फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार शास्त्र आणि फिजिओथेरपिस्ट म्हणजे भौतिक उपचार तज्ञ. तसे बरेचदा हे दोन्ही शब्द कानावर पडतात.. “माझी कंबर दुखते आहे म्हणून हाडांच्या डॉक्टरने मला फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्यायला सांगितली आहे. माझी मान दुखते आहे म्हणून मी शेक घ्यायला जाते, माझ्या गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर ते पूर्ववत होण्यासाठी मी फिजिओथेरपीचे व्यायाम केले, अर्धांगवायूचा घटका आल्यानंतर मी फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू केली त्यानंतर मला बराच फायदा झाला …एखाद्या क्रिकेट सामन्यात किंवा फुटबॉल सामन्यात खेळाडूला दुखापत झाली की आपले किट घेऊन धावत येणारा डॉक्टर म्हणजे फिजिओथेरपिस्ट ..” असे कितीतरी किस्से, गोष्टी आपल्याला अधून मधून ऐकू येत असतात….
पण हे फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय आहे..? फिजिओथेरपिस्ट नक्की कोण असतात.. ? ही वैद्यकीय सेवा आहे का..? योगा आणि फिजिओथेरपी एकच आहे का? फिजिओथेरपिस्ट औषधं देतात का…? असे असंख्य प्रश्न लोकांना पडतात… या बद्दल अजूनही बरेच समज गैरसमज आहेत. फिजिओथेरपिस्ट आणि योगा ट्रेनर किंवा जिम ट्रेनर, फिटनेस ट्रेनर यांमध्ये बरेच जण गफलत करतात.
फिजिओथेरपी ही सुध्दा एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल यासोबतच वैद्यकीय विभागाची एक शाखा आहे. नवीन धोरणानुसार NEET ही प्रवेश परीक्षा बारावी सायन्स नंतर द्यावी लागते. ( बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हे विषय गरजेचे आहेत. पूर्वी महाराष्ट्र CET द्यावी लागायची). बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ही डिग्री साडे चार वर्षांनी मिळते ( ४ वर्ष कोर्स तर सहा महिने internship), तर मास्टर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स अजून पुढे २ वर्ष करावा लागतो.
फिजिओथेरपी बद्दल एक खुप छान वाक्य आहे, “A physiotherapist has brain of scientist, the heart of humanist & the hands of an artist.”
व्यायाम, निरनिराळी इलेक्ट्रिकल उपकरणं, मॅन्युअल थेरपी यांच्या मदतीने उपचार करून शरीराच्या निरनिराळ्या भागांमधील व्याधी दूर करून त्यात सुधारणा करणारा डॉक्टर म्हणजे फिजिओथेरपिस्ट.
सांध्यांची कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान या साठी बऱ्याच अत्याधुनिक उपचार पद्धती वापरल्या जातात.
स्नायू, हाड, मेंदू, मज्जा तंतू, हृदय, फुफुसे, बालरोग, स्त्री रोग, वाढत्या वयानुसार होणारे आजार, विशिष्ट प्रकारच्या जीवन शैली नुसार तसेच कामामुळे होणारे आजार, स्पोर्ट्स इंजुरी या वर फिजिओथेरपिस्ट उपचार करतात.
फिजिओथेरपिस्ट हा वैद्यकीय विभागातले असे डॉक्टर असतात जे त्याच्या रुग्णांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतात. फिजिओथेरपी उपचार हे साधारण आठ दिवस ते काही महिने चालतात.
शरीराची कार्यक्षमता वाढवणे, ताकद वाढवणे, शरीर लवचिक बनवणे, दुखापतीने योग्य निदान करून गरजेनुसार योग्य ते व्यायाम शिकवणे, एक विशिष्ट उपचार पद्धती निवडून व्याधी दूर करणे हे काम फिजिओथेरपिस्ट करतात.
स्नायूंना आराम अथवा उत्तेजना मिळण्यासाठी, चालना मिळण्यासाठी, जखमा बऱ्या होण्यासाठी किंवा दुखणे कमी होण्यासाठी विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो. यात अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथरमी, टेन्स, आय.एफ.टी.,लेजर, इंफ्रा रेड, विविध करंट ह्यांचा उपयोग केला जातो. ही उपकरणे दुखापत कमी करून त्या भागाला लवकर बर होण्यास मदत करतात. विविध चेतना नसलेल्या स्नायूंना पुन्हा हालचाल करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता राखण्यास मदत करतात.
फिजिओथेरपी उपचारामुळे बऱ्याच शस्त्रक्रिया टाळता येतात. शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनाचे काम सुध्दा फिजिओथेरपिस्ट करतात. Anti Natal फिजिओथेरपी मूळे Pregnancy, Delivery दरम्यान होणारा शारीरिक त्रास कमी करता येतो तसेच Post Natal फिजिओथेरपी मुळे प्रसूती कुठल्याही पद्धतीने झालेली असली तरी पुन्हा लवकर एकदा पूर्ववत होण्यासाठी मदत होते. बऱ्याच दुखण्यावर वेळेत फिजिओथेरपी उपचार झाले तर कमी औषध किंवा बरेचदा औषधांशिवाय रुग्ण बरे सुध्दा होतात. फिजिओथेरपिस्ट फक्त पुनर्वसनाचे कार्य करीत नाहीत तर आपण आपली जीवन शैली सुधारून ( posture, correct way of sitting,standing ,bending, ) वेदना रहित जीवन , उत्कृष्ट जीवन कसे जगू शकतो याचेही मार्गदर्शन करतात.
So let’s add life to years not just years to life.
काही महत्त्वाच्या गोष्टी
• फिजिओथेरपी ही येणाऱ्या काळाची गरज आहे. विदेशात फिजिओथेरपी आणि फिजिओथेरपिस्ट यांचे खुप महत्त्वाचे स्थान आहे. पण भारतात अजूनही फिजिओथेरपी बद्दल तितकीशी जागरूकता नाही, ही एक खेद जनक गोष्ट आहे. आपल्या मायबोलीत जेव्हा एखादी माहिती उपलब्ध असते तेव्हा ती वाचायला ही आपल्याला आवडते आणि ती समजून घ्यायला ही मदत होते. त्यामूळे मला जमेल तितक्या सोप्या पद्धतीने मी , ही माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
• फिजिओथेरपी उपचार हे लायसेन्स फिजिओथेरपिस्ट काढूनच घ्यावेत.
• तुमचा फिजिओथेरपी बद्दल एखादा अनुभव असेल तर नक्की शेअर करा.
समाप्त
©️ डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.
बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (B.P. Th )


