Home » Marathi » Stories » एक शोकांतिका.. भाग १

एक शोकांतिका.. भाग १

शालिनी ताई बागेतून अगदी लगबगीने घरी आल्या. आल्या त्याच दामोदर अण्णांना शोधू लागल्या. अण्णा अंगणात रोपांना पाणी घालत होते. ताईंनी त्यांना हाक मारली. ” अहो ऐकलंत का.. कुठे आहात?”

अण्णांनी अंगणातून आवाज दिला, ” अग इथे अंगणात ये, रोपांना पाणी घालतोय..”

शालिनी ताई अगदी धावतच त्यांच्यापाशी गेल्या.अण्णा म्हणाले, ” शालू अग काय झालं.. एवढी धापा टाकत का आलीस? आणि आज लवकर आलीस बागेतून… काही त्रास होतोय का?”

ताई म्हणाल्या,” अहो नाही हो.. मी काय म्हणते.. अबोलीचा फोन आला होता का?.. “

अण्णा म्हणाले,” नाही .. थोड्या वेळाने लावून पाहू..”

ताई म्हणाल्या,” थोड्या वेळाने नको हो.. आताच लावुया.”

अण्णा म्हणाले,” अग हो.. पण नक्की झालं काय ते तरी सांगशील का? “

ताई म्हणाल्या,” आज बागेत जोशी आजी भेटल्या होत्या , त्या सांगत होत्या की, ती संगीता आहे ना.. पवारांची..ती माहेरी परत आली आहे नवऱ्याला सोडून.. सासरचे खुप त्रास द्यायचे हो पोरीला.. नवरा मारायचा. जेवण द्यायचे नाहीत दोन दोन दिवस.. अहो डिप्रेशन मध्ये गेली ना पोर. तिच्या सासरच्या गावातल्या कोणीतरी पवारांना सांगितली तिची अवस्था.. आधी त्यांचा विश्वास बसेना.. शेवटी स्वतः च जाऊन शहानिशा केली.. खुप वाईट अवस्थेत होती संगीता.. घेऊन आले ते तिला परत इथे.. खुप वादविवाद सुरू आहेत आता… “

अण्णा म्हणाले , ” अग पण त्याचा अबोलीशी काय संबंध?.”

ताई म्हणाल्या,” अहो अस काय करताय…? महिना व्हायला येईल आता.. लेकीशी बोलणं झालं नाही आपलं.. तिचा फोन नेहमी बंद असतो. जावई बापूंना फोन केला तर म्हणतात तिला सांगतो फोन करायला .. पण तिचा फोन काही येत नाही.. मला थोडी भीती वाटते.. आपण अस करूया का.. आपण जाऊनच येऊया ना तिच्या घरी… खुप महिने झाले पाहिलं नाहीये पोरीला..”

अण्णा म्हणाले,” शालू अगं एवढ्या मोठ्या घरची सून आहे ती. तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का… आणि एवढी चांगली माणसं.. ते काय करणार आहेत तिला.. या तीन वर्षात तिने कधी काही तक्रार तरी केली आहे का? आणि ती म्हणाली होती ना आता लवकरच ती ऑफिस सुध्दा जॉईन करणार होती त्यांचं.. त्यात व्यस्त असेल गं ती.. तू नको काळजी करू. अग सुखात नांदत आहे ती तिथे म्हणूनच तिला आपली आठवण येत नसेल.. आणि चांगलच आहे ना हे. आपली लेक सुखी आहे. रमली आहे संसारात याहून आई बापाला काय हवं असत.. फुला सारख जपतात ते तिला.. तू पाहिलं नाहीस का तिला जेव्हा पण आपण तिला भेटायला गेलो आहोत तेव्हा अगदी दागिन्यांनी मढलेली असायची ती…संगीता सोबत वाईट झालं.. पण अबोली सोबत अस काही होऊच शकत नाही…”

ताई म्हणाल्या,” तुमचं सर्व म्हणणं मान्य.. पण एकदा भेटून तर येऊया तिला..”

अण्णा म्हणाले,” तुला सुध्दा माहित आहे.. तिच्या घरी जायचं म्हणजे…..”

अण्णांना समोरून अमृता येताना दिसली.. आणि ते बोलता बोलता थांबले..

अमृता ताईंना म्हणाली,” आई अण्णा चला लवकर नाश्ता करूया.. मला कॉलेजला जायला उशीर होईल नाहीतर..”

शालिनी ताई आणि दामोदर अण्णा आपापल्या जागेवरून उठले.. त्यांच्या चेहेऱ्यावरच टेन्शन अमृताच्या नजरेने हेरल होत.. तिने अगदी खोदून खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केली..

तेव्हा शालिनी ताई म्हणाल्या,” अग अबोलीशी एक महिना झाला काहीच संपर्क होऊ शकला नाही.. त्यामुळे जरा काळजी वाटते आहे..”

अमृता म्हणाली,” अगं आई मी आजच तुला बोलणार होते हे.. ताई फोन उचलत नाही आहे.. आणि बरेचदा तर तिचा फोनेच बंद असतो.. तुमचा काही काँटॅक्ट झाला का तेच विचारणार होते मी तुला.. “

ताई म्हणाल्या,,” नाही गं.. कळत नाही आहे काय करायचं ते.”

अमृता म्हणाली,” त्यात न कळण्या सारखं काय आहे.. आपण जाऊया तिच्याकडे तिला भेटायला.”

अण्णा म्हणाले,” गप्प बसा तुम्ही माय लेकी.. अस जाणं बर दिसत नाही तिथे.. ती तिच्या संसाराच्या व्यापात आहे.. मजेत आहे. ती ऑफिस सुध्दा जॉईन करणार होती.. घर ऑफिस या जबाबदाऱ्या पेलताना तिला जमत नसेल आपल्याला फोन करायला..”

अमृता म्हणाली,” पण हे बरोबर नाही ना अण्णा.. इथे आपण किती आठवण काढतो तिची.. आणि असं ही ताई लग्नानंतर इथे राहायला फक्त एकदाच आली आहे या तीन वर्षात. तुम्हाला हे थोड विचित्र नाही का वाटत..?

अण्णा पटकन म्हणाले,” काही विचित्र नाही आहे.. तूच जरा विचित्र आहेस..”

अमृता म्हणाली,” बर अण्णा.. तुम्ही म्हणत असाल तर तसच.. पण उद्या आपण जातोय ताई कडे.. दोन दिवसांनी मला बघायला मुलाकडचे येणार आहेत तेव्हा मला ती हवी आहे माझ्यासोबत.. मी तिला घेऊन येणार आहे.. आई तू तयारीला लाग. उद्या मी सुट्टी घेते. आपण सकाळच्या एसटी ने जाऊ ताईकडे.” एवढं बोलून अमृता कॉलेज ला निघून गेली.

.तर हे असे सावंत कुटुंब.. दामोदर सावंत पंचक्रोशीत दामोदर अण्णा म्हणूनच प्रसिद्ध होते. आणि शालिनी सावंत या त्यांच्या पत्नीला सर्व शालिनी ताईच म्हणायचे.. त्यांच्या दोन लेकी.. मोठी अबोली, तर धाकटी अमृता.. अण्णांनी मुलींना अगदी प्रेमाने वाढवले.. योग्य ते आणि त्यांना हवं ते शिक्षण दिले..घराची परिस्थिती तशी साधारण. खुप श्रीमती नाही आणि गरीबिही नाही. आयुष्यात जे काही कमवलं ते सार मुलींसाठी साठवून ठेवलं.. अबोलीसाठी देवधर कुटुंबासारख्या मोठ्या घरंदाज कुटुंबाचं मागणं आलं तेव्हा अण्णांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता होकार देऊन अबोलीच लग्न लावून दिलं.. खरतर अबोलीला तेव्हा लग्न करायची ईच्छा नव्हती.. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करावी थोडेफार पैसे कमावून आईबाबांना मदत करावी असे तिला वाटत होते.. पण मुलींचे चांगल्या घरात लग्न लावून देणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानून जगणाऱ्या अण्णांना देवधरांच स्थळ हातचं सोडायचं नव्हत.. त्या साठी ते काहीही करायला तयार होते.. अबोलीच लग्न अगदी थाटामाटात झाल.. देवधरांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झाल. लग्नानंतर अबोली एकदाच माहेरपणाला आली होती.. त्यानंतर ती कधी माहेरी आलीच नाही.. अधूनमधून सावंत कुटुंब तिला भेटायला जात असत.. भरजरी साड्या, दागिने, हाताखाली नोकर..अगदी रुबाबात दिसणाऱ्या आणि राहणाऱ्या आपल्या लेकीला पाहून ते सुखावत असतं.. फोन वर कधीतरी बोलण होत असे.. ती माहेरी येत नाही ही खंत तर होती त्यांना.. पण ती तिच्या संसारात रमली आहे याचा आनंदही होता..आपण जे देऊ शकलो नाही ते सार वैभव तिला मिळालं याच त्यांना समाधान होत.. आता धाकट्या लेकीसाठी म्हणजेच अमृता साठी सुध्दा असच एक श्रीमंत स्थळ सांगून आल होत. मुलगा दुबई मध्ये रहाणार होता.. दामोदर अण्णांना तर आता कधी हे लग्न होतंय अस झालं होतं. अमृता हल्लीच तीच शिक्षण पूर्ण करून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेज मध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली होती… लग्न करेन पण मुलाला जाणून घेऊन हे तीच आधीच ठरलं होत.. असे हे सावंत कुटुंब उद्या त्यांच्या लेकीला म्हणजे अबोलीला भेटायला जाणार होते.नक्की काय सुरू होत अबोलीच्या आयुष्यात..? खरच ती सुखी होती का..? सावंत कुटुंबा समोर आता काय येणार होत..? पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरूर वाचा..

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *