माझ्याकडे सुपरपॉवर असती तर खरंच मी क्षणाचाही विलंब न करता माझे बालपण परत मिळवले असते. देवाघरी गेलेल्या माझ्या मम्माला देवाकडून परत मागून आणले असते. त्याला म्हणाले असते,” जन्म आणि मृत्यू शाश्वत सत्य आहे, ते मी मानते, पण अजून थोडा वेळ आम्हा मायलेकींना दे. तिच्या कुशीत थोडा वेळ मला विसावू दे. शाळेतल्या गमतीजमती तिला सांगू दे. वयात येताना मनात उद्भवणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मला तिला विचारू दे. तिच्यासोबत मनसोक्त बागडू दे. तिच्यावर थोडंसं रुसू दे, भांडू दे. तिचा थोडा ओरडा खाऊ दे.आनंदाचे प्रसंग तिच्यासोबत साजरे करू दे. दुःखाच्या प्रसंगी तिच्या मांडीवर डोके ठेवू दे.असंच सहज तिला माझ्या केसातुन मायेने हात फिरवू दे. थोडा वेळ तरी आम्हाला एकमेकींना बिलगून रडू दे.”
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


