त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो नेहमी प्रमाणे वैतागत तो बेडरूम मध्ये गेला. ती नेहमी प्रमाणे आरशासमोर उभी राहून तयार होत होती. तिला बघताच तिच्या वर हसावं की तिला ओरडाव हेच त्याला कळतं नव्हते. स्वतःच्या धुंदीत होती ती. तो खोलीत आलेला तिला कळलं देखील नाही.कुठेले कानातले घालू, कुठला दागिन्यांचा सेट मॅचिंग आहे. मी जाड तर वाटत नाहीये ना असेच प्रश्न स्वतः शी विचारात ती स्वतः ला आरशात न्याहळत होती. हे सर्व करता करता तीच लक्ष त्याच्या कडे गेले, ती त्याला म्हणाली मला पाच मिनिट दे हा. त्याला माहित होते पाच मिनिट म्हणजे अजुन अर्धा तास तरी ती अशीच आरशासमोर उभी राहून तिचे उद्योग करत बसणार आहे. आणि मग मध्येच त्याच्या कडे बघून भुवया उडवून त्याला विचारणार कशी दिसतेय मी. पुन्हा अजुन पाच मिनिटे मागणार. तिने अगदी तसचे केले. त्याला सवयच होती या सर्व गोष्टींची. आजही ती खूप सुंदर दिसत होती. त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्ष पूर्ण होणार होती. त्याच निमित्ताने त्यांच्या मुलांनी त्या दोघांसाठी छोटीशी पार्टी प्लॅन केली होती. खरतर पार्टीचा प्लॅन लग्नाच्या वाढदिवसा दिवशीचाच होता. पण तिने नकार दिला. कारण तिचे म्हणणे होते की तो दिवस फक्त आम्हा दोघांचा आहे मग तो आम्ही आम्हाला हवा तसाच साजरा करू. त्या दिवशी फक्त आम्ही दोघेच अजुन कोणी नाही. “लग्नाला पस्तीस वर्ष झाली म्हणून काय झाले,अजूनही माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझी मुले मला प्रिय आहेत,पण तू प्राणप्रिय आहे” असे काहीसे फिल्मी बोलायची ती.
पस्तीस वर्ष… खुप मोठा काळ त्यांनी सोबत घालवला होता. बघताच क्षणी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ती पेशाने वकील होती. आणि तो इंजिनीयर. दोघांनीही वेळ न दवडता घरी कळवले होते. घरची मंडळी प्रॅक्टिकल होती आणि तसे हे दोघे ही सुजाण होते. त्यामुळे लग्नाला विरोध नाही झाला. थाटामाटात लग्न झाले होते त्याचे. घर, लग्न, घरची मंडळी, नंतर दोन मुलं, त्यांचे शिक्षण, लग्न, आणि त्या सोबत स्वतः चे करिअर अशा सर्व भूमिका तिने चोख बजावल्या होत्या. त्याने सुध्दा प्रत्येक गोष्टीत तिला पूर्णपणे साथ दिली होती. मुलांचा सांभाळ करणे असो की घरच्या जबाबदारी मध्ये तिला मदत करणे असो तो नेहमी तिच्या सोबत असायचा. अगदी जेवण बनवण ते मुलांचे शी शू साफ करणं, प्रत्येक कामात तो तिला मदत करायचा. प्रेगन्सीनंतर पुन्हा करिअर सुरू करणं तिला कठीण वाटत होते. पण त्याने तिला नेहमी प्रोत्साहन दिले. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हा प्रवास ते पूर्णपणे जगले होते. त्या दोघांचे एकमेकांवर निस्सिम प्रेम होते, काळजी होती,एकमेकांच्या समर्पणाची जाणीव होती. असे नव्हते की त्यांच्यात कधी भांडण झालीच नाही. पण माफी मागायला त्यांना कधी लाज वाटली नाही आणि माफ करताना कधी मनात किंतु परंतु आला नाही.
तिची तयारी पूर्ण झाली. ती अजुनही त्याला तितकीच सुंदर वाटायची जितकी पहिल्या भेटीत वाटली होती. तिने त्याला तिच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये विचारले “कशी दिसतेय मी?” तो पटकन म्हणाला “नेहमी सारखीच सुंदर. खुप भागयवान आहे मी तुझ्यासारख्या सुंदरीशी माझे लग्न झाले”..” तुझे आपले काहीतरीच हा”.. असे म्हणत लाजून तिने त्याला मिठी मारली.
या दोघांच्या गोष्टीत खऱ्या प्रेमाचा अर्थ सापडतो. जोडीदार नक्की कसा असतो, कसा असावा हे कळते. आयुष्यची वाट प्रत्येकाची सारखी आणि सोप्पी अशी नसतेच पण त्या वाटेवर चालताना जोडीदार समजुदर, प्रेमळ,काळजी घेणारा असला तर प्रवास खडतर वाटत नाही.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक


