वाघाची गोष्ट
वाघ,वाघीण आणि तीन बछड्यांसोबत चुकून मानवी वस्तीत शिरला.एकच गोंधळ माजला.लोकांनी त्यांच्यावर मिळेल त्याने वार करायला सुरुवात केली.वाघीण जखमी झाली.ते पाचही जण कसेबसे वस्तीतून बाहेर पडले.वाघिणीला रक्तबंबाळ झालेले पाहून बछडे रडू लागले.
रडत वाघाला म्हणाले, ” बाबा माणूस कसा कुटुंबासाठी घर बांधतो.तुम्ही आमच्यासाठी घर का नाही बांधलं?आज आपलं घर असतं तर आपण भटकलो नसतो.आईला त्रास झाला नसता.”
वाघ बछड्यांना म्हणाला, ” कोणे एकेकाळी एक आटपाट नगर होतं.त्याच्यापासून खुप दुर मोठ जंगल होत.त्या जंगलात आपलं घर होतं.सर्व मजेत राहत होतो.पण नगरात राहणाऱ्या माणसाने नगराची प्रगती करण्याच्या नावाखाली जंगलात शिरकाव केला. झाडे तोडली,आपलं घर नष्ट केलं.म्हणून आपल्यावर ही वेळ आली आहे.माणसापुढे आम्ही हतबल झालो.” हे ऐकून बछडे अजून धास्तवून गेले.
**********
पुनर्विवाह
कोणे एकेकाळी एक आटपाट नगर होतं.तिथे एक म्हातारी आणि तिचा मुलगा राहत होते.दोघांचाही एकमेकांवर जीव होता.म्हातारीने खुप कष्ट करून मुलाला मोठे केले,शिकवले आणि मग त्याचे लग्नही लावून दिले.सूनसुध्दा सुस्वभावी,गुणी होती.ते सर्व गुण्यागोविंदाने नांदत होते.पण त्यांच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली.
वर्षभरातच म्हातारीच्या लेकाचे अल्पशा आजाराने निधन झाले.लेकाच्या जाण्यापेक्षा ऐन तारुण्यात सुनेला विधवा म्हणून जगावं लागेल या विचाराने म्हातारी त्रस्त झाली.मुलगा तर गेला पण सुनेला लेक मानून तिचे कन्यादान करायचे तिने ठरविले.सुनेच्या पुनर्विवाहाचा तिने विडाच उचलला.उचित स्थळ पाहून लग्नही लावून दिले.हे सर्व करताना तिला बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या.या सर्व गोष्टींची जाणीव सुनेला होती.
**********
मेहनतीचे महत्त्व
कोणे एके काळी एक आटपाट नगर होते. तिथे राहायचे राम आणि शाम. दोघेही अभ्यासात हुशार. सर्वांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. शामच्या पालकांनी तो जे जे मागेल ते त्याला नेहमीच आणून दिले. मग ते त्यांच्या आवाक्या बाहेरच असल तरी. त्याच्या प्रत्येक चुकांवर पांघरून घातलं. शालेय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी घोकंपट्टी करून घेऊ लागले.
या उलट रामच्या पालकांनी नेहमीच त्याला त्यांच्या परिस्थितीनुरूप वागायला शिकवलं. तो कधी चुकला तर त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहेनती शिवाय दुसरा पर्याय नाही हे त्याच्या मनावर कोरल. दोघेही मोठे झाले. रामने आयुष्यात खूप प्रगती केली पण शाम मात्र जीवनाच्या परीक्षेत अयशस्वी झाला. त्याने याचे खापर पालकांवर फोडले. शामच्या पालकांना त्यांची चूक उमगली पण तो पर्यंत खुप उशीर झाला होता.
**********
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


