प्रत्येक कुटुंबात असते एक आई. तिच्या पिल्लाच्या पाठी सतत धावणारी. हे कर,ते करू नकोस असे सतत सांगणारी. छोट्या छोट्या चुकांसाठी रागवणारी. मोठे गुन्हे माफ करणारी. माझ्या बाळासाठी काय खायला बनवू असा सतत विचार करणारी. नव नवीन रेसिपी ट्राय करणारी. बाळाला काही दुखलं खुपल तर स्वतः कळवळणारी. तिच्या पिल्लाला बरे नसेल तर रात्र रात्र जागून काढणारी. माझे पिल्लू सर्वांमध्ये भारी अशाच धुंदीत असणारी. पिल्लू मोठं झाल्यावर पण त्याला छोटस बाळ समजणारी, त्याला माझ्या शिवाय अमुक तमुक करताच येत नाही असे समजणारी. पिल्लू परदेशी गेल्यावर त्याचा तिथे कसा निभाव लागेल याच चिंतेने ग्रासलेली. लेकीच्या लहानपणापासूनच तिच्या लग्नाच्या स्वप्नात रमलेली. तिच्या लग्नासाठी छोट्या छोट्या गोष्टी जमा करणारी. लेकाचे लग्न झाल्यावर,सून घरात आल्यावर लेक मला विसरणार तर नाही ना याच विचारांमध्ये हरवलेली. कधी गृहिणी तर कधी वर्कींग वुमन म्हणून स्वतः चे आईपण काटेकोपणे निभावणारी.
प्रत्येक कुटुंबात असतो एक बाबा.मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा. त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा. आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची, पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा. वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा. लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा. लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा. स्वतः चा त्रास मुलांपासून लपवणारा. मुलांना काही झाले तर सैरावैरा धावणारा. सर्व परिस्थितीत ठाम उभ राहणारा. मुलांना त्याचे दुःख दिसू नये म्हणून कोपऱ्यात जाऊन रडणारा. मुलांना आयुष्यात मोठं होताना पाहून सुखावणारा. समाजात जेव्हा त्याची ओळख मुलांच्या नावाने होते तेव्हा आनंदाने गहिवरून जाणारा.
प्रत्येक कुटुंबात असते एक ताई. लहान भावंडांची जणू असते ती लहान आई. आई बाबांना नाव सांगेन असा ती देत असते सतत धाक,पण काही गडबड झालीच तर तिलाच देतो आपण पाहिली हाक. शोभा असते ती प्रत्येक घराची. लक्ष्मी होऊन जाते जेव्हा ती दुसऱ्या घरची, घालमेल होते तेव्हा प्रत्येकाच्या जीवाची.
प्रत्येक कुटुंबात असतो एक दादा. सतत खोड्या काढणारा, सतावणारा, ओरडणारा,मारणारा. मीच मोठा शहाणा अशा आवेशात फिरणारा. मी आहे आई बाबांचा लाडका असे सांगून चिडवणारा. पण कोणी दुसऱ्याने त्याच्या लहान भावंडांना त्रास दिला तर त्याला बदडवून काढणारा. बाबांनंतर घराची जबाबदरी खंबीर पणे पार पाडणारा. प्रत्येक संकटात साथ देणारा. सगळ्यांची काळजी घेणारा. बहिणीच्या लग्नात तिला मिठी मारून ओकसाबोक्शी रडणारा.भावाला त्याच्या स्वप्न पूर्तीस मदत करणारा.
प्रत्येक कुटुंबात असते एक मावशी. माय मरो अन मावशी जगो अशी म्हण आहे तिच्यावरून प्रचलित, एवढी माया तिची असते .आईची सावली आपल्याला तिच्या मध्ये दिसते.
प्रत्येक कुटुंबात असते एक आत्या. आपल्या भाचा भाचीवर खूप खूप प्रेम करणारी. त्यांचे सारे हट्ट पुरवणारी. आई बाबा ने रागे भरल्यावर कुशीत घेणारी.
प्रत्येक कुटुंबात असतात आजी आजोबा. आपले बालपण पुन्हा जगणारे. स्वतः च्या मुलांचे जेवढे हट्ट पुरवले नाहीत तेवढे नातवंडांचे पुरवणारे. त्याचे खूप खूप लाड करणारे. नातवंडांना छान छान गोष्टी सांगणारे. त्यांच्यासाठी कधी घोडा बनणारे तर कधी भातुकलीच्या खेळात रमणारे. आई बाबाच्या मारा पासून वाचवणारे. भुर नेणारे. बालगीत, प्रार्थना शिकवणारे.
प्रत्येक कुटुंबात असतात काका काकी, मामा मामी. आई बाबा जे मान्य करीत नाहीत ते हट्ट पुरवणारे. कधी कधी मित्र मैत्रिणींन पेक्षा पण जवळचे वाटणारे.
प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटे वर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी. त्याला चूक बरोबर काय ते स्पष्ट पणे सांगणारी. त्याच्या मानापमानची दखल घेणारी.
प्रत्येक कुटुंबात असतो एक नवरा. बायकोवर असीम प्रेम करणारा पण कधीही तिला व्यक्त न करू शकणारा. तिच्या रुसण्यावर हळूच हसणारा. तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा. तिच्या वादांवर गप्प बसून प्रतिसाद देणारा. तूच बरोबर आहेस असे नेहमी म्हणणारा. तिच्या शांततेतल दुःख समजून घेणारा. तिचा मान सर्व ठिकाणी जपणारा. तिच्या डोळ्यात स्वतः चे अस्तित्व शोधणारा. हे असे कुटुंब ज्याला लाभले त्याहून भाग्यवान असा कोणीच नाही.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक

