सौम्या नोकरी निम्मित पहिल्यांदाच मुंबईत आली होती. या आधी मुंबईत येण्याचा प्रश्नच नव्हता. सार काही गावाकडे.. सगळे नातेवाईक गावाकडे.. शिक्षण सुध्दा तालुक्यात झालं. पाटलांची एकुलती एक लेक.. त्यातच तीन पिढ्यामध्ये पहिली मुलगी. त्यामुळे लाडाकोडात वाढलेली. जे जे मागेल ते तिला मिळालं. घरात एवढं शिकलेली ती पहिलीच. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःची ओळख निर्माण करायची यासाठी तिची नेहमीच धडपड सुरू असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने शहरात नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आणि तिच्या मेरिटवर तिला नोकरी मिळालीही. घरातून आधी विरोध झाला. घरच्याच म्हणणं होत जे काही करायचं आहे ते इथेच राहून कर. घराचा व्यवसाय आहे तो सांभाळ पण सौम्याला ते मान्य नव्हत. कारण त्यातून तिची अशी काहीच ओळख निर्माण होणार नव्हती… तिने अथक प्रयत्नांनी घरच्यांना तयार केलं..आपली बाजू पटवून दिली. ‘फक्त वर्षभर मला नोकरी करू द्या नंतर मी परत इथेच येईन,’ असे वचन तिने तिच्या बाबांना दिले.. असेही आई बाबांना स्वतःचा मुद्दा पटवून देण्यात ती पटाईत होतीच… झालं तर मग…
सौम्या निघाली…भाऊसाहेब म्हणजेच तिच्या बाबांनी तिच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करून दिली होती. सोबतच मंजूला सुध्दा पाठवल.. सौम्या आणि मंजू मुंबईला आल्या.. आई – बाबा ,काका- काकू अगदी सर्वच त्यांना सोडायला आले होते. आई आणि काकू चांगल्या आठवडाभर सौम्यासोबत राहिल्या.. तिला संपूर्ण घर सेट करून दिलं. आठवड्याच्या शेवटी भाऊसाहेब आई आणि काकूला न्यायला आले.
निघताना कौशल्याबाई म्हणजेच सौम्याची आई सौम्याला म्हणाली, ” बाळा आम्ही नेहमीच तुला तुझ स्वातंत्र्य दिलं, आपण गावाकडे राहत असलो तरी तुला तिथे कसली कमी पडू दिली नाही. तुझ्या वागण्या बोलण्यात अडाणीपणा , गावंढळपणा येणार नाही याची काळजी घेतली.. तुझ्यासाठी नेहमीच जे उत्तम असेल तेच तुला देण्याचा प्रयत्न केला. आता तू इथे एकटी राहणार आहेस. स्वतः ला जप.. तू म्हणजे आमचा अभिमान आहेस. आमची मान खाली जाईल असे काही करू नकोस.. नवीन जागा , नवीन माणसं , सर्व वेगळ आहे इथे.. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक निर्णय घे. काही लागलच तर आम्हाला सांगायला संकोच करू नको. तुला वाटतं असेल आई हे काय बोलत बसली आहे, बाळा तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी माझी लहान सौम्याच आहेस… आई म्हणून तुला सांगणं , जपण हे माझ काम आहे… बाकी तू खुप हुषार आहेस, आणि मंजूसुध्दा सोबतीला आहेच त्यामुळे आम्हीही निर्धास्त असू… ” बोलता बोलता आई चे डोळे पाणावले.. सौम्यालाही गहिवरून आले..
इतक्यात भाऊसाहेब आले.. म्हणाले, “अहो मालकीण बाई चला निघायचं आहे आता.. लेकीला सोडून जायचं तर मन आमचं पण नाही.. पण जावं लागेल.. “
,कौशल्याबाई म्हणाल्या, “हो निघतेच आहे.. शेवटच्या सूचना करत होते तिला… ”
निघताना कौशल्या बाईनी मंजूला सुध्दा सर्व व्यवस्थित समजावलं..जड अंतःरणाने सर्व गावाकडे निघाले..इथे सौम्या सुध्दा थोडी हळवी झाली होती.हळू हळू सौम्या रुळू लागली.. सोबतीला मंजू होतीच.
मंजू सौम्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी. पाटलांकडेच लहानाची मोठी झाली. तिची आई, शकू त्यांच्या कडे घरकामाला यायची. बाप आधीच व्यसनामुळे गेला होता, काही वर्षात आई गेली. अनाथ मंजूचा सांभाळ पाटील कुटुंबाने केला. तिला शिकवण्याचा ही त्यांनी प्रयत्न केला.. पण तिला कधी शिक्षणात रसच नव्हता.घरातल्या गोष्टी सांभाळणं, घरातली कामं करणं, बाजार हाट बघणं हेच तिला फार आवडे. सौम्या मुंबईला निघाली तेव्हा तिला एकट कस सोडायचं हा प्रश्न उभा राहिला तेव्हा मंजू स्वतः हुन सौम्या सोबत राहायला तयार झाली. सौम्या ऑफिसला निघून गेल्यावर मंजू घरातलं सर्व आवरे.. फावल्या वेळेत कॉम्प्लेक्स मध्ये फेरफटका मारे.. कधी टीव्ही, कधी शिवण काम यात स्वतः ला गुंतवून घेई. शनिवार रविवार सौम्या आणि मंजू प्लॅन करून फिरायला निघत. कधी मॉल्स, कधी पार्क, वेग वेगळ्या हॉटेल्स मध्ये नवनवीन पदार्थ खायला जात.. एवढं करत असताना ही एक नियम मात्र ठरलेला, कुठेही गेल्या तरी रात्री ८ च्या आत त्या घरी परत येत.. आई बाबा जवळ नसतानाही सौम्याने स्वतःचे काही असे नियम बनवले होते आणि त्याचे ती काटेकोरपणे पालन करत असे. ऑफिस सुध्दा खुप छान सुरू होत. महिना अखेरीस त्या दोघी दोन दिवसासाठी गावी सुध्दा जाऊन येत. बघता बघता तीन महिने सुध्दा गेले.
एके दिवशी सौम्या घरी येत असताना लिफ्टची वाट बघत उभी होती.. तेव्हा तिथे तिला एक मुलगा भेटला….उंच बांधा, पिळदार शरीरयष्टी, राकट आवाज,निळसर डोळे असलेल्या त्याला बघताच क्षणी सौम्या त्याच्यावर भाळली.. लिफ्ट मधून तो उतरे पर्यंत ती त्याच्याकडे चोरून चोरून पाहत होती.. तो तिच्या खालच्या मजल्यावर उतरला.. त्या रात्री सुध्दा त्याचा विचार तिच्या मनात सारखा येत होता… तिला हे असे पहिल्यांदा वाटले होते. तिला स्वतः वरच हसू आले.. दुसरा दिवस उजाडला. पुन्हा तो तिला भेटला.. आता असेच तो तिला अधून मधून दिसू लागला. भेटू लागला. हळू हळू ते एकमेकांना बघून smile देऊ लागले. एकदा मॉर्निंग वॉकला ती गेली असता तो तिला तिथेही दिसला.. या वेळी तो एक छानशी smile देत तिच्या जवळ आला..
” तुम्ही रोज इथेच येता का वॉकला? “त्याने विचारले.
त्याच्या प्रश्नांवर ती थोडी गोंधळली.. जॉगिगच्या कपड्यावरही तो खुप स्मार्ट दिसत होता. त्याच्या त्या निळ्याशार डोळ्यात ती हरवली.. काहीच उत्तर मिळत नाही पाहून त्याने तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली.. ती भानावर आली..
त्याने विचारलं..”hey what happened? “
ती म्हणाली ,”nothing.. हो मी इथेच येते वॉक ला.. “
दोघे सोबत चालू लागले.. आज तिला त्याचे नाव कळले.. शरद.. तिच्याच बिल्डिंग मध्ये तो खालच्या मजल्यावर राहत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.. आता ते रोज मॉर्निंग वॉकसाठी भेटू लागले. फोन नंबर एक्सचेंज झाले. एकदा मंजू काम करत असताना बाथरूम मध्ये पडली. त्यावेळी सौम्या ऑफिस मध्ये होती. ती तडक निघाली पण तो पर्यंत मंजुला काही जास्त त्रास झाला तर या विचाराने तिने शरदला फोन लावून त्याची मदत मागितली. ‘मी पोहोचेपर्यंत शरद येईल तिथे ‘, हे सौम्याने मंजूला कळवले. सौम्या घरी पोहोचेपर्यंत शरदने परिस्थिती सांभाळून घेतली.. खांद्याला मार लागला होता. डॉक्टरांनी दीड महिना आराम करायचा सल्ला दिला. शरदचे आभार कसे मानावे हेच सौम्याला काळात नव्हते.. शरद आता सौम्याला अजून आवडू लागला. मंजू इथे राहिली तर ती आराम करणार नाही म्हणून सौम्याने तिला सक्तीने गावी पाठवून दिले.
आता सौम्या घरी एकटीच असायची त्यामुळे शरदचे तिच्या घरी येणे जाणे वाढले. एकदा रात्रीचे जेवण झाल्यानंतर शरद सौम्यासाठी स्पेशल चॉकलेट्स घेऊन आला.
“हे स्पेशल चॉकलेट आहे.. एकदा खाशील तर सारखं मागशील..”, सौम्याने चॉकलेट खाल्ल.. तिला खरच ते फार आवडलं.
” हे अस चॉकलेट मी या आधी कधीच खाल्ल नव्हत.. ” तिला फार वेगळी फिलिंग येत होती. काय होत ते तीच तिलाच कळत नव्हत पण सार काही छान वाटत होत. आता रोजच शरद तिच्यासाठी चॉकलेट आणू लागला. सौम्या सुध्दा आतुरतेने त्या चॉकलेट्सची वाट पाहू लागली. अधे मध्ये वेगवेगळे खाद्य पदार्थ घेऊन येऊ लागला.
दोन महिन्यांनी मंजू परत आली. तिला सौम्या थोडी बदलेली वाटली. थोडी गोंधळली.. थोडी हायपर झालेली.. मंजूने दोन दिवस तिच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केले. कितीही कामात असली , कुठेही गेलेली असली तरी रात्री ८ वाजे पर्यंत घरी येणारी सौम्या १२ शिवाय घरी येत नव्हती.
आठवड्याभराने मंजुने न राहून सौम्याला विचारले,” ताई काय झालं आहे तुम्हाला? काही टेंशन आहे का? “
सौम्या चिडून म्हणाली , “काय झालं.. अस का विचारते आहेस..?”
,” तुम्ही उशिरा घरी येता. आईसाहेब आणि भाऊ साहेब फोन वर विचारत होते तुमच्या बद्दल. या महिन्यात जायचं आहे ना गावी? काय सांगू त्यांना…? त्यांनी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही हल्ली जास्त बोलत नाही त्यांच्याशी.. खुप कामात असता.. त्यामुळे ते मला विचारत होते.. काय सांगू त्यांना…?” सौम्या यावर काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली..
आपण काहीतरी वेगळं वागतो आहोत.. काहीतरी विचित्र होत आहे आपल्याला हे तिला कळत होत.. पण नक्की काय हे उमगत नव्हत.. ऑफिसच्या कामात सुध्दा तीच मन रमत नव्हत… शरद सोबत असल्यावर तिला छान वाटायचं.. आपल्याला शरद जितका आवडतो त्यालाही मी आवडत असेन का..? असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते.. विचार करतच ती झोपून गेली..त्या रात्री मंजूला बराच वेळ झोप येत नव्हती.. सौम्याला नक्की काय झालं आहे ह्याचाच ती विचार करत बाल्कनीत बसली होती.. तीच लक्ष खाली गेल तेव्हा तिला शरद सारखा मुलगा जाताना दिसला.. लपून छपून तो कुठे तरी जात असावा असे तिला त्याच्या देह बोलीवरून वाटले.. पण एवढ्या लांबून तो नक्की शरदच आहे हे नक्की तिला कळत नव्हते.. तिने दुर्लक्ष केले आणि ती तिच्या खोलीत गेली. ऑफिसची बरीच कामं आहेत त्यामुळे मला गावी येता येणार नाही हे सौम्याने आई बाबांना सांगितले.. प्रत्येक महिन्यात खरच येणं शक्य नाही हे आई बाबा सुध्दा समजून होते.. त्यामुळे त्यांनीही जास्त प्रश्न विचारले नाहीत..आज नेहमी प्रमाणे सौम्या त्यांच्या ठरलेल्या जागेवर शरदची वाट पाहत उधी होती.. सौम्याला शरद भेटला नाही.. सौम्याला खुप बैचेन वाटू लागलं. तिने त्याला खुप कॉल्स केले. पण त्याचा नंबर बंद होता. काय करावे तिला सुचत नव्हते.. तिला घाम फुटू लागला. अंग सुन्न होऊ लागले.. तिने बॅगेतून चॉकलेट्सचा डब्बा काढला.. त्यात चॉकलेट्स उरले नव्हते.. आपण शरदची वाट बघतोय की चॉकलेट्सची हे तिचेच तिला कळलत नव्हते. ती तिथेच बसून होती.. दोन तासांनी शरद आला.. सौम्या धावत त्याच्या जवळ गेली..
त्याला मिठी मारली.. आणि अगदी रडवेली होऊन म्हणाली,” मला चॉकलेट्स दे.. लवकर दे..” शरद हसू लागला..”
तुला आता चॉकलेट्ससाठी किंमत मोजावी लागले..
..” काय आहे नक्की त्या चॉकलेट्स मध्ये..? तू काय देतोस मला ? “
तिने विचारले.शरद अजून हसू लागला.. “अग ही तर सुरुवात आहे.. आधी पैसे दे.. चॉकलेट्स घे.. तुला सांगतो मी सर्व..”
सौम्याला काही सुचेनासे झाले होते.. आता तिला फक्त ते चॉकलेट्स हवे होते . सौम्याने तिच्या जवळ असलेले सर्व पैसे शरदला दिले. शरद ने तिला चॉकलेट्स दिले.. तिने ते पटकन तोंडातून कोंबले.. दुसऱ्या क्षणी तिला ही जाणीव सुध्दा झाली की तिच्या सोबत काहीतरी चुकीचं घडले आहे.. ती confused State मध्ये होती.. शरदचा जीव घ्यावासा वाटत होता.. त्याच वेळेला त्याचा आधार पण हवाहवासा वाटत होता..
शरद तिला म्हणाला,” दोन दिवसात २ लाख रुपये हवे आहेत मला.. कसेही करून घेऊन ये.. इतके दिवस तुला फुकटात चॉकलेट्स खाऊ दिलं .. आता त्याची किंमत दे..”
सौम्याने त्या बिथरलेल्या अवस्थेत त्याची कॉलर पकडली… “तू काय केलं आहेस माझ्यासोबत… सांग मला…”
शरद म्हणाला, “अग मला वाटल एव्हाना कळलं असेल तुला.. मी ड्रग्स देत होतो तुला.. हेच तर काम करतो मी.. आधी तुझ्यासारख्या लोकांना स्वतःच्या जाळ्यात ओढतो.. मैत्री करतो.. हळू हळू त्यांना काही पदार्थांतून ड्रग्स देतो.. ते जेव्हा त्या ड्रग्सच्या आहारी जातात तेव्हा त्याच्यांकडून पैसा गोळा करतो.. आणि तुला माझ्या जाळ्यात ओढण तर खुप सोप्प होत.. त्या दिवशी लिफ्ट मध्ये तू ज्या प्रकारे चोरून माझ्याकडे पाहत होतीस. त्यावरून मला आधीच कळलं तू माझ्यावर फिदा झाली आहेस.. मग काय तुझी माहिती गोळा केली.. खुप श्रीमंत आहेस ग तू.. खुप पैसा आहे बापाकडे तुझ्या… थोडा आमच्या सारख्या गरिबांना दान कर… ”
सौम्याने शरदच्या कानाखाली वाजवली.. शरद त्यावरही हसू लागला.. “तू आता कितीही प्रयत्न कर तुझी यातून सुटका नाही.. तुला मला पैसे द्यावेच लागतील..आणि शिवाय तू या ड्रग्स शिवाय आता जगू शकत नाहीस.. आणि हो जर पोलिसात तक्रार केलीस तर एवढं लक्षात ठेव माझे contact’s खुप मोठे आहेत.. मी सुटेन पण बदनामी तुझी आणि तुझ्या घरची होईल.. आणि या ड्रग्स शिवाय तुला तडपडताना पाहून तुझी आई बाबा जीव देतील.. शेवटी लाडाची लेक ना… ” असे म्हणून तो भेसूर हसू लागला.. “जेव्हा पैसे आणशील तेव्हाच ये.. असे म्हणून तो तिथून निघाला
. काय करावे सौम्याला सुचत नव्हते.. शरदने तिला त्या ड्रग्सची कशी चटक लावली..आपण एखाद्या गोष्टीच्या अधीन जातोय हे तिला कसे लक्षात आले नाही. इतके मूर्ख आहोत का आपण.. स्वतः ला ती कोसात होती.. ती बधीर झाली होती.. जे आहे ते तसेच सुरू ठेवायचे असा विचार करून तिने तिच्या जवळ असलेले २ लाख दुसऱ्या दिवशी शरदला दिले.. तिला आता त्या ड्रग्स शिवाय जमत नव्हते.. तिला त्याची गरज होती.. पण शरद आता तिला पैसे दिल्याशिवाय ते देणार नव्हता.. तिने त्याला अजून ५०००० दिले.. त्या नंतर त्याने तिला दोन पुढ्या दिल्या.. कसे घाय्याचे ते शिकवले.. यात चॉकलेट्स पेक्षा जास्त मज्जा आहे सांगितलं.. सौम्या आता पूर्ण पने ड्रग्सच्याआहारी गेली होती.. कामात लक्ष नव्हत.. चिडचीड झाली होती.. स्वतच्या खोलीत एकट राहणं पसंत करत होती. मॉर्निग वॉक, योगा सार तिने बंद केलं होत. तिच्यात या महिना भरात झालेले बदल मंजूच्या लक्षात येत होते. पण सौम्याला काही विचारायची सोय नव्हती.. काही विचारलंच तर मी मारक्या म्हशी सारखी अंगावर धावून येई. सर्व प्रकार सविस्तर कळल्या शिवाय सौम्याच्या आई बाबांना सुध्दा सांगणं कठीण होत..
मंजूनेच या प्रकरणाचा छडा लावायचा ठरवले. सौम्या तिच्या खोलीत काही तरी शोधत असल्याचा मंजूने पाहिले..
मंजूने विचारले असता.. “मला आताच्या आता ५०००० हवे आहेत”, असे ती खेकसून मंजूला म्हणाली..,
” अहो ताई इतक्या लाखोने कमावता बँकेत असतील ना पैसे ते काढा..”
मंजू च suggestion ऐकून सौम्या अजून वैतागली.”. तू काही कामाची नाहीस”, म्हणून निघून गेली..
तिच्या account मधले सर्व पैसे तिने शरदला आधीच दिले होते हे ती कुठल्या तोंडाने तिला सांगणार होती.. आई बाबांकडून सतत पैसे मागणे शक्य नव्हते त्यांनी प्रश्न विचारून हैराण केले असते.सौम्याच्या पाठोपाठ मंजू सुध्दा निघाली. ती सौम्याचा पाठलाग करू लागली.सौम्या एका दागिन्यांच्या दुकानात गेली.. थोड्या वेळात तिथून बाहेर आली.. ती तिथे का गेली , हे काही मंजुला कळले नाही.. मंजू सौम्याच्या परत पाठी गेली. सौम्या थोड्या वेळात शरदला भेटली. सौम्याने त्याला पैशाचं बंडल दिलं.. बदल्यात त्याने एक छोटा बॉक्स सौम्याला दिला .. हे नक्की काय सुरू आहे हे मंजुला काळात नव्हते.. पण या मुलात काहीतरी गडबड आहे , याने सौम्या सोबत काहीतरी चुकीचं केलं आहे एवढं तिला कळात होत.. मंजूने क्षणाचाही विलंब न लावता कौशल्या बाईना फोन लावून सर्व प्रकार सांगितला.. तुम्ही लगेच इथे निघून या हे सांगितले.. गावावरून यायला त्यांना ८ ते दहा तास तरी लागणार होते..मंजू घरी गेली.. सौम्या तिच्या आधीच घरी पोहोचली होती. ती washroom मध्ये होती.. संधी साधून मंजू सौम्याची बॅग तपासू लागली. तिला तो बॉक्स मिळाला जो शरदने सौम्यला दिला होता. मंजूने उघडला तर त्यात चार पुड्या होता.. मंजू ते उघडत असतानाच सौम्या तिथे आली..
मंजूच्या हातात पुड्या पाहून सौम्या मोठ्याने ओरडली.. “मंजू ते दे इथे.. नको तो आगाऊपणा कोणी करायला सांगितला तुला.”
मंजू म्हणाली..,” सौम्या ताई हे सर्व काय आहे मला नीट नाही कळात .. पण काहीतरी गडबड नक्की आहे.. तुम्ही काही तरी लपवत आहात. तो शरद चांगला मुलगा नाही आहे.. आज मी पाठलाग केला तुमचा.. असो ते काहीही असले… मी आई बाबांना बोलावल आहे इथे ते येतीलच काही वेळात..”
सौम्या चिडली.. “तुला कोणी सांगितलं हे करायला..” इथे तिथे सैरावैरा पळू लागली.. वस्तू फेकू लागली..” मी काय तोंड दाखवू त्यांना.. मी अपराधी आहे म्हणू लागली.. मंजू तू त्यांना बोलवायला नको होत… ” अस म्हणत मोठमोठ्याने हुंदके देत रडू लागली..
मंजू तीच हे रूप पाहून घाबरली.. ती सौम्या नव्हतीच असे तिला वाटू लागले.. तिला कसे सांभाळायचे या विचारात असतानाच सौम्या धावत तिच्या खोलीत गेली.. आणि खोलीचे दार आतून बंद केले.. मंजू दार ठोकवू लागली. पण सौम्या ऐकायला तयार नव्हती.. सौम्या स्वतः च काहीतरी करून घेईल अशी भीती तिला वाटू लागली.. तिने भाऊसाहेबांना फोन केला.. त्यांनी पोलिसांना फोन केला.. काही वेळात पोलीस आले.. त्यांनी सौम्याच्या खोलीचे दार तोडले.. सौम्याने हाताची शीर कापुन घेतली होती.. खुप रक्तस्त्राव झाला होता. तिला ताबडतोप हॉस्पीटल मध्ये नेण्यात आले. तिची घराची मंडळी सुध्दा हॉस्पिटल मध्ये पोहोचली.. डॉक्टरांनी सौम्याला वाचवले होते.. पण ती शुद्धीवर आली नव्हती. मंजूचा जबाब नोंदवून घेण्यात आला. सौम्याच्या रक्तात अमली पदार्थांचे प्रमाण आढळल्याचे डॉक्टर्सनी सांगितल्यावर तिच्या घराच्यांच्या पायाखालची जमीन सरकली.. ती आता जरी वाचली असली तरी तिला पूर्ण पणे बर होण्यासाठी बराच कालावधी लागेल, तिला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे लागेल, शारीरिक व्याधीसोबतच मानसिक व्याधी कडेही लक्ष द्यावे लागेल हे डॉक्टर्सनी सौम्याच्या घरच्यांना समजावले.. ती शुध्दी वर आल्यावर का कशासाठी असे प्रश्न न विचारता तुम्ही तिच्या सोबत आहात.. जे झाला त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तुम्ही तिला मदत कराल हे आश्वासन तुम्ही तिला द्या हेही डॉक्टर्स नी तिच्या घरच्यांना समजावले.
१२ तासानंतर सौम्या शुद्धीवर आली..आई बाबा तिला भेटायला आत गेले असता तिने तोंड फिरवले.. आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला..
बाबा तिच्या जवळ जाऊन बसले.. आणि म्हणाले..,” बाळा आम्ही आहोत तुझ्यासोबत.. तू स्वतः ला एकट समजू नकोस. तुला जेव्हा योग्य वाटेल ,सांगावस वाटेल तेव्हा तु बोल आमच्याशी. पण स्वतःला त्रास करून घेऊ नको… “
इथे पोलिसांनी त्यांचे काम सुरू केले. शरद फरार झाला होता. पोलिसांच्या तपासात पुढे आले की त्याचे नाव शरद नव्हतेच मुळी. वेग वेगळ्या ठिकाणी असेच नाव बदलून तो राहत असे. लोकांना ड्रग्स च्या जाळ्यात ओढणे. त्यांच्याकडून पैसे वसूल करणे, जे पैसे देऊ शकत नाहीत त्यांच्या कडून नको नको ती काम करून घेणे हेच त्याचे काम होते. तो फक्त एक प्यादा होता.. कोणाच्यातरी ऑर्डर्सवर चालणारा.. पोलीस या वेळी तरी त्याला पकडायला असमर्थ ठरले असले तरी लवकरच त्याला पकडून शिक्षा देऊ ही हमी त्यांनी सौम्या आणि तिच्या कुटुंबाला दिली.सौम्याला आठवड्या भरात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.. आता वेळ होती व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्याची.. चार महिने ती तिथे राहिली. या सर्वात तिला बराच त्रास झाला. पण यातून बाहेर यायचे हे तिने मनाशी पक्के केले होते.. ती घरी आली.. पण आता ती पूर्वीची सौम्या राहिली नव्हती. अबोल, कुठे तरी हरवलेली… घरात सर्वांनी खुप नॉर्मल वागायचे ठरविले होते. कोणीही झालेल्या गोष्टी बद्दल बोलणार नव्हते.. सौम्याला पाहून तिचे आई बाबा आतून तुटत होते.. पण आता लेकीसाठी त्यांना खंबीर राहावं लागणार होत. तिच्या साठी घरातल्या प्रत्येकाची धडपड तिला दिसत होती..
एके रात्री सौम्या आई बाबांच्या खोलीत गेली.. आज तिने मनात दाबून ठेवलेल्या भावनांना बांध फुटला.. “आई बाबा मला खरंच माफ करा.. काही तरी वेगळं करून दाखवायच्या नादात मी हे काय करून बसले. सगळं होत्याच नव्हत झालं. तुमची प्रतिष्ठा पणाला लावली. मला माहित आहे गावात खुप कुजबुज सुरु आहे. लोक पाठून बरच काही बोलतात. ह्या सर्व प्रकरणाबद्दल तुम्ही मला एकदाही जाब विचारला नाही. मी मुद्दामून नाही केलं हे. मी त्याच्या दिसण्यावर, गोड बोलण्यावर, चांगल्या वागण्यावर भाळले.. विश्वास टाकला. मंजू जेव्हा गावी आली होती तेव्हा मी एकटीच होते.. त्याने मला गिफ्ट म्हणून स्पेशल chocolates दिले. त्यात मला काही गैर वाटले नाही.. काहीतरी वेगळे होते ते. तो रोज काही ना काही देऊ लागला. सर्व खाण्याचे पदार्थ असायचे.मला एकदाही संशय आला नाही. मला वेगळं वाटत होत.. पण कशामुळे हे लक्षातही आल नाही. चॉकलेट तर नेहमी माझ्या सोबत असायचे. मी किती खाते आहे काय करते आहे ह्याचा मला पण थांगपत्ता लागला नाही… जेव्हा मी या सर्वांच्या अधीन गेले, तेव्हा त्याने त्याचे खरे रूप दाखवले. मला धमकावले. पैशाची मागणी करू लागला. मी घाबरले होते. आणि खर सांगू तर मला त्या गोष्टी शिवाय जगणं जमत नव्हत. कळात होत मी चुकते आहे पण तरी चुका करत होते.. बाबा मी खुप पैसे दिले त्याला.. शेवटी पैसे अपुरे पडले तेव्हा तुम्ही दिलेले ब्रेसलेट विकल. तेव्हाच मंजू माझ्या पाठी आली होती. मंजू नसती तर माहित नाही हे अस अजून किती काळ चाललं असत. किती वेळ मी त्याला पैसे पुरवले असते.. अजून किती त्या ड्रग्सच्या आहारी गेले असते. पैसे संपल्यावर त्याने माझ्या कडून काय करवून घेतलं असत… आई बाबा माझी योग्यता नाही आहे तुमची मुलगी म्हणून घ्यायची. .. “
कौशल्या बाईंनी तिला मध्येच अडवल.,” बस झाला बाळा.. खरतर आम्ही वाट बघत होतो.. तू कधी स्वतः हून तुझ मन मोकळं करशील.. जे झालं ते अत्यंत वाईट होत. त्यात तुझी मुळीच चूक नव्हती असे नाही म्हणणार आम्ही.. कारण तू एका अनोळखी व्यक्ती वर इतका विश्वास टाकला.. त्याच्या बद्दल तुला एकदाही आम्हाला सांगावस वाटल नाही. पण जे झालं ते झालं.. तू सुखरूप त्यातून बाहेर आलीस या हुन अधिक आम्हाला काय हवं आहे. आणि राहील लोकांचं तर ते आज बोलतील आणि उद्या विसरून जातील. त्यामुळे तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस. तू तेव्हाही आमची गुणी लेक होतीस आणि आजही आहेस.. “
भाऊसाहेब बोलू लागले..,” आई बरोबर बोलते आहे तुझी. आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतला आहे. त्यात तुझी साथ हवी आहे. “सौम्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिले, “तू पुन्हा मुंबईला जायचं.. नोकरी करायची.. आम्हाला आमची बोलकी, स्वतंत्र अस्तित्व असलेली, जबाबदारीने वागणारी लेक परत हवी आहे. “
सौम्या म्हणाली,” बाबा दुसरं काहीही मागा.. पण हे नको.. माझा कॉन्फिडन्स गेला आहे.मी आता आयुष्यात काहीच करू शकणार नाही..
” बाबा म्हणाले..,”तोच कॉन्फिडन्स परत आणायचा आहे बाळा. तुझ्यात आजही ती धमक आहे. तू करू शकतेस.. हे बघ आयुष्य हे असच असत. कितीतरी वादळ येतात जातात.. वादळ शमल्यावर माणसाला त्यातून मार्ग काढावा लागतो. तुला अस हरलेल, विखुरलेले आम्ही नाही बघू शकत. आणि आम्ही आहोतच ना सोबत. जे झालं त्यातून धडा घेऊन आपण सर्वच पुढे जाऊया.. ”
सौम्याला त्यांचं म्हणणं पटत होत पण मनाची तयारी होत नव्हती.. तिने तिचा थोड वेळ घेतला.. मग हळूहळू नोकरी साठी परत तिने प्रयत्न सुरू केले.. ती पुन्हा मुंबईला गेली.. सर्व गोष्टींची तिने नव्याने सुरुवात केली. साधारण वर्षभरानंतर पोलिसांना शरदला पकडण्यात यश आले. आपले दैव बलवत्तर म्हणून सर्वातून आपण सुखरूप बाहेर आलो, जे या मोह जाळत अडकले त्यांचं पुढे काय होत असेल.. त्यांना यातून बाहेर पडायचा मार्ग मिळत असेल का..? अशा अनेक प्रश्नांनी ती अस्वस्थ होत असे .. अखेर तिने एक एनजीओ जॉईन केला जिथे ती तरुणाई मध्ये ड्रग्स, त्याचे परिणाम याबद्दल जनजागृती मोहिमेत सहभागी झाली..
……………………………………………………………………………………………….END…………………………………………………………………………………………………………
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


