स्वावलंबन – १
नंदिनी तिच्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन नुकतीच आईच्या घरून तिच्या घरी बँगलोरला आली होती.आणि आठवड्या भरातच लाॅकडाउन झाले.नंदिनी घाबरून गेली.बाळाच्या मालिश वाल्याबाई पासून ते अगदी घरकामाला येणाऱ्या बाईपर्यंत आता कोणीच येणार नव्हते. त्यात घरात हे दोघच.मला हे जमणार नाही,असे म्हणून नंदिनी रडूच लागली.नवऱ्याने तिला समजावले,आता आपल्याला जमवावचं लागेल.
दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले.यूट्यूब पाहून,पालकत्वाची पुस्तकं वाचून बाळाला सांभाळू लागले.ऑफिसच्या कामातून वेळ काढून तिचा नवरा तिला घरकामातही मदत करू लागला.बाळाच्या सवयी समजून घेऊन स्वतःचा दिनक्रम ठरवू लागेल.काही अडलच तर घरातली इतर मंडळी फोनवर मदत करायला होतीच.
प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असलेल्या या दोघांना आता स्वावलंबनाचे महत्त्व समजू लागले.
———————————- समाप्त ————————————-
खरी श्रीमंती – २
जोशी काकू घरी येणाऱ्या मोलकरणीपासून ते भाजीवाल्यापर्यंत सर्वांची प्रेमाने विचारपुस करायच्या.पण त्यांच्या सुनेला,निशाला मात्र हे आवडत नसे.आपण आपल्या बरोबरीच्या लोकांशीच जवळीक साधावी असे तीचे मत.कोरोनाच्या या लाटेत जोशी कुटुंबीयांना कोरोना झाला.सासू आणि सासर्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले.तर बाकीच्यांना होम काॅरंन्टाईन केले.अशा वेळी सासूबाईंनी जोडलेली हीच माणसं उपयोगी आली.कोणी हॉस्पिटलमध्ये डब्बा पाठवण्याची जबाबदारी घेतली तर कोणी जोश्याच्या घरी.जोशी कुटुंबाला काय हवे नको त्या सर्व गोष्टींची ते काळजी घेत होते. नशिबाने पूर्ण कुटुंब बरे झाले.
या पंधरा दिवसांनी निशाला पूर्ण बदलले होते.खऱ्या अर्थाने तिला माणुसकीचे दर्शन झाले होते. माणूस खरा श्रीमंत पैशांनी नाही तर प्रेमाने जोडलेल्या माणसांमुळे होतो हे तिला कळले होते.
———————————- समाप्त ————————————-
अंथरूण पाहून पाय पसरावेत – ३
अंथरूण पाहून पाय पसरावेत अशा विचारांची राधा,तर हे एकच आयुष्य आहे,हवे तसे जगावे या विचारांचा रोहित.
दोघेही एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते.पगारही खुप चांगला होता.पण तरीही अडीनडीला पैसे साठवून ठेवावे,वस्तूंची कदर करावी असे राधा रोहितला बजावत असे.पण रोहित सतत उधळपट्टी करतच असे.चैनीच्या गोष्टी घेण्यासाठी त्याने बराच कर्जबाजार करून ठेवला होता.लाॅकडाऊनमुळे आधीच पगार कमी येऊ लागला. दोन महिन्यांनंतर रोहितची नोकरी सुध्दा गेली.सध्याच्या परिस्थितीत दुसरी नोकरी मिळणेही कठीण झाले होते. राधाने त्याच्या नकळत बचत केली होती त्यामुळे अनपेक्षित प्रसंगालाही ते तोंड देऊ शकले.
परिस्थितीने रोहितला चपराक दिली होती.आपल्याच धुंदीत असणाऱ्या रोहितला भानावर आणले होते. बचतीचे महत्त्व पटवून दिले होते.
———————————— समाप्त ———————————–
सेलिब्रेशन – ४
मार्चमध्ये माझ्या बाळाचे नामकरण होते.पण कोरोनामुळे सर्व बुकिंग रद्द कराव्या लागल्या.आम्ही घरीच बारसे केले.आप्तेष्टांनी व्हिडिओ कॉलवरून हजेरी लावली.ही कविता रचून मी माझ्या बाळाचे नामकरण केले.
कोणी म्हणायचे मला बाबू,तर कोणी बाळू. कोणाचा होतो मी पिल्लू,तर कोणाचा सोनू. पण नक्की माझ काय आहे नाव? तेच तर ठरवायचे होते ना राव.. मी आहे सर्वांचा छकुला ,खुप खुप लाडावलेला. बघता बघता झालो मी ३ महिन्यांचा,२८/०३/२०२० ला मुहूर्त काढला होता माझ्या नामकरणाचा. कोरोनाने घातलं आहे जगभर थैमान ,त्यामुळे रद्द करावा लागला माझ्या नामकरणाचा प्लान. संचार बंदीमुळे सर्वांना पडतो आहे मार, आई बाबांनी घरीच जाहीर केले माझं नाव आहे *मल्हार*.
मोठ्या सेलिब्रेशन शिवायही आनंद साजरा करता येतो हे आम्ही शिकलो.
———————————- समाप्त ————————————-
देव बाप्पा – ५
छोटा पार्थ त्याच्या आई बाबांना खेचतच खिडकीपाशी घेऊन गेला. आणि खाली बोटं दाखवत म्हणाला,”तुम्ही तर म्हणता बाहेर कोरोना आहे,बाहेर गेलो तर तो मला पकडेल. मग ते काका कसे बाहेर सफाई करताहेत.” पार्थला काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून त्याचे बाबा म्हणाले,” त्यांच्याकडे एक पॉवर आहे, कोरोना त्यांना काहीच करू शकत नाही. “हे ऐकून पार्थ पटकन म्हणाला, “अच्छा म्हणजे ते देव बाप्पा आहेत.”
खरंच पार्थ किती योग्य बोलला. धार्मिक स्थळे बंद असली तरी डॉक्टर्स,पोलिस,सफाई कर्मचारी,नर्स अशा वेग वेगळ्या रूपात देवाचे दर्शन होत आहे. या काळात देव,भक्त आणि भक्ती यांची संकल्पनाच बदलून गेली आहे. आता खऱ्या अर्थाने नवीन पिढीला देव सापडू लागला आहे.
——————————— समाप्त ————————————
जाणीव नात्यांची – ६
साने काकांचा मुलगा त्यांना काय हवं नको ते जातीने पाहत होता. त्याच्या मुंबईतल्या मित्रांकडून त्यांना वस्तू घरपोच उपलब्ध करून देत होता. काका त्याच्याशी गेले दोन वर्ष बोलले नव्हते. परदेशात स्थायिक होऊन तिथल्याच मुलीशी विवाह केला त्यामुळे आपला मुलगा नालयकाच आहे असे त्यांचे मत झाले होते.
मुलगाही हट्टी. ते बोलत नाहीत म्हणून त्यानेही सगळे संबंध तोडले होते. पण या परिस्थितीमुळे खरंच एकमेकांना कायमच गमावून बसलो तर ही भीती त्यांना वाटू लागली.
रागरुसवे हे क्षणिक असावेत,त्याने नात्यांना इजा होऊ नये याची त्यांना जाणीव झाली होती. कधी एकमेकांना भेटता येईल असे त्यांना झाले होते.
खरंच या परिस्थितीने कितीतरी नात्यांना पुन्हा श्वास घ्यायची संधी दिली आहे.
—————————– ——-समाप्त ——————————–
आई बरेच काही करते – ७
आईने कधीही काम सांगितले की साक्षी नेहमी कारणे देत असे. ‘ काय गं आई हे एवढही तू करू शकत नाहीस का ‘,असे म्हणून वैतागत असे. दुर्देवाने साक्षीच्या आई बाबांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. आता घरी आजोबा, साक्षी आणि तिचा लहान भाऊ होते. सर्व जबाबदारी साक्षीवर पडली होती. सर्वांचं करताना तिच्या नाकीनऊ येत होते. आई बाबांची काळजी तर होतीच पण आता तिला आईची जास्तच आठवण येऊ लागली होती. आई कुठे काय करते वरून आई बरेच काही करते आणि आपल्याला मात्र तिच्या त्रासाची जाणीव सुध्दा करून देत नाही हे तिला एव्हाना कळू लागले होते.आई बाबा घरी परतल्यावर त्यांना नवीन साक्षी भेटली होती.
———————————– समाप्त ———————————-
बाळ मोठं झालं हो..- ८
दहा वर्षांच्या राहुलला कोरोना झाला. घरातल्या इतरांचे रिपोर्ट नेगेटिव आले. राहुल तसा मस्तीखोर पण भित्रा. आई बाबांना सोडुन कुठेही न राहणारा.त्याला न्यायला ॲम्बुलन्स आली. आई ढसाढसा रडू लागली. बाबा हळहळले. राहुल मात्र त्याचं सामान घेऊन ॲम्बुलन्समध्ये जाऊन बसला.
डॉक्टर्स आणि नर्सेच त्याची काळजी घेत होते. घरी व्हिडिओ कॉल सुध्दा लावून देत होते. आपल्या रडणाऱ्या आईला पाहून राहुल म्हणाला,” आई मी इथे मजेत आहे. हे अंकल आन्टी माझी काळजी घेतात.मी बरा होऊन लवकर घरी येईन. आपल्याला मिळून कोरोनाला हरवायचे आहे. तू अशी रडू नकोस. तुझी आणि सर्वांची काळजी घे.”राहुलचं बोलणं ऐकून आईला जाणवलं, तीच बाळ आता मोठं झालं होतं.
——————————- समाप्त —————————————-
नवीन पिढीचा वेगळं दृष्टिकोन – ९
यंदाचे गणपती दरवर्षीप्रमाणे नव्हते,त्यामुळे दामले आजी फार दुःखी होत्या. दामल्यांचा प्रपंच खुप मोठा. गणपतीत शंभर माणसं तरी पंगतीला असायची. खुप जल्लोषात गणेशोत्सव साजरा व्हायचा.पण या वर्षी तर गणेशमुर्ती सुध्दा बाहेरून आणण्यावर त्यांच्या सोसायटीने बंदी घातली होती. नातवंडांना आजीचे दुःख समजत होते. त्यांनी घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यातून गणपतीची आरास केली. घरातली एक गणेशमूर्ती पूजेसाठी ठेवली. आजी थोड्या सुखावल्या. मुलांनी जेवण बनवून ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. आणि आजींना म्हणाले, “दरवर्षी गणेशोत्सवात आपण खुश असतो पण यावर्षी आम्ही देवालाही खुश केलं.” आजींनाही मुलाचं म्हणणं पटलं.
या पुढेही ही प्रथा सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्णय केला.खरंच या नवीन पिढीमुळे वेगळा दृष्टिकोन मिळाला आजींना.
——————————- समाप्त ———————————–
अनोळखी मृतदेह – १०
लॉकडाऊनमुळे रामा समोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. एकतर अशिक्षित, त्यात हातावरचे पोट,घरात माणसं पाच .
कुठून तरी त्याला कळलं मृतदेहांना खांदा द्यायला सुध्दा लोक मिळतं नाहीत,पैसे देऊन माणसे आणावी लागतात. कोरोनामुळे सगळीकडेच हाहाकार होता. दुसऱ्या आजाराने ही दगावणाऱ्या माणसांना खांदा द्यायला आप्तेष्ट कोरोनाच्या भीतीने पुढे येत नव्हते. हे ऐकून रामा सुखावला. तो अनोळखी मृतदेहांना खांदा द्यायचे काम करू लागला.
आता तो रोज हॉस्पिटल बाहेर उभं राहून कोणाच्या तरी मृत्युची वाट पाहू लागला..त्याला त्याच्या विचारांची घृणा वाटत होती..पण कुटुंबाचे पोट भरणे ही त्याची प्राथमिक गरज होती.या दिवसात अन्न वस्त्र निवारा ह्याच माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे पुन्हा सिध्द झाले.
—————————– समाप्त —————————————
कोविड योद्धा – ११
पतीच्या निधनानंतर सुगंधाने मुलांना एकटीने वाढविले होते. मुलं आता वयाने आणि प्रतिष्ठेने मोठी झाली होती. आई सफाई कर्मचारी असल्याची त्यांना आता लाज वाटत होती.
कोरोनामुळे अख्ख जग थांबलं होतं. पण सुगंधा आपले काम निष्ठेने करत होती. अदृश्य शत्रूशी लढत होती.दोन महिन्यांनी परिस्थिती थोडी निवळल्यावर, ती एकदा कामावरून घरी येत असताना तिच्या शेजाऱ्यांनी तिचे जंगी स्वागत केले. कोविड योद्धा म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या नावाचा जयघोष सर्व करत होते. फुलांचा वर्षाव केला जात होता. तिला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
आज मुलांना त्यांच्या आईच्या कामाचे महत्व पटले होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नसते हे त्यांना कळले होते.
——————————- समाप्त —————————————-
जीवनाचे बदललेले रंग – १२
वर्षभरात जीवनाचे रंग किती बदललेले,कधी विचारही केला नव्हता असे चांगले वाईट, दोन्ही अनुभव आले. गृहिणींची व्यथा आता सर्वांना कळू लागली,ऑफिसमध्ये कामाचा किती ताण असतो याची WFH मुळे सर्वांना जाणीव झाली. चिमुकल्यांसाठी सुगीचे दिवस आले,आई बाबांच्या सानिध्यात ते बहरू लागले. घरच्या अन्नाची गोडी आता सर्वांना कळू लागली. बचत,अधिकचे आर्थिक पाठबळ यांची गरज आता सर्वांना भासू लागली. अदृश्य शत्रूपासून संरक्षणासाठी आपल्याकडे निदान ह्या चार भिंती आहेत,याचे सर्वांना हायसे वाटू लागले. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानाने जगणे आता सर्वांना कळू लागले. अजूनही हा शत्रू बाहेर सावज शोधत आहे. आपली आणि आपल्या कुटुंबाची रक्षा करणे ही आपली जबाबादरी आहे.
——————————– समाप्त —————————————
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


