रेवा टेस्ट करून शांतपणे बाहेर आली. समर अगदी आनंदाने तिच्या जवळ गेला.
” रेवा काय झालं…? Positive की…? , समर म्हणाला..
रेवा काही बोललीच नाही.. तोंड पाडून त्याच्यासमोर उभी राहिली..
तिला तस पाहून समर म्हणाला, ” अग ठीक आहे.. मनाला लावून घेऊ नकोस.. चल आवरा आवर कर.. ऑफिसला निघायचं आहे आपल्या दोघांनाही..”
असे बोलून समर त्याचं कपाट उघडून कपडे शोधू लागला..
तो पाठमोरा असतानाच रेवाने त्याला मिठी मारली. आणि तसच त्याचा हात पकडून त्याच्या हातात टेस्ट कीट ठेवलं.
“अग हे काय.. ह्या दोन गुलाबी रेषा.. म्हणजे… म्हणजे.. तू…” समर गोंधळून म्हणाला..
” हो.. म्हणजे… म्हणजे…मी प्रेग्नंट आहे…” रेवा म्हणाली.
समरच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघेही खूप खुश झाले.
” आपण लगेच आई बाबांना ही बातमी देऊया..” समर म्हणाला.
” अरे थांब… आधी डॉक्टरकडे जाऊन येऊ. कन्फर्म करू मग घरच्यांना सांगू.” रेवा म्हणाली.
” हो बरोबर आहे.. एक काम करू, ऑफिस नंतर तसेच जाऊ डॉक्टरकडे” समर म्हणाला..
दोघेही आनंदात घराबाहेर पडले. खूप खुश होते दोघे आज. कामात त्यांचं लक्ष लागत नव्हत. बस आता कधी संध्याकाळ होते आणि कधी डॉक्टरकडे जाऊन एकदा खात्री करून घेतो असे झाले होते त्यांना.
संध्याकाळ झाली. दोघेही डॉक्टरकडे गेले.डॉक्टरानी आनंदाची बातमी आता कन्फर्म केली.
” डॉक्टर म्हणजे आम्ही आता सर्वांना सांगू शकतो ना…? ” रेवाने विचारले.
” हो सांगा ना.. बातमी पक्की आहे. तुम्ही आई बाबा होणार आहात.. फक्त एक काळजी घ्या. पहिले तीन महिने फक्त घरच्या जवळच्या माणसांनाच सांगा.. बघा वाईट वाटून घेऊ नका. पहिले काही महिने परिस्थिती खूप नाजूक असते. काहीही होऊ शकत. अस होऊ नये याची आपण काळजी घेतोच. पण तरी.. जर काही अघटीत घडले तर मग अशा वेळी जेव्हा खूप लोकांना माहीत असलं की त्यांना सांगणं , त्यांना फेस करणं कठीण होत. लोकांची सिम्मपती आपल्याला नकोशी वाटते. त्यामुळे हल्ली आम्ही कपल्सला आमच्या बाजूने ही सूचना देतो. बाकी निर्णय तुमचा आहे..” डॉक्टर म्हणाल्या.
“आम्हाला कळत आहे डॉक्टर. आणि तुमचं बोलणही योग्य आहे.. आम्ही तसच करू.” समर म्हणाला.
क्लिनिक बाहेर पडताच त्याने लगेच आईला फोन लावला. ” “आई अग आज आम्ही येतोय.. आणि जेवण बाहेरून घेऊन येतोय. ” समर म्हणाला.
” अरे काय रे.. येताय ठीक आहे.. पण बाहेरून जेवण…? काय खास आहे आज..? ” आईने पलीकडून विचारले.
” आहे काही खास.. भेटून सांगतो..” समर म्हणाला.
दोघेही समरच्या आई बाबांच्या घरी पोहोचले. अगदी दोन बिल्डिंग सोडूनच त्यांचं घर. अर्थात समरच घर. लग्नापर्यंत समर तिथे आई बाबांसोबत राहत होता. Investment म्हणून समरने दोन बिल्डिंग सोडून घर घेतलं होत. त्यासाठी समरची आईच त्याच्या पाठी लागली होती. समरच लग्न झालं की त्याने तिथे शिफ्ट व्हावं हे तिचं स्पष्ट मत. अगदी जवळ नाही. अगदी लांब नाही. संसारात ढवळा ढवळ नाही. वीकेंडला समर आणि रेवा आई बाबांकडेच असायचे. काही कधी अडलं तर आई बाबा जवळ होतेच. तसेच समर आणि रेवाला त्यांचं स्वतंत्र ही होतच. सगळं अगदी छान, पिक्चर परफेक्ट होत.
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. सर्व जेवायला बसल्यावर समरने आनंदाची बातमी सांगितली. समरच्या आई बाबांना आनंदाचा धक्काच बसला. दोघेही खूप खुश झाले.
” अरे या गोड बातमीची तर मी कल्पनाच केली नव्हती. मला वाटलं प्रमोशन मिळालं असेल..” समरची आई म्हणाली.
” अग मिळालंच ना प्रमोशन ते आई बाबा. आणि आपण आजी आजोबा..” आनंदाने समरचे बाबा आईला म्हणाले.
डॉक्टरकडे जाऊन आलात का.. डॉक्टर काय म्हणाले. आता कस पुढे manage करणार आहात. हवं तर इथेच शिफ्ट व्हा.. अशा काही गोष्टींवर त्यांची चर्चा झाली.
घरी परत आल्यावर रेवाने तिच्या घरी फोन केला. तिने तिच्या आई बाबांनाही बातमी सांगितली. बाबा प्रचंड खुश झाले. पण आईच्या आवाजात तो आनंद नव्हता. रेवाला ते लगेच जाणवले. रेवाने हे समरला सांगितले.
” काहीतरी झालं असेल त्यांचं. तू लगेच तर्क लावू नको. उद्या आईला वेळ काढून फोन कर. आणि आता झोप.. आता अगदी हेल्दी लाईफ जगायची आहे आपल्या दोघांनाही..” असे म्हणून समरने रेवाला जवळ घेतले.
दुसऱ्या दिवशी रेवाने आईला कॉल लावला..
” आई … अग काय झालं.. तू आजही अपसेट वाटते आहेस. बरं नाहीये का..? काल पण मी एवढी छान बातमी दिली तेव्हा तू मला खुश नाही वाटली.” रेवा म्हणाली.
” रेवा स्पष्ट सांगू तर मला हे पटलं नाही.. अग एवढी काय घाई होती. थांबायचं ना जरा.. करिअर ओरिएंटेड मुलगी तू. आता पुण्यात शिफ्ट झाली आहेस. नवीन ऑफिस, नवीन माणसं.. एवढ्या लवकर हे डिसिजन तू घेतलं हे मला नाही आवडलं.” रेवाची आई म्हणाली.
” अग आई.. आम्ही विचार करूनच हा निर्णय घेतला. बाळ होण्यासाठी सर्वात आधी आई आणि बाबा होण्याची आमची तयारी आहे का याची खात्री करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व बाजूंनी विचार केला आम्ही. आणि अगदी करिअरचाही विचार करूनच हा निर्णय घेतला आहे मी.” रेवा म्हणाली.
” तरीही मला नाही पटलं हे.. पण तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मी काय बोलू..” रेवा ची आई म्हणाली.
” आई मी फोन ठेवते. ” असे म्हणून रेवाने पटकन फोन कट केला.
रेवाला फार वाईट वाटल. आई अस का म्हणाली. काही कपलना खूप प्रयत्न करूनही मुल होत नाही. कधी कधी किती तरी काॅम्पलिकेशन्स पार करून आई बाबा होण्याचा आनंद लोकांना उपभोगत येतो , पण इथे तर सर्व सुरळीत आहे तरी आई हे अस का बोलते.. रेवा मनोमन खिन्न झाली. तिने झालेला प्रकार समरला सांगितला. समरला सुद्धा अशा रिअँक्शनची अपेक्षा नव्हती.
” अग पण ठीक आहे ना. मुलगी म्हणून त्यांना तुझा काळजी आहे. त्यामुळे असेल कदाचित.. ” असे म्हणून समरने रेवाची समजूत काढली.
( समर आणि रेवा यांनी लग्नाच्या काही महिन्यातच आई बाबा होण्याचा निर्णय घेतला. खरतर ही खूप साधी गोष्ट होती. पण तरीही त्यांच्या या निर्णयात सर्व खुश नव्हते.. त्याचं कारण दोघांनाही कळत नव्हते.. पुढे अजून काय होत हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..)
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.