Home » Marathi » Stories » मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. – भाग २

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. – भाग २

(सत्य घटनेवर आधारीत)

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्मिताने राजेशच्या हातात काही पैसे दिले. दोन लाख रुपये होते ते.

ते राजेशला देत स्मिता म्हणाली, “एवढ्या वर्षात मी साठवलेली रक्कम आहे ही. तुम्ही जे घर खर्चासाठी मला पैसे द्यायचात त्यातून मी थोडे थोडे बाजूला काढायचे. अडी अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल म्हणून. आपण काहीतरी उद्योग सुरू करू. एक जागा भाड्याने घेऊ. हवं तर भाजीच दुकान सुरू करू. होल सेल भावात भाजी आणू आपण.”

त्यावर राजेश तिला म्हणाला” इथे इतकी दुकानं आहेत मग आपल कस चालेल.?”

त्यावर ती त्याला म्हणाली, “नाही चालणार हे तरी कशावरून. आपण प्रयत्न तर करू. उपजिविकेसाठी आपल्याला काहीतरी करावेच लागेल ना. आपल्या दोघांचंही शिक्षण जेमतेम, आता नोकरीही मिळणार नाही. घरी बसून रडण्यापेक्षा बाहेर पडून प्रयत्न करू. तुम्हाला ऑफिस मधून सुध्दा काहीतरी पैसे मिळतीलच. ते आपण सेविंग म्हणून ठेऊ”.

राजेशला तीचे म्हणणे पटत नव्हते, पण तिच्यातल्या सकारात्मकतेने त्यालासुद्धा वाटले करून बघायला काय हरकत आहे आणि आता असही त्यांच्या कडे दुसरा पर्याय नव्हता. आठवड्यात त्यांना त्यांच्या घरा शेजारीच भाड्याने एक दुकान मिळाले. तिथे त्यांनी आधी फक्त कांदे बटाटे विकण्यास सुरुवात केली. होले सेल मार्केट मधून विकत आणून बाजार भावा पेक्षा १/२ रुपये कमी करून ते विकू लागले. काही दिवसांनी त्यांनी भाजी विकायला सुरुवात केली. मग एक सेकंड हॅण्ड फ्रिज घेऊन शीतपेय विकू लागले. स्मिता गृहिणी होती. त्यामुळे तिला गृहिणींना दैनंदिन दिवसात स्वयंपाक करताना होणारा त्रास आणि अडचणी माहित होत्या. गृहिणींना काय आवडेल ते माहित होते. तिने घरीच वेग वेगळ्या प्रकारचे पीठ दळायला सुरू केले. दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला ती सुरुवातीला १०० ग्राम पीठ मोफत देऊ लागली. ती सुगरण होती. हे लोकांना आवडणार याची तिला खात्री होती. तिच्या या कल्पनेने कमालच झाली. त्याचा धंदा वाढला. हळू हळू तिने वेग वेगळ्या चटण्या बनवून विकणे सुरू केले. लोकांना तेही आवडले. स्वयंपाक करताना वाटण बनवाव लागत. त्यासाठी भाजलेल्या खोबऱ्याची आवश्यकता असते. तिने तेही बनवून विकण सुरू केलं. ही कल्पना तर हिट ठरली. खुप कमी वेळात त्यांचा व्यवसाय वाढला. हे सर्व करताना तिची बरीच धावपळ होत होती. पण ती तिच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन उभी होती. तिची सकाळ चार वाजताच व्हायची. मुलींचं सर्व आवरून, घरची कामं करून ती राजेशला दुकानं सांभाळायला मदत करत होती. हे सर्व करताना तिने कधीच कसली तक्रार देखील केली नाही. बरेचदा सामान आणता राजेश सोबत ती सुध्दा ओझी उचलून आणायची.एखाद्या पुरुषाला ही लाजवेल एवढं काम ती करत होती.

राजेशच तिच्यावर प्रेम होतच पण या दिवसात त्याच्या मनात तिच्यासाठीच आदर खुप वाढला होता. स्मिता नसती तर आज आपण काय केले असते, खरंच तिच्या सारखी सहचारिणी मला भेटली हे माझ सुदैव आहे, हे त्याला राहून राहून वाटे. तिच्यातल्या या बिझनेस स्किल्स ची सुध्दा त्याला नव्याने माहिती होत होती. एरवी खुप साधी वाटणारी त्याची बायको त्याला आता नव दुर्गे सारखी भासत होती. तिच्या रुपात त्याला देवीच भेटली होती.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *