Home » Marathi » Stories » .. बाबा होते म्हणून.

.. बाबा होते म्हणून.

बघता बघता तो दिवस आला ज्याची सर्वच आतुरतेने वाट पाहत होते. राधाच लग्न. उद्या राधाच लग्न होत. आज संध्याकाळी तिला हळद लागणार होती. घरात चोहीकडे आनंदाचे वातावरण होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. राधा मात्र तिच्या खोलीत शांत बसून होती. कालपर्यंत सार काही मनासारखं होत आहे,आता आपलं सहजीवन सुरू होणार आहे म्हणून अगदी आपल्याच धुंदीत वावरणारी राधा आज जरा हिरमुसली होती. आता आपण हे घर सोडून जाणार, आता हे घर आपल्यासाठी परक होणारं याची जाणीव तिला तीच रिकामी कपाट पाहून झाली. बाहेरून कसला तरी आवाज आला. म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर तिचे बाबा डेकोरेशन चे काम करायला आलेल्या मुलाला ओरडत होते. ” अरे माझ्या एकुलत्या एक लेकीचे लग्न आहे, तिने सांगितलेली फुलं तुम्ही का आणली नाहीत. मला काही माहित नाही, तिला आवडतात तशीच गुलाबी रंगाच्या गुलाबाची फुलं तुम्ही आणून लावा. कुठूनही शोधून आणा पण तिला आवडते तेच होणार.” बाबांना हे बोलता बोलता अचानक ठसका लागला. ते पाहून राधा तिच्या खोलीतून धावतच बाहेर अंगणाच्या दिशेने निघाली. बाहेर आली तेव्हा रमाई बाबांना समजावत होती. एवढा त्रागा करू नका असे सांगत होती. त्यांना पाणी पाजत त्यांच्या पाठीवरून हात फिरत होती. ते पाहून राधाला थोडे समाधान मिळाले.

राधाने तिथेच भिंतीवर लावलेल्या तिच्या आईच्या फोटो कडे पाहिले आणि मनातच म्हणाली, “आई तू आणि मी नसलो तरी रमाई आहे बाबांसाठी.”

राधा तीचं पूर्ण घर न्याहाळत होती. जुन्या सर्व आठवणींना उजाळा देत होती. बाबा होते म्हणून आपण आजचा हा दिवस बघत आहोत याची तिला पूर्णपणे जाणीव होती. गेल्या काही वर्षात बाबांना खुप काही सांगायचं राहून गेलं होतं म्हणून तिने बाबांना पत्र लिहायचं ठरवलं. तिने सुरुवात केली.

आदरणीय बाबा

आई गेली. तिला जाऊन आता चौदा वर्षे झाली. ती गेली तेव्हा मला काहीच कळणार नाही असं माझं वय नव्हतं , किंवा सारं काही मी समजून घेऊ शकते असही माझं वय नव्हतं. ती गेली तो दिवस आजही आठवतो मला. तिच्या या अशा अचानक जाण्याने आपण दोघेही हादरून गेलो होतो. पण तुम्ही स्वतःला कठोर बनवलं होत, हे सुध्दा मला माहीत आहे. त्या रात्री एकटेच बसून रडताना तुम्हाला मी पाहिले होते. त्या नंतर मी तुम्हाला अशाप्रकारे रडताना कधीच पाहिले नाही. मला माहित आहे माझ्यासाठी तुम्ही स्वतःला कणखर बनवलं ते. आई गेली मग आता मी शिक्षण सोडणार, मला घर सांभाळायला लागणार अशा चर्चा शेजारी करायचे. पण तुम्ही तसे होऊ दिले नाहीत. आई विना पोर बेशिस्त होणार, वाया जाणार असे बरेच जण बोलायचे, पाठून खुप चर्चा रंगायच्या पण तुम्ही तसे होऊ दिले नाहीत. मी वयात येत होते. माझ्या वयाची गरज समजून तुम्ही आधी माझी मैत्रीण झालात मग माझी आई. मासिक पाळी, त्या दरम्यान होणार त्रास, बदल या बद्दल छोट्या छोट्या गोष्टींमधून मला समजावू लागलात. माझ्या साठी सॅनिटरी पॅड आणताना ही तुम्ही कधी कसली लाज बाळगली नाहीत. आज मोठ मोठ्या शहरात राहणाऱ्या आणि सुशिक्षित पुरुषांनाही जे अजुन जमलं नाही, कळलं नाही ते माझ्या गावात राहणाऱ्या आणि जेमतेम शिक्षण असलेल्या बाबांना तेव्हा जमलं, याचे एक मुलगी आणि स्त्री म्हणून मला अभिमान आणि अप्रूप वाटते. थोड कळायला लागल्यावर मला लक्षात येऊ लागलं मी तर माझा जोडीदार शोधून माझ्या वाटेने निघून जाईन. पण तुमचं काय? शेवटी माझ्याच हट्टामुळे तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. रमाई घरात आली. सावत्र आई आली आता काही खरं नाही. बाबा बदलणार असं काही बाहि लोक बोलायचे, आता तुला उच्च शिक्षणासाठी जाता येणार नाही, आता त्यांचा प्रपंच सुरू होणार वैगरे वैगरे गोष्टी कानावर पडायच्या. खरं सांगू तर मला सुद्धा भीती वाटायची. तुम्ही बदललात तर मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला असे होईल असे मला वाटायचे. त्या दिवसात मी आतून पूर्ण पणे भेदरले होते. पण रमाई कधी सावत्र आई सारखी वागली नाही. माझ्या आयुष्यात तिने कधीच माझ्या आईची जागा सुध्दा घेण्याचा प्रयत्न केला नाही. ती फक्त इथे तुमची सोबती आणि माझी मैत्रीण म्हणून आली होती. आजही ती तिचे काम चोख पार पाडत आहे. “माझं फक्त एकच बाळ आहे आणि असेल, ते म्हणजे राधा” हे तुम्ही रमाई ला सांगताना ऐकले होते मी. तेव्हा त्या वयात मला हायसे वाटले होते. बाबां वर अजूनही माझाच हक्क आहे आणि राहणार याचा मला आनंद झाला होता. पण माझ्या साठी तुम्ही रमाई वर किती अन्याय केला हे मला थोड उशिराच कळलं. मला आर्किटेक्ट बनवण्यासाठी तुम्ही घेतले कष्ट मला ठाऊक आहेत. माझ्या कॉलेज ची फी, शहरात हॉस्टेल मध्ये राहण्याचा खर्च, माझा तिथे होणारा रोजचा खर्च सर्व तुम्ही एकट्याने सांभाळलं. मला डिग्री मिळाल्यावर तुम्ही सर्वान पासून लपवलेले आनंदाश्रु मी पाहिले होते. सर्व करताना तुम्हाला किती खसता खाव्या लागल्या त्याची जाणीव आहे मला. प्रशांत आणि माझे नाते देखील तुम्ही अगदी सहज स्वीकारले. आता उद्या आम्ही कायमचे एकरूप होणार हे केवळ तुमच्यामुळे शक्य होत आहे बाबा. बाबा काही प्रसंगी मी भांडले तुमच्याशी, कधी रागावले, कधी रुसून बसले, प्रत्येक वेळेला आपली मते सारखी होतीच असे नाही. पण बाबा तुम्ही माझ्यासाठी आज तागायत जे जे केले आहे त्याची जाणीव मला तेव्हा ही होती आणि आजही आहे. फक्त हे सांगायचं राहून गेलं होत. तुम्ही आणि मी कुठे लांब जाणार आहोत, इथेच तर आहोत आपण म्हणून माझ्या तुमच्या बद्दलच्या भावना मी कधी शब्दात व्यक्त केल्या नाहीत. आज माझी थोडी रिकामी झालेली खोली पाहून मला जाणीव झाली. मला आज तुम्हाला हे सांगायला हवं,तुम्ही माझ्यासाठी किती स्पेशल आहात ते. मला आज व्यक्त व्हायलाच हवं तुमच्या पाशी. बाबा तुम्ही होतात म्हणून आज माझा अस्तित्व आहे. समाजात मला वेगळं स्थान निर्माण करता आलं. प्रशांत सारखा एक उत्तम जोडीदार मला मिळाला. आज आई जिथे कुठे असेल तिथे मला तिला हे सांगावेसे वाटते की,” आई सॉरी पण माझे बाबा माझे फेवरेट आहेत. ते मला तुझ्यापेक्षा ही प्रिय आहे. तुझ्या आठवणी आज खुप अंधुक झाल्या आहेत माझ्या आयष्यात. माझ्या बाबांनी माझं जग व्यापल आहे”. बाबा मी आता लग्न झाल्यावर बायको सून म्हणून वावरणार. पण कितीही मोठी झाले मी ,तरी सर्वात आधी तुमची लाडकी लेक राधाचं असणार. मी आता दुसऱ्या घरी जाणार पण तुमच्या सोबत तुम्हाला आयुष्यभर साथ देणारी रमाई आहे याच मला समाधान वाटते. बाबा माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकणार नाही.

तुमची लेक राधा.

राधाने बाबांना पत्र दिले आणि तेव्हाच तिच्या सामोरं वाचायला लावले. ते पत्र वाचत असताना बाबांच्या डोळ्यातून अश्रूंचा पुरच आला. रमाई सुध्दा कोपऱ्यात डोळ्याला पदर लावुन उभी होती. पत्र पूर्ण होताच राधेने बाबांना मीठी मारली. ते दोघेही आज खुप रडले. आनंद, दुःख असे काही समिश्र वातावरण होते ते. आज सर्व भावनांना अश्रु मार्फत वाट मोकळी झाली होती.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *