स्वरा हल्ली सतत कुठल्यातरी विचारात हरवलेली असायची. नुकतीच तिची अकरावी ची परीक्षा होऊन कॉलेज ला सुट्टी सुरू झाली होती. पण स्वरा ने जरा ही वेळ न दवडता बारावी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली होती. स्वरा म्हणजे विजय आणि रश्मी यांची लेक. विजय एका बँकेत नोकरी करत होता तर रश्मी छोट्याश्या प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी करत होती. स्वरा ने डॉक्टरच बनावे हा रश्मीचा अट्टाहास होता. स्वरा अभ्यासात हुशार होती. आई बाबांचं एक गुणी बाळ होती. ती अगदी ‘मम्मास गर्ल’ होती. रश्मी सुध्दा हुशार होती. पण घरच्या परिस्थिती मुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यामुळे स्वतः चे अपूर्ण स्वप्न ती स्वरा मार्फत पूर्ण करायचा प्रयत्न करीत होती. आई म्हणून ती खूप छान होती, पण स्वराला डॉक्टर बनविण्याच्या ध्येयाने तिला पार वेड करून सोडलं होतं. स्वराच्या उठण्यापासून ते तिच्या झोपे पर्यंत तीच एक वेळापत्रकच रश्मीने बनवून ठेवलं होत. ती सतत स्वराच्या मागे पुढेच असायची. तिला काय हवय नकोय ते बघायची. ती अभ्यास करतेय की नाही हे सतत तपासून पाहायची. ऑफिसला गेली तरी अधून मधून स्वरा ला फोन करून तिच्या अभ्यासाची चौकशी करायची. अधून मधून स्वराला स्वतः च्या बालपणीचे किस्से, तिची अपूर्ण राहिलेली स्वप्न तसेच तिचा खडतर प्रवास याचे डोस द्यायची. त्यामुळे स्वरा ला पूर्णपणे जाणीव होती की तिच्या आईच्या तिच्याकडून किती अपेक्षा आहेत. हल्ली ती सतत याच विचारात गुंतलेली असायची. आई च्या अपेक्षा पूर्ण करण्यात ती यशस्वी झाली नाही तर काय होईल? हाच प्रश्न तिला सतत भेडसावत असायचा.
विजय रश्मी च्या अगदी उलट होता. मुलांवर स्वतः च्या अपेक्षांचे ओझे टाकू नये. त्यांनी स्वतः त्यांच्या आवडी निवडी नुसार करिअर निवडावे. आई वडील त्यांच्यासाठी त्यांचे मार्गदर्शक असावेत, पण त्यांच्या आयुष्याचा निर्णय हा त्यांनीच घ्यावा. रश्मी ला त्याने खुप वेळा समजवायचा प्रयत्न केला होता. रश्मी स्वरा ला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगून ‘इमोशनल ब्लॅक मेल’ करते असे तो तिला सतत म्हणायचा. कधी कधी त्यांचे या वरून वाद देखील व्हायचे. पण रश्मी या सर्वांच्या पलीकडे गेली होती. आता देवच तिला समजवू शकतो असेच त्याला वाटायचे. तो शक्य होईल तेवढा स्वरा वरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करायचा.
असेच एक दिवस रश्मी ऑफिस मधून घरी येत होती. तिला बिल्डिंग खाली बरीच गर्दी जमलेली दिसली. तिथे विचारपुस केल्यावर तिला कळले की तिच्या खालच्या मजल्या वरच्या एका वीस वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. त्याचे पेपर कठीण गेल्यामुळे तो नापास होईल याची त्याला भीती होती, हे त्याने आत्महत्ये आधी लिहिकेल्या पत्रामुळे कळले होते. हे ऐकुन रश्मी थोडी दचकली. ती घाबरतच पुढे गेली. त्या मुलाच्या आईचा आक्रोश, निशब्द झालेले वडील, ते दुःखात बुडून गेलेले वातावरण तिला सहन होईना से झाले. ती धावतच वर तिच्या घरी गेली. त्या मुलाच्या जागी तिला स्वराचाच भास झाला. घरी पोहोचल्यावर ती कसलाही विलंब न करता स्वरा च्या खोलीत गेली. तेव्हा स्वरा नेहमी प्रमाणे तिचा अभ्यास करत होती. रश्मी ने स्वराच्या हातातले पुस्तकं बाजूला केले. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिला आपल्या उराशी धरून बरच वेळ तशीच उभी राहिली ती. ‘आई काय झालं ग’, असे स्वरा ने विचारेल तेव्हा ती स्वरा ला साॅरी म्हणाली, “उगीचच मी माझ्या स्वप्नच ओझं तुझ्यावर लादत होते. मला माफ कर. आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी तुझे आई बाबा नेहमी तुझ्यासोबत आहेत हे कधीच विसरू नकोस.” रश्मी चे हे शब्द ऐकून स्वरा थोडी सुखावली होती.
प्रसंग फार दुःखद होता, पण शेजाऱ्यांवर आलेली वेळ पाहून रश्मी ने योग्य काय तो धडा घेतला होता.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


