Home » Marathi » Blogs » पहिला घास

पहिला घास

आजचा दिवस सुध्दा संपला. कधी पासून मी या दिवसाची वाट पाहत होते. आज बाळाला सहा महिने पूर्ण झाले. त्याचा अन्न प्राशन विधी झाला आज. काल पासूनच तयारी सुरू झाली होती. भटजींना फोन लावून मुहूर्त काढला. बाळाला पहिल्यांदा काय भरावयच त्यावर चर्चा झाली. सध्या lockdown असल्यामुळे सर्वच घरी आहेत आणि तसे पाहता सर्वांना विर्गुळ्याच असे विशेष काही नाही.. तिचं तिचं घरची कामं, तेच तेच ऑफिस मधून येणारे फोन कॉल्स, ऑफिसची कामं, टीव्हीवरच्या कोरोनाच्या बातम्या, या सर्वात थोडासा विरंगुळा म्हणून हल्ली छोट्या छोट्या विधी सुध्दा आम्ही सर्व पूर्ण तयारी निशी, साग्रसंगीत पद्धतीने करतोय. नाही तर अन्न प्राशन सारख्या विधी साठी एवढी चर्चा झालीच नसती. तेवढा वेळ तरी कुठे असतो या रूटीन लाईफ मध्ये.

तस अन्न प्राशन विधी किंवा अन्न प्राशन संस्कार ही विधी बाळ सहा मिहिन्याचे झाल्यानंतर केली जाते. हिंदू संस्कृतीत या विधीला विशेष स्थान आहे. दक्षिण भारतात तसेच पारसी समाजात ही विधी एखाद्या सोहळ्या सारखी केली जाते. बाळाला पहिल्यांदाच आईच्या दुधा व्यतिरिक्त दुसरा एखादा पदार्थ खाऊ दिला जातो. अर्थातच एखादा मऊ, थोडासा गोडसर,आणि अगदी बाळाला व्यवस्थित गिळता येईल आणि पचेल असच पदार्थ दिला जातो. आता इथून सुरू होतो बाळाच्या मम् मम् चा प्रवास, कधी सूप, कधी भरड, कधी प्युरी करत करत चिऊ काऊचे घास खाल्ले जातात.

या दिवसाची मी फार आतुरतेने वाट पाहत होते. कधी माझं बाळ खाऊ पिऊ लागेल. मग मी त्याच्यासाठी कधी हे बनावेन तर कधी ते अश्याच विचारात बरेचदा असायचे मी. पण कालची रात्र थोडी कठीण गेली. बाळाला नक्की कधी काय दिलं पाहिजे, कस दिलं पाहिजे, एखादी गोष्ट त्याला पचली नाही तर नक्की काय होईल, तेव्हा काय केलं पाहिजे हे सर्व माहित असूनही फार भीती वाटत होती. त्याला चव आवडेल ना, त्याला त्रास तर होणार नाही ना, पोटात दुखायला लागलं तर? असे किती तरी प्रश्न मला भेडसावत होते.

अखेर आजचा दिवस उजाडला. ठरल्या प्रमाणे मुहूर्तावर बाळाला पाहिला घास भरवला. त्या वेळी का कुणास ठाऊक मला अगदी भरून आलं. हे असं का होतंय नक्की कळत नव्हतं. बाळाला चव सुध्दा आवडली. त्याने मिटक्या मारत ५/६ चमचे खाल्ले देखील. पण मी अस्वस्थ होते. पहिल्यांदा जेव्हा मला कळले होते की मी आई होणार आहे तो दिवस ते आजचा दिवस, संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. नऊ महिने तो पूर्णपणे जोडलेला होता माझ्याशी. माझा भाग होता. त्याचा जन्म झाला आणि नाळ तुटली. तो एक स्वतंत्र जीव झाला. त्याला एक नवीन अस्तित्व मिळाले. आता इतके दिवस तो पूर्णपणे माझ्या वर अवलंबून होता. आता इथून पुढे तस नसेल, आणि ते योग्यही आहे. तसच असत ना प्रत्येक सजीवाचे. हे सर्व माहित असूनही थोड्या वेळासाठी मन चलबिचल झालं. ही तर पहिली पायरी होती. आता असे किती तरी प्रसंग येतील, किती तरी गोष्टी होतीलच जेव्हा माझ बाळ नवीन काहीतरी शकेल, नवीन काहीतरी करेल त्याच्या बाबाची आणि माझी मदत घेऊन, आणि एके दिवशी तो स्वतः च स्वतः सारं काही करू लागेल आमच्या मदती शिवाय. त्याला माझी गरज भासणार नाही , त्याचे माझ्या शिवाय काही अडणार नाही हा विचार आल्यावर थोड वाईट वाटत पण आनंद ही होतो शेवटी कितीही झालं तरी त्याने स्वतः चे अस्तित्व निर्माण करावे, हीच प्रत्येक आईची अपेक्षा असते..

प्रत्येक आई कदाचित या विचाातून जात असेल. लहानपणी आई बाबा नेहमी म्हणायचे,” तू आई होशील तेव्हा कळेल तुला”, या वाक्याचा अर्थ आता कळायला लागला आहे.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *