अंधश्रद्धा
मीराला बरेच वर्ष झाले मुलं होत नव्हतं. सर्व उपचार करून ती हताश झाली होती. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती एका बाबाकडे गेली. तिला लवकरच मुलं होईल हे आश्वासन त्याने दिले. तो म्हणेल ते सर्व ती करू लागली. त्याला हव्या त्या सर्व गोष्टी ती पुरवू लागली.
एकदा अचानक तिच्या कानावर बातमी आली. तो भोंदू बाबा लोकांना फसवून फरार झाला आहे. त्याने या आधीही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना असेच फसवले होते.
या बातमीमुळे मीराला जबरदस्त मानसिक धक्का बसला.ती त्या धक्यातून कधीच बाहेर आली नाही.
आपण २१ शतकात राहून अजूनही या अंधश्रद्धेचे बळी पडतो ही खेद जनक गोष्ट आहे.कृपया ह्या अंधश्रध्देच्या आहारी जाणे बंद करा.
**********
सततच बोलणं
अय्यरांची रुक्मिणी साठेंच्या घरी चार वर्षांपूर्वी सून होऊन आली. साठेंकडची मंडळी खुप छान होती.रुक्मिणी सुध्दा दुधात साखर विरघळावी तशी साठेंच्या घरात विरघळून गेली होती.तिला खंत होती ती एकच,येता जाता प्रत्येक जण तिला सतत सांगत असे “नशीबवान आहेस म्हणुन तुला एवढी चांगली माणसे भेटली.नाही तर तुझी काही खैर नव्हती.”
एका स्नेहभाजनाच्या कार्यक्रमात तिची थोरली जाऊ तिला सर्वसमोर पुन्हा तसच बोलली.रुक्मिणीला हे सहन झाले नाही ती पटकन म्हणाली, “मी नशीबवान आहे तुम्ही मला भेटलात.पण तरी कुठे वाईट आहे.हे अस ऐकल्यावर मला सतत वाटत तुम्ही सर्वांनी माझा अजूनही स्वीकार केला नाही.माझ्या मनात तुम्हा सर्वांसाठी अढी निर्माण होण्याआधी कृपया हे सततच बोलण बंद करा.”
**********
मानसिक आरोग्य
रजनी चार महिन्यांपासून विचित्र वागत होती. एका कोपऱ्यात बसून कधी खुप रडत असायची. कधी शून्यात बघत बसायची. स्वतःच्या खोलीतून दोन दोन दिवस बाहेर पडायची नाही. तिची अवस्था पाहून तिच्या वहिनीने मानसोपारतज्ज्ञांकडे जाण्याचा विचार घरच्यापुढे मांडला. पण घरच्यांनी साफ नकार दिला. तीच लग्न व्हायचं आहे.लोकं काय म्हणतील. तिला वेड ठरवू नकोस असे बोलून वहिनीला गप्प बसवले.
काही दिवसांनी रजनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. नशिबाने ती वाचली.तेव्हा वहिनी पुन्हा म्हणाली, “रजनीचा आजार हा मनाचा आहे कृपया तो लपविण्याचा प्रयत्न बंद करा. सत्य परिस्थितीला सामोरं जाऊन आपण तिला मदत करूया.मानसोपचारतज्ञांकडे जाणारा माणूस हा वेडा असतो हा गैरसमज मनातून काढून टाका.”
मानसिक आजाराकडे सुध्दा इतर आजाराप्रमाने लक्ष देणे गरजेचे आहे.
**********
सुनेचे वाभाडे
सुलभाकाकू आज खुप दिवसांनी त्यांच्या बिल्डींगमधल्या मैत्रिणीसोबत वॉकला गेल्या होत्या. सुलभा काकूंच्या मुलाच्या लग्नाला वर्ष झाले होते. त्यामुळे बायकांना उस्तुकता होती सासुसूनेच्या नात्याबद्दलची.
एक मैत्रीण म्हणाली,’ काय ग कशी आहे तुझी सून ? वेळीच मुसक्या आवळ तिच्या नाहीतर डोक्यावर बसेल ‘असे बोलू लागल्या.
सुलभा काकू वैतागून म्हणाल्या “आता हे सूनांचे वाभाडे काढणे बंद करा. म्हणूनच मी हल्ली येत नाही तुमच्या सोबत.अग जश्या आपल्या मुली तशा त्याही कोणाच्या तरी मुली आहेत ना.आधी समजून तर घ्या त्या मुलींना. वेळ तरी द्या नवीन घरात रमायला.आपण जर त्यांना समजून घेतलं नाही तर त्या तरी कश्या समजून घेतील आपल्याला.”
खरच किती योग्य म्हणाल्या काकू. सूनेचे वाभाडे काढणे बंद केले पाहिजे.
*********
मासिक पाळी आणि जुन्या रुढी
दिशाला मासिकपाळी आली की सासूबाई तिला एका कोपऱ्यात बसायला सांगत. घर सुध्दा लहान होते त्यामुळे तिचा कुठे ना कुठे हात लागे मग सासूबाई खुप चिडत असत. जणू तिने काही अपराध केला आहे अशीच वागणूक तिला मिळत असे.
आता तिची लेक सुध्दा वयात आली होती. आई मला शिक्षा देऊ नका म्हणून रडू लागली. आपल्यासोबत जे झालं ते मुलीसोबत होऊ द्यायचं नाही हे तिने ठरवलं.
सासूबाईंनी जेव्हा तिच्या लेकीला कोपऱ्यात बसायला सांगितले तेव्हा दिशा बोलली,”कृपया ह्या चुकीच्या रुढी बंद करा आता. पूर्वी स्त्रियांना आराम मिळावा यासाठी ह्या पद्धती सुरू झाल्या होत्या. पण तुम्ही आता मासिकपाळी म्हणजे एखादा गुन्हा केल्यासारखे वागवता या पुढे हे असे चालणार नाही.”
**********
स्त्री आहेस मग सहन केले पाहिजे..
तृप्तीचा नवरा व्यभिचारी,व्यसनी होता.तो तिला खूप मारझोड करीत असे.कधीतरी सर्व नीट होईल या आशेवर तिने त्याच्यासोबत चार वर्ष संसार केला.
तृप्ती शिक्षिका होती.मुलांना आपण अन्यायाविरूद्ध लढायची शिकवण देतो पण स्वतः मात्र अन्याय सहन करतोय हे तिला आता पटत नव्हते.तिने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.घरच्यांना सांगितला.सर्वांनी तिचा विरोध केला.”तूच त्याला समजून घेण्यात कमी पडली असशील,थोडी सहनशक्ती दाखव.संसार म्हटलं तर हे होतच,”असे म्हणून सर्व तिची समजूत काढू लागले.
तृप्ती चिडली, ” मी स्त्री आहे म्हणून मी सहनशीलतेच्या नावाखाली अन्यायही सहन करायचा हे सांगणे आता कृपया बंद करा. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.”
आज तृप्ती स्वतःच्या शिकवणीला साजेशी वागली होती.
***********
मुलगी शिकली , प्रगती झाली..
बारावीचा निकाल लागला. समृध्दी जिल्ह्यात पहिली आली. पुढे डॉक्टर बनण्यासाठी तिला शहरात राहणे गरजेचे होते. घरची परिस्थिती हालाखीची. मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापाने स्वतः जवळ असलेली थोडीशी जमीन विकून पैसे गोळा केला.
गावकरी त्याला मुर्ख म्हणू लागले. ” मुलीला शिकवून काय मिळणार आहे,तिच्या लग्नासाठी पैसे ठेव,मुलाला शिकावं तेच आपल भविष्य आहे”,असे बोलू लागले. पण तिच्या बाबांनी दुर्लक्ष केले.
समृध्दीही मन लावून शिकली. पुढे स्कॉलरशिप मिळवून परदेशी शिक्षणासाठी गेली.ती परत आल्यावर गावकऱ्यांनी तिचे जंगी स्वागत केले.गावकऱ्यांना संबोधत ती म्हणाली,” कृपया करून आता तरी मुलगा मुलगी हा भेद बंद करा.मुलींच्या लग्नासाठी नाही तर त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उभे करा.मुलगी सुध्दा तुमचा आधार होऊ शकते.”
आज तिच्या बाबांना खूपच अभिमान वाटतं होता.
************ समाप्त ***********
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


