पूर्वाचे नुकतेच सिझर झाले होते. २४ तास फक्त लिक्वीड डाएट घ्या असे डॉक्टरांनी सांगितले. कसेबसे २४ तास गेले.पूर्वाला मरणाची भूक लागली होती. डिलिव्हरी माहेरी नाही तर सासरी झाली होती. त्यातच काॅम्पलिकेशनमुळे अचानक डिलिव्हरी करावी लागली. माहेर बरच दूर असल्यामुळे माहेरचे यायला सुध्दा बराच अवकाश होता.पूर्वाला काहीतरी गरमागरम नाश्ता खायची इच्छा झाली.सासूबाई तिच्या सोबत होत्या पण त्यांना सांगायला तिला संकोच वाटत होता. एवढ्यातच तिची धाकटी नणंद तिच्यासाठी नाश्त्याच्या डब्बा घेऊन आली.”वहिनी खुप भुक लागली असेल ना. हे बघ मला जमतो तसा शिरा बनवला आहे मी तुझ्यासाठी.” पूर्वाचा बेड थोडा वर करत आधार देऊन तिने बसवलं. मायेने शीरा भरवला.पूर्वाला त्यादिवशी शिरा अमृततुल्य वाटला.या शिर्याचा गोडवा त्यांचा नात्यात नेहमीच तरळत राहिला.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


