राघव जे असेल ते पटकन बोलणारा,तर जुई थोडीशी हळवी,मनातलं लगेच न सांगणारी.असेच एके दिवशी राघवचे ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले.त्याच रागात तो घरी आला.जुईसुध्दा थोडी वैतागलेली होती.आधी ऑफिस,मग घरची कामं,मुलाचा पसारा,त्यातच सासूबाईंनी तिला जेवणावरून सुनावले होते.राघवने जुईला खुप वेळा विचारून सुध्दा ती काहीच सांगत नव्हती.शेवटी राघव वैतागला आणि तिच्यावर चिडला.जुई रडू लागली.ते पाहून तर त्याला अजून राग आला.किती समजून घ्यायचं तुला असे बोलून बेडरूम मधून निघून गेला.थोडा वेळ तसाच गेला.जुईला ही कळलं आपण अती करतोय.राघवला सॉरी म्हटलं पाहिजे म्हणून तिने बेडरूमचा दरवाजा उघडला तोच राघवसुध्दा तिला सॉरी म्हणायला आला होता.दोघांनाही खुप हसू आले.आजही हा क्षण आठवला की दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित उमटते.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


