अखेर जुईने अभिषेकच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. जुई आणि अभिषेक गेले चार वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. एका मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टी ला दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच अभिषेक तिच्यावर फिदा झाला. मग हळूहळू या ना त्या कारणाने तो मैत्रिणीच्या मदतीने जुईला भेटू लागला. तिला इंप्रेस करण्यासाठी वेग वेगळ्या युक्ती करू लागल्या. जुईला सुध्दा अभिषेकच वागणं कळत होत. तिच्यासाठी तो जे काही करत होता त्याची तिला गंमत वाटे. हळूहळू तिलाही तो आवडू लागला. दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आणि त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात झाली..
आता या प्रेमाचा पुढचा टप्पा होता लग्न… अभिषेक इंजिनिअर होता, एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता तर जुई बँकेत नोकरी करत होती. दोघांचेही कुटुंब सुशिक्षित आणि प्रगत विचाराचे होते. अगदीच लगेचच त्यांच्या नात्याला संमती मिळाली नाही.. पण खुप काळ विरोधही झाला नाही. चुणचुणीत,मोकळ्या , स्वतंत्र विचारांची, जुई अभिषेकच्या आई बाबांना आवडली. तर लाघवी, हुषार अभिषेक नेही जुईच्या आई बाबांवर आपली छाप पडली. जुईला लग्नानंतर तिच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या नात्यांचं दडपण आले होते. ती आधी शिक्षणासाठी हॉस्टेलला एकटी राहत होती नंतर नोकरी निम्मित पुण्यात एकटी राहायला लागली. आई बाबां सोबत सुध्दा ती फार कमी काळ राहिली होती. एकट राहण्याची, स्वतंत्र जगण्याची, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची तिला सवय झाली होती. तर इथे आई, बाबा, एक धाकटी बहीण, आजी, आजोबा असे अभिषेकचे कुटुंब होते. त्यामुळे लग्नानंतर आयुष्यात येणारी नवीन नाती, मोठं कुटुंब या सर्वामुळे लग्न या गोष्टीची तिला भिती वाटत होती. तिच्या काही मैत्रिणींकडून त्यांच्या सासऱ्याच्या जाचाचे किस्से ही तिने ऐकले होते. कुटुंब जेवढं मोठं तेवढ्या अडचणी जास्त असेच तिचे मत झाले होते. तिने अभिषेकला ही तिच्या मनात सुरू असलेल्या गोष्टींबद्दल सांगितले. लग्नानंतर आपण वेगळे राहूया का विचारले.
अभिषेकच यावर स्पष्ट मत होत. “तू निदान वर्षभर तरी माझ्या कुटुंबात राहून बघ. आणि असही लग्नानंतर ते आपलं कुटुंब असणार आहे. आई बाबांसाठी मी तशीच तू असणार आहेस. आणि माझे घरचे एवढे वाईटही नाही आहेत. जर तुला जमलच नाही तर राहू आपण वेगळे. तू बोलण्या आधीच माझी आई माझ्याजवळ हे बोलून झाली. तुम्हाला वेगळं राहायचं असेल तर तुम्ही खुशाल राहू शकता आमचा काही विरोध नाही अस ती स्पष्ट म्हणाली आहे मला.. पण मला अस वाटत आपण निदान वर्षभर तरी राहावं त्यांच्या सोबत. बघ माझ्यासाठी एवढं जमत असेल तर.. ”
यावर जुई पुढे काय बोलणार होती. जुई ने तिच्या मनातली घालमेल आईलाही बोलून दाखवली होती. “मला सासुरवास तर सहन करावा लागणार नाही ना मला भीती वाटते आहे”, जुई म्हणाली.
त्यावर आईने ही तिला हेच समजावले. ” हे बघ जुई प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हे वळण येतच आणि जोडीदार योग्य असेल तर हा प्रवास सुखकर होतोच. कुठलाही पूर्वग्रह मनात ठेऊन तू त्या घरात जाऊ नकोस. सासू सासरे हे जाचकच नसतात. प्रत्येकाची गोष्ट ही वेगळी असते. काय माहित वर्षभरा नंतर तुला ज्या सासुरवासची आता पासूनच भीती वाटते आहे ती भीती कायमची निघुन जाईल. आणि त्या सर्वांचा सहवास तुला हवाहवासा वाटेल.” अखेर घाबरतच जुई बोहल्यावर चढली.
जुई आणि अभिषेकचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. अगदी साग्रसंगीतपणे पूजा आणि इतर कार्यक्रम सुध्दा झाले. दोघे बालीला हनिमूनला जाऊन आले. हनिमून वरून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी अभिषेकला ऑफिस जॉईन करायचे होते तर जुई अजून चार दिवसांनी जॉईन करणार होती. अभिषेक त्याच्या ठरल्या वेळेत उठला. जुईला ही उठवले पण जुई काही उठेना. अभिषेक स्वतःचे सर्व आवरून तयार सुध्दा झाला. त्याने जुईला पुन्हा उठवायचा प्रयत्न केला पण तरी ती उठायला तयार नव्हती. तो त्याच्या खोलीतून बाहेर गेला.. सवयी प्रमाणे आईने त्याचा डब्बा तयार केला होता. आजी देवपूजा करत होती.बहिणीची कॉलेजची जायची तयारी सुरू होती. बाबा मॉर्निंग वॉक वरून नुकतेच आले होते. अभिषेकने नाश्ता केला. डब्बा घेऊन तो निघाला. जुईला सकाळी १० नंतर जाग आली. उठल्यावर तिने फोन पाहिला तर आईचे ५ आणि अभिषेकचे ३ मिस कॉल होते. तिने लगेच आईला फोन केला.. आई तिच्या फोनची वाटच पाहत होती. अगदी पहिल्या रिंग मध्येच आईने फोन उचलला. “हॅलो आई अग ५ मिस कॉल .. काय झालं?.. ”
जुईची आई थोड काळजीने म्हणाली, ” जुई तू आता उठली आहेस? “
जुई म्हणाली ,” हो का? काय झालं ? ”
आई वैतागली, ” अग काय हे.. लग्न झालं आता तुझं.. कसं कळत नाही तुला..जा आधी लवकर आवरून घे. आणि सासूबाईंना कामत मदत कर. .. ” आईने जुईचे ऐकून घेण्या आधीच फोन कट केला..
जुई उठली. स्वतःच सर्व आवरून बाहेर गेली. सासू आणि आजी सासू आपापल्या कामत मग्न होत्या. “ गुड माॅर्निंग आई आणि आजी. ” जुई म्हणाली.
” तुमच्या कडे मॉर्निंग थोडी उशिरा होते का..?” आजीने विचारलं.
जुई काही बोलली नाही. सासू बाई पटकन बोलल्या,” अहो आई , कालच बाहेगावाहून आले आहेत. थकली असेल ..” जुई कडे वळत त्या म्हणाल्या ,” नाश्ता करून घे.. आणि आवरलं की माझ्या खोलीत ये..” जूईने होकारार्थी मान हलवली.
जुईच्या मनात असंख्य प्रश्न सुरू झाले..” झालं.. हेच होणार होत.. तस पाहिलं तर घरात पहिलाच दिवस.. आणि आजींनी अशा शब्दात माझं स्वागत केलं.. आता आई काय बोलतील काय माहित.. “ तिच्या मनातल्या मनात बरेच काही सुरू होते..
ती नाश्ता करून सासूबाईंच्या खोलीत गेली.. ” आई आता येऊ का..? “
सासूबाई म्हणाल्या..,
“ मला सांगा ना काय काम करू मी आता.. “, जुई म्हणाली..
“अगं सर्व काम झालीत.. हे बघ जुई. आई जे म्हणाल्या त्याच वाईट वाटून घेऊ नकोस.. त्या थोड्या कडक शिस्तीच्या आहेत.. हे बघ प्रत्येक घराचे काही नियम असतात आणि ते तिथे राहत असलेल्या प्रत्येकाला पाळावे लागतात. तू नवीन आहेस. मी आहे तुला सर्व काही समजावून सांगायला. तुला जर काही पटत नसेल तर मला स्पष्ट सांगत जा.. मी ही तेच करेन. राहिलं कामाचं तर आपल्याकडे स्वयंपाकासाठी मदतनीस आहे. बाकीच्या कामासाठी सुध्दा बाई येते. त्यामुळे घरात विशेष अशी काही कामं नसतात.. घरातल्या बाईने पूर्णवेळ स्वयंपाक घरात राबणे सासूबाईंना कधीच पटलं नाही.. स्वयंपाक वैगरे सर्व आवरून आम्ही दोघी ही आपापल्या आवडीची काम करत असतो.. उगीच अंथरुणात उशिरा पर्यंत लोळत पडलेलं सासूबाईंना आवडत नाही तर तू तेवढं फक्त manage कर. बाकीच्या गोष्टींसाठी मी आहेच.. “
सासुच बोलणं ऐकून जुईला थोड बर वाटल.. उगीच आपण नको तो विचार करत होतो अस तिला वाटलं..
ती त्या घरात रुळु लागली.प्रत्येकाचं वेगळं टाइमटेबल आहे इथे तरीही सर्व एकमेकांसोबत जुळवून घेतात. हे सर्व करताना कोणीच कोणाच्या पर्सनल स्पेस मध्ये ढवळाढवळ करत नाहीत. सर्व एकत्र राहतात तरी स्वतंत्र आहेत. घरात व्रतवैकल्ये ही साग्रसंगीत पणे होत पण आजी त्यामागची कारणं , गोष्टी खूप प्रेमाने समजावून सांगत. घरातल्या प्रत्येक निर्णयात जुईला सुध्दा घेतले जाई.. अगदी स्वयंपाक काय करायचा यावरही सर्वच बसून डिस्कशन करत. बाजार हाठ आणण्यापासून ते कुठली भाजी , वस्तू कुठे कशी ठेवायची या प्रत्येक गोष्टी सासू आणि आजी समजावून सांगत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सूचना करत. कधी कधी त्या सूचना जुईला नकोशा वाटत. पण ती शांत पणे ऐकून घेई.. आजी सासू कडक शिस्तीच्या असल्या तरी जुन्या आणि नवीन गोष्टींचा समतोल राखून होत्या. नणंदेच्या रूपाने तिला एक लहान बहीण भेटली तर सासूच्या रुपात मैत्रीण… आजोबा आणि सासऱ्यांसोबत सुध्दा तिचे मैत्री पूर्ण नाते तयार झाले. तिला त्या घरात प्रत्येक गोष्ट पटतच होती असे नव्हते. पण तरीही तिला आता ते घर आवडू लागले होते.. त्या घरातली माणसं आवडू लागली होती.. हळूहळू ती त्यांच्या रंगात रंगू लागली होती..
जुई आणि अभिषेकच्या लग्नाला वर्ष झालं. छान सेलिब्रेशन झालं. पार्टी नंतर अभिषेक आणि जुई आपल्या खोलीत गेले. जुईने अभिषेकसाठी गिफ्ट म्हणून घेतलेलं त्याच्या आवडीचे परफ्यूम त्याला दिलं.. आणि त्याच्या समोर हात पुढे करत म्हणाली..” चल आता तू माझं गिफ्ट दे.. ”
अभिषेकने जुईच्या हाता किल्ल्या दिल्या.. जुई चमकली.. ?”
अभिषेक म्हणाला.. ,”अगं तुला म्हणालो होतो ना मी एक वर्ष फक्त राहून बघ माझ्या घरच्यांसोबत.. तू काहीही न बोलता माझ्या वरच्या प्रेमा खातर हे वर्ष माझ्या मनाप्रमाणे घरच्यांसोबत राहिलीस.. मला माहित आहे तुला इथे तुझे स्वतंत्र मिळत नाही. हवं ते करता येत नाही. लवकर उठव लागत.. एवढ्या माणसासोबत adjust करावं लागत.. सो मी निर्णय घेतला आहे आपण वेगळे राहूया.. ह्या आपल्या नवीन घराच्या किल्ल्या आहेत.. आता फक्त तू आणि मी…”
जुईला रडूच आले..,” अरे अस कसं ठरवू शकतोस तू.. मला एकदा तरी विचारायचं. मला काय हवं आहे.. आई बाबांना काय वाटेल आजी आजोबा काय म्हणतील.. मी तुला अस त्यांच्या पासून वेगळं नाही करू शकत. ”
अभिषेक म्हणाला.. “अगं त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे..
जुई म्हणाली, “म्हणजे त्यांना हे माहीत आहे.. ?”
अभिषेक म्हणाला..” हो.. त्यांना मी हे आधीच सांगितलं आहे.. “
जुईला आता अभिषेकचा अजून राग आला.. ती ढसाढसा रडू लागली.. अभिषेक म्हणाला.. ,“अगं काय झालं.. “
जुई म्हणाली ,” खर सांगू तर मला आनंद व्हायला हवा होता.. पण तो होत नाही आहे..मलाच वेगळं राहायचं होत पण आता मला तस वाटत नाही आहे.. मला हे सर्व हवे आहेत.. मी हे सर्व एन्जॉय करते. आई बाबा आजी आजोबा प्रीती यांच्या शिवाय आता मी आपलं घर इमॅजिन नाही करू शकत..”
अभिषेक म्हणाला.. ,” अगं पण अस काय करतेस.. तूच म्हणतेस ना आई आणि आजी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत सूचना करत असतात.. उठण झोपणं सुध्दा कंट्रोल केल्यासारख वाटत तुला.. आता आपण स्वतंत्र जगणार आहोत.. ”
जुई म्हणाली, “ तुला कळत नाही आहे का.. मला हे सर्व हवे आहेत.. मी नाही जाणार इथून कुठेच..मलाच स्वतंत्र जगण्याची सवय होती.. पण अरे इथे ही स्वातंत्र्य जपलं आहे मी माझं. आणि कधी कधी येतो कंटाळा सूचनांचा.. लवकर उठव लागत तेव्हा मिस करते मी माझ्या एकट राहण्याला.. पण हा change मी accept केला आहे. आणि त्या थोडीच ना मला काही वाईट सांगता.. हा जो काही change आहे तो माझ्या चांगल्या साठीच आहे हे माहीत आहे मला.. हे सर्व मला आधी अवघड वाटत होत.. पण आता मला ते तितकाच हवंहवंसं वाटत आहे.. प्लिज आपण कुठेच नको जाऊया.. “
“अगं मी तुझ्यासाठी घर घेतलं.. आता तूच माघार घेते आहेस.. आता आपल्याला जावच लागेल तिथे.. आई बाबांना सांगितल आहे मी तस..” आता जुई लहान मुलांसारखी रडू लागली.. गयावया करू लागली…. तिला अस पाहून अभिषेकला त्याच हसू आवरलं नाही..
तो हसत म्हणाला.. ” अगं वेडे त्या किल्ल्या नीट बघ तरी… आपल्या याच घरच्या आहेत.. मी फक्त किचेन बदललं आहे.. ”
जुई म्हणाली,” काय.. म्हणजे तू.. “
अभिषेक म्हणाला,” हो.. मी मस्करी करत होतो. मला माहित आहे तू आता हे सर्व किती हवेहवेसे वाटतात. हे असच होणार हे सुध्दा मला माहित होत.. म्हणूनच मी तुझ्याकडुन एक वर्षाचा वेळ मागितला होता.. ”
जुई ने बेड वर असलेल्या उशीने अभिषेकला मारायला सुरुवात केली.. अभिषेक तिच्या मारा पासून वाचण्यासाठी पळू लागला.” चल आता मला माझे गिफ्ट दे” म्हणत ती त्याच्या पाठी धावू लागली.
जुईला अवघड , नको नकोशी वाटणारी ही सासरची बेडी कधी तिला हवीहवीशी वाटू लागली हे तिचं तिलाच कळले नाही.
( ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.. पण बरेचदा जुई सारखाच कित्येक मुली काही पूर्वग्रह मनात ठेऊन नवीन घरात प्रवेश करतात.. काही जणींच मतं लग्नानंतर जुई प्रमाणे बदलतात. तर काही ते घरचं बदलायला निघतात. जुई सारखच अगदी पिक्चर परफेक्ट सासर प्रत्येकीला मिळतच अस नाही.. समाजात चागल्या तशा वाईट गोष्टी , माणसं ही असतातच.. पण सासर म्हणजे त्रासच हे समीकरण बदलायला हवे. जुईला ज्या सासुरवासाच्या अवघड बेडीत अडकायचे नव्हते. तीच आता तिला हवीहवीशी आपलीशी वाटू लागली होती.)
समाप्त.


