त्याने तिला लग्ना साठी विचारले, आणि ती पूर्णपणे हुरळून गेली. का नाही जाणार..असही घरच्या वातावरणाला कंटाळली होती ती. दारूडा बाप, वाया गेलेला भाऊ आणि या सगळ्याला कंटाळून आई ने स्वतः साठी शोधलेला मर्यादे बाहेरचा मार्ग .. या सगळ्याचा कंटाळा आला होता तिला. ती दिसायला तशी साधारण होती. चारचौघी सारखीच. तो अगदी रुबाबदार, देखणा.. कुठल्याही तरुणीला भुरळ पाडेल असा. तिलाही भुरळ पडली होती त्याची.. म्हणूनच फक्त बस स्टॉप वरच्या दोन आठवड्यांच्या ओळखीत तिने त्याला होकार दिला .. तिच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा एक किरण बनून आला होता तो. तिने कुठला ही मागचा पुढचा विचार नाही केला .. बस आता तिला या दलदलीतून बाहेर यायचं होत. घरच्यांच्या परवानगीची गरज नाही भासली तिला. तिने फक्त त्यांना कळविले. तिच्या घरातला प्रत्येक जण स्वतःचा विश्वात एवढा रमला होता की तिच्या असण्या नसण्याने त्यांना काही फरकही पडला नाही. ती गेली निघून. मंदिरात लग्न केले त्यांनी. लग्नाच्या दुसऱ्याच रात्री तिला लक्षात आले तिने किती मोठी चूक केली आहे ती. दुसऱ्याच रात्री तो खूप दारू पिऊन आला होता. हळू हळू तिला त्याच्या बाहेरख्याली पणाचीही प्रचिती येऊ लागली.डान्स बार मध्ये जाण, तिथे जाऊन पैसे उडवण त्याच्यासाठी नवीन नव्हत. एकेदिवशी तर तो चक्क एका बाईला घरी घेऊन आला. ती त्याला अडवायला गेली तेव्हा त्याने तिलाच मारझोड केली. ती थबकली.. आतून पूर्ण तुटली. आगीतून फुफट्यात आल्यासारखं वाटू लागलं तिला. ती रात्र तिने तशीच एका कोपऱ्यात रडत बसून काढली. दुसऱ्या दिवशी भानावर आलेल्या नवऱ्याला तिने जाब विचारला. तो खूप भेसूर हसून तिला म्हणाला, तुझी योग्यता तर माझ्या पायाशी उभ राहण्याची सुध्धा नाही आहे. कुठे तू आणि कुठे मी. तू मला जाब विचारणारी कोण.?..या घरात एका मोलकरणीची गरज होती म्हणून मी तुला इथे आणले. मी लग्न वैगरे अशा फालतू बंधना ना मानत नाही.. आणि त्यात अडकणाऱ्या पैकी तर मुळीच नाही आहे. एवढे बोलून तो निघून गेला. ती आता पुरती हरली होती. तिच्याजवळ माहेर नव्हत ना सासर. तीचं आपल म्हणावं असं कोणीच नव्हत. जीव देण्यासाठी म्हणून ती घरातून निघाली. वाटेतच भोवळ येऊन पडली. शुध्दीवर आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती. काही लोकांनी तिला रस्त्यावरून उचलून हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तिथेच तिला कळले ती आई होणार होती. नियतीच्या या किमायेवर हसावं की रडाव हेच सुचत नव्हते तिला. स्वतः ल संपवू शकत नव्हती ती आता. ती एकटी नव्हती. बाळाला त्याच्या बाबाचे नाव मिळले पाहिजे त्यासाठी त्या नरकात परत जाण्याचे तिने ठरविले..ती परत घराकडे निघाली हाच विचार करून कदाचित ही बातमी ऐकून तो सुधारेल, स्वतः ला सावरेल. ती पुन्हा नव्याने संसार थाटण्याचा विचार करून घरी पोहोचली. नवऱ्या वर या बातमीचा काहीच परिणाम झाला नाही.. तरी ती हरली नाही नाही. बाळ या जागत येई पर्यंत नवऱ्याची मनधरणी करायची. त्याला सुधारायचे तिने ठरविले. त्याच्यासाठी नवीन जग निर्माण करायचे वचन तिने त्या पोटात वाढणाऱ्या जीवाला दिले.. आता ती रोज झटू लागली. प्रत्येक दिवस तिच्यासाठी नर्क यातने सारखा होता.. असे नऊ महिने गेले.. तिला कन्या रत्न प्राप्त झाले.. पण तिच्या नवऱ्याला तिचे काहीच सुखं दुःख नव्हते. ती एकटीच त्या तान्ह्या जीवाचे संगोपन करू लागली. एकदा ती बाळाला झोपवून शेजारी काही कामसाठी गेली. तेवढ्यात तिचा नवरा घरी आला. घरात गडबड गोंधळ करू लागला. त्या आवाजाने ते बाळ उठले आणि घाबरून जोर जोरात रडू लागले. दारूच्या नशेत मदमस्त झालेल्या त्याला ते बाळाचे रडणे सहन झाले नाही.. त्याने त्या बाळाचा गाळा आवळला.. ती दारापर्यंत पोहोचली होती.. तिने हे दृश्य पाहिले.. ती धावत सुटली.. तिने त्याला खेचले. धक्का दिला.. तो उठला आणि तिला मारझोड करू लागला.. तिला मारून झाल्यावर त्याने त्याचा मोर्चा बाळाकडे वळविला.. तो बाळाकडे जात असल्याचे तिने पाहिले , ती उठली आणि तिथे असलेले एक दांडुक हातात घेतल आणि त्याच्या डोक्यात घातले. आधीच दारूच्या नशेत धुंद असलेल्या त्याला तो एक प्रहर पुरेसा होता.. तो क्षणातच बेशुद्ध होऊन पडला.. तिने बाळाला जवळ घेतले.. तिच्या सहनशक्तीची मर्यादा आज संपली होती. हे सर्व तिने आधीच करायला हवे होते, त्याचा प्रतिकार तिने आधीच करायला हवा होता जेणे करून आज ही वेळ आली नसती. आज ती वेळेत आली नसती तर बाळाचे काय झाले असते या विचाराने ती घाबरून गेली.तिने बाळाची माफी मागितली.. या नराधम सोबत आता एक क्षणही थांबायचे नाही हे तिने मनाशी पक्के गेले. नेहमी स्वतः ला बिचारी समजणाऱ्या तिच्यात आज कुठून बळ आले होते ते तिलाच ठाऊक. तिने बाळाच्या कपाळावर ओठ टेकले.बाळ पोटात असताना त्याला दिलेले वचन तिने पुन्हा मनात घोळविले.. मी तुझ्यासाठी नवीन आणि सुरक्षित वातावरणात निर्माण करणारच असे बोलून ती घराबाहेर पडली. ती हे कसे करणार होती हे तिलाच ठाऊक….पण आता तिने स्वतःला निर्बल नाही मानायचे , बाळासाठी आणि स्वतः साठीच जगायचे एवढे निश्चित केले होते.
(ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)
डॉ. अश्विनी नाईक.


