतलं आहे त्याचं. पण नंतर स्वतः चीच समजूत काढायचे मी आता कुठे जायचं आहे मला, आता कोण बघणार आहे मला. नवऱ्याची नोकरी फिरती ची असल्यामुळे मुलाचं ही सर्व मला एकटीलाच बघावं लागायचे. कधीतरी स्वतः साठी वेळ काढून थोड वाचन करायचे. थोड लिखाण करायचे. मूल मोठी झाली.. स्वतः च्या जगात रमायला लागली. मला गृहीत धरू लागली. कधी तस बोलले नाही ते दोघंही पण त्यांच्या कृतीतून ते कळत होत मला. पण माझी काही तक्रार नव्हती. त्यांना त्यांच्या बाबाचा जसा अभिमान वाटतो तस माझ्या साठी त्यांच्या मनात अस विशेष काहीच नव्हत.
माझ्या कडे सर्व काही होत, प्रामाणिक आणि काही हवं नको ते पुरवणारा नवरा, दोन हुशार मुल, संसार, पण या सर्वात माझ असं वेगळं अस्तित्वच नव्हत. त्याला कुठेतरी मीच जबाबदार होते. आता हे असंच असणार हे मीच गृहीत धरून चालले होते. अशीच अठरा वर्ष उलटून गेली.कोरोना २०१९ मध्ये साधारण डिसेंबर मध्ये तुझा जन्म झाला. तुझ्या बद्दल ऐकून होतेच मी. मार्च महिन्यात तू भारतात आला. तुझ्या मुळे लॉकडाऊन करावं लागलं आणि आम्ही सर्वच घरात अडकून पडलो. आम्ही चौघाही एकत्र असणं हे आमच्यासाठी नवीन होतं. खुप वर्षां नंतर मला माझ्या पतीचा सहवास एवढ्या प्रधिर्घ काळासाठी मिळाला. घरातली कामं वाढली होती. सर्वांच्या आवडी निवडी जपताना माझी धांदल उडत होती. माझा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरातच जात होता. सर्वांसाठी हे सर्व करताना माझी होणारी त्रेधतिरपीट माझ्या नवऱ्याने पहिल्यांदाच जवळून पाहिली. एक दिवस तोच मला मदत करायला म्हणून स्वयंपाक घरात आला. मलाच कळेना आज याला नेमक झाल तरी काय.. पण मी काही विचारले नाही. त्या रात्री त्याने मला खुर्चीवर बसविले. तो माझ्या पायाजवळ बसला आणि माझा हात हातात घेऊन मला सॉरी म्हणाला. मी विचारलं,” नक्की काय झालं आहे तुला? आज अस का बरं वागतो आहेस तू? “तो त्यावर म्हणाला, “खरंतर हे मला या आधी करायला हवं होत. सर्वांचं किती करतेस तू. आमच्यामुळे किती त्रास होतो तुला. मुलांना साधं पाण्याचं ग्लास उचलायची सुध्दा शिस्त नाही उरली आहे. तुझ्या लट्ट पणावर हसतो आम्ही, पण या साठी सुद्धा आम्हीच कारणीभूत आहोत ना, स्वतः कडे बघ म्हणून सतत टोमणे मारतो मी पण तुझ्याकडे तेवढा वेळ तरी आहे का हे कधी मी माहित करून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तू आमच्या साठी तुझ करिअर मागे ठेवलं आणि आम्ही तुला काय दिलं? मुलांना साधी जाणीव सुध्दा नाही आहे त्याची. आता हे पुरे झालं. थोड उशिरा कळलं मला पण आता मी माझी चूक सुधारणार. त्या रात्री खुप वर्षांनी मी माझ्या नवऱ्याला भेटते आहे असेच वाटले मला. बदल होईल की नाही हे मला तेव्हा माहित नव्हते पण त्याच्या बोलण्याने मला खूप बरे वाटत होते. दुसरा दिवस उजाडला. माझ्या आधीच माझा नवरा स्वयंपाक घरात हजर होता. त्या दिवशी त्यानेच सर्वांसाठी नाश्ता बनवला. सर्वांनी एकत्र नाश्ता करायचा असे फर्मान त्याने काढले. मूल तशी बाबा ला दचकून असतात. त्यामुळे त्याच न ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. त्या दिवशी बऱ्याच कामांची वाटणी झाली. प्रत्येकाने आपापली पर्सनल कामं सांभाळून घराकडे लक्ष द्यायचं ठरलं. बाहेर तुझा कहर सुरूच होता.. पण माझ्या घरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते. हळू हळू मुलांना समजू लागले होते आई चे महत्त्व. मी नक्की घरात काय काय करते, किती बिझी असते हे त्यांना आता कळत होते. आम्ही रोज योगा प्राणायाम करू लागलो. तुझ्या येण्याने इम्मुनिटी आणि हेल्थ काढे लक्ष देणं भागच होते, त्यामुळे सकस आहार घेऊ लागलो. मुली सोबत थोड फार मी पण डाएट करू लागले. तिच्या सोबत एरोबिक व्यायाम करू लागले. माझ्यात शरीरात सकारात्मक बदल होऊ लागले. या पूर्ण लॉकडाऊनच्या काळात मी सहा किलो वजन कमी केले आहे. माझ्या मुलांना मला नव्याने समजून घेता आले. यातच माझ्या मुलाला कळले मला लिखाणाची आवड आहे ते. मी लिहिलेल्या गोष्टी मी सोशल मीडिया वर पोस्ट कराव्यात या साठी त्यानेच गळ घातली. आता माझ्या मुलांप्रमाणेच मी सुध्दा सोशल मीडिया वर आले. माझे विचार, माझ्या गोष्टी पोस्ट करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच माझ्या जुन्या विद्यार्थ्यंपर्यंत मला पोहोचता आहे. बऱ्याच जणांनी मला संपर्क केला. मी हरवलेला आत्मविश्वास मला सापडला. माझ्या अस्तिवचा मी शोध घेत नव्हते इतक्या वर्षात, जे आहे ते हेच आहे असे मानून जगत होते पण खरं सांगू आता मी खऱ्या अर्थाने सुखी समाधानी आहे. माझ्या मुलांच्या नजरेत त्यांची आई आज काहीतरी आहे. त्यांच्या बाबा प्रमाणेच त्यांना त्यांच्या आईचा ही अभिमान आहे. मी त्यांच्यासाठी करत असलेल्या गोष्टींची त्यांना जाणीव आहे.
आयुष्य पूर्ववत् झाल्यावर सुध्दा हेल्दी लाईफ स्टाईल जपायची अस आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे कोरोना मी मनापासून तुझी आभारी आहे. तुझ्यामुळे आमच्या या धकाधकीच्या जीवना ला अल्पविराम लागला. थोड्या काळासाठी का होईल आम्ही सर्व थांबलो. माझ्या घरात कोणी वाईट नव्हतं पण एकमेकांना समजून घेण्यासाठी कोणा कडे वेळ नव्हता तो तुझ्यामुळे मिळाला. मी स्वतः ला शोधलं आहे या दिवसात.माझ्या नवऱ्याची ती जुनी प्रेयसी होता आले मला. माझ्या मुलांची मैत्रीण होता आले मला. तुझ्यामुळे आम्हा सर्वांनाच एक रिअल्टी चेक मिळाला. पण आता तू जा. माझ्या सोबत सकारात्मक गोष्टी झाल्या तशा सर्वांसोबत झाल्याच असे नाही. खुप बातम्या ऐकल्या, खुप वाईट गोष्टी सुध्दा कानावर आल्या. आणि शेवटी आई म्हणून माझ्या मुलांना कोरोना झाला तर अशा भीतीच्या सावटाखाली मला जगायचं नाही आहे रे. तू दिलेल्या शिकवणी साठी तुझे आभार. तू दिलेल्या शिकवणी सोबत आम्ही सर्वच नव्याने आयुष्य जगू , पण त्यासाठी तुला आता जावं लागेल.
एक आई.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


