सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्रुती राहुलसोबत डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कला शिफ्ट होणार होती. न्यूयॉर्कमध्ये डिसेंबर म्हणजे खुप थंडी, बर्फवृष्टी, ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची जंगी तयारी. श्रुती हे सर्व ऐकून होती. तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत ती हे प्रत्यक्षात अनुभवणार होती म्हणून ती खुप आनंदात होती. राहुल आणि तिच्या सहजीवनला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती.
दोन दिवसांनी श्रुती निघणार होती.बिनाआईच्या श्रुतीला सासुकडून खुप माया मिळाली. त्यांना सोडून जायचे या विचाराने ती अस्वथ झाली. सासूने तिला तिच्या आवडीच्या रंगाचे हातमोजे,स्वेटर, कानटोपी गिफ्ट दिले. “माझी माया देतेय सोबत.त्या कडाक्याच्या थंडीत ऊब देईल ती तुला” म्हणत सासूने ते बॅगेत भरले.
निघायच्या दिवशी त्या दोघी एकमेकींना बिलगून खुप रडल्या.जड अंतःकरणाने एकमेकींना त्यांनी निरोप दिला.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


